प्रकरण ४ थें
फ्रेंच राजांपैकी अति प्रसिध्द राजा चौदावा लुई
- १ -
पुन: एकदां कवींच्या वातावरणांतून खालीं उतरून राजांकडे वळूं या. सतराव्या शतकांत युरोपांतील राज्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा व घोडचुका यांमुळें युरोपीय संस्कृति जणूं नष्टप्राय झाली ! शेक्सपिअरनंतरच्या पिढीनें अत्यंत रक्तपाती असें धार्मिक युध्द पाहिलें. प्रॉटेस्टंट आणि कॅथॉलिक राजे आपापल्या प्रजेची तीस वर्षे कत्तल करीत होते. 'ईश्वराच्या अतिथोर वैभवासाठीं' आपापले देश या राजांनीं उजाड व उध्वस्त केले ! हें तीस वर्षे चाललेलें युध्द १६४८ सालीं संपलें. सारें मध्ययुरोप जणूं ओसाड झालें होतें ! भुकलेलीं माणसें व भुकेलेले लांडगे मेलेल्या घोड्यांच्या प्रेतांसाठी परस्परांशीं लढत होती. जर्मनीची लोकसंख्या एक कोटि साठ लक्ष होती ती साठी लक्षांवर आली. पश्चिम जर्मनींतील पेलेटिनेट स्टेट अठ्ठावीस वेळां लुटलें
गेलें ! बोहेमियांतील तीस हजार गांवें भस्मीभूत झालीं !
वेस्टफॅलिया येथील तहानें तीस वर्षांचें युध्द संपलें. पण या युध्दनें कशाचाहि निर्णय झाला नाहीं. कॅथॉलिक पोपशीं निष्ठावंत राहिले; प्रॉटेस्टंट ल्यूथरची पूजा करीत राहिले. मध्ययुरोपांतील राजे खाटीकखाना चालवीत असतां इतके इंग्लंडांत पहिला जेम्स मॅकिआव्हिलीच्या शिकवणीप्रमाणें अनियंत्रित सत्ता स्थापूं पाहत होता, प्रजेच्या हक्कांपेक्षां राजाची सत्ता अधिक असते असें दाखवूं पाहत होता. तो म्हणे, ''ईश्वर काय करूं शकेल हें विचारणें जसें निंद्य, अधार्मिक आणि नास्तिकपणाचें, तद्वतच राजा काय करूं शकेल हें विचारणेंहि प्रजेला शोभत नाहीं. तें 'लहान तोंडीं मोठा घांस' घेण्यासारखें होय.'' जेम्सचा मुलगा पहिला चार्लस गादीवर आला तेव्हां त्यानें पित्याच्या उपदेशानुसार वागण्याचें नक्की ठरविलें. इंग्लंडचा अनियंत्रित राजा होणें हें त्याचें ध्येय होतें. सर्व सत्ता आपल्या हातीं असावी असें त्याला वाटत होतें. त्यानें पार्लमेंट बरखास्त केलें. जमीनदार व व्यापारी राजाचा उध्दटपणा व अनियंत्रित हडेलहपपीपणा पाहून संतापले. अनियंत्रित राजाची सत्ता सहन करावयाला ते विलकुल तयार नव्हते. राज्यकारभारांत आपणांस सत्ता असलीच पाहिजे असा हट्ट त्यांनीं धरला. राजा ऐकेना; तेव्हां या अतिरेकी राजाविरुध्द त्यांनीं बंड केले व त्याला कैद करून शेवटीं त्याचें डोकें उडविलें !
पण इंग्रजांना जुन्या संवयी टाकून देणें कठिण होतें. ऑलिव्हर क्रॉम्वेलच्या नेतृत्वाखालीं रिपब्लिक स्थापण्याचे थोडेफार यत्न झालें; पण इंग्रज जनतेलाच राजा असावा असें पुन: वाटूं लागलें. नवा राजा आला; पण त्याची सत्ता अनियंत्रित राहिली नाहीं. राजे लोक धडा शिकले होते. पार्लमेंटशीं शत्रुत्व करण्याचें धाडस त्यांनीं पुन: केलें नाहीं. त्या वेळेपासून इंग्लंड राजशाही रिपब्लिक झालें. राजाचा मुकुट केवळ एक निरुपद्रवी अलंकार म्हणून राहिला. वास्तविक त्याची अवश्यकताहि नव्हती.
पण फ्रान्समध्यें अनियंत्रित राजसत्तेची कल्पनाच अधिक दृढावली. फ्रेंच राजांनीं पौर्वात्य सम्राटांप्रमाणें हुकूमशाही सुरू केली. ते प्रजेचे अनिर्बन्ध स्वामी होते. सारी प्रजा जणूं गुलाम ! प्रजेंतील गुलामीची विषमताच जणूं त्यांनीं नष्ट केली. सारे दुर्बल व अगतिक प्रजाजन ! या अनियंत्रित फ्रेंच राजांपैकीं सर्वांत जास्त दिमाखखोर चौदावा लुई हा होता.
- २ -
चौदावा लुई हा एकंदरींत कार्यक्षम व लायक राजा होता. आपल्याजवळ दैवीं सामर्थ्य आहे असें त्याला वाटे. त्याला आपण पृथ्वीवरचे देवच आहों असा भास होई. तो आपणांस सूर्यदेव म्हणवी. सूर्यदेव अपोलो याच्याप्रमाणें आपण या मर्त्यलोकीं प्रकाश, वैभव व आनंद आणणारे आहों असें तो म्हणे. त्याला वाटे कीं, ईश्वरानें हें जग जें निर्मिलें आहे तें त्यांत आपण आपल्या वैभवानें व दिमाखानें मिरवावें म्हणूनच होय.