- ३ -

ठेंगू पेपिन इ.स. ७६८ मध्यें मरण पावला व त्याचा मुलगा शार्लमन हा न्यूस्ट्रिया व आस्ट्रेशिया म्हणजे आजचे फ्रान्स व जर्मनी यांचा राजा झाला.  शार्लमन या शब्दाचा अर्थ मोठा चार्लस.  शार्लमन पित्याप्रमाणेंच महत्त्वाकांक्षी वीर होता, चर्चचा कडवा रखवालदार होता.  उत्तर स्पेनमध्यें त्यानें सारासीन मुसलमानांचा पराजय केला.  सारासीनांना युरोपांतून संपूर्णपणें हांकलून देण्याचा प्रयत्न त्यानें केला ; पण त्याला त्यांत यश आलें नाहीं.  हीं जी पवित्र युध्दें चाललीं होतीं त्यांचा परिणाम म्हणून शेवटीं मुसलमान व ख्रिश्चन यांच्या दरम्यान पिरनीज पर्वंत ही हद्द ठरली.  दक्षिण स्पेनची सत्ता मुसलमानांनीं आपल्या हातीं ठेवली.  ख्रिश्चन लोक शार्लमनच्या पवित्र मुठीच्या संरक्षणाखालीं उत्तरेकडे, तद्वतच पूर्व युरापभर पसरले.  न्यूस्ट्रिया, आस्ट्रेशिया, क्रिशिया, अक्विटेनिया, बर्गंडी, बव्हेरिया, लंबार्डी, सॅक्सनी, इत्यादि सर्व प्रदेशांवर शार्लमनची सत्ता प्रस्थापित झाली.  शार्लमनला सॅक्सनीबरोबर बरीच लढत द्यावी लागली.  तेथले लोक बरेच हट्टी होते.  ते एकदम नवीन धर्म पत्करीनात.  पण शार्लमननें एका दिवसांत साडेचार हजार लोकांची कत्तल करून शेवटीं त्यांच्या गळीं ख्रिश्चन धर्म उतरविलाच.  जे जिवंत राहिले त्यांनीं ख्रिस्त हा दयाळू आहे हें मुकाट्यानें कबूल करून बॅप्टिस्मा घेतला व ख्रिश्चनांचा धर्म स्वीकारला.

इ.स. ७९९ मध्यें शार्लमनला जरा नाजूक कामगिरी करावयाची होती.  पोप तिसरा लिओ याच्यावर व्यभिचाराचा आरोप करून स्थानिक संस्कृतिसंरक्षकांनीं त्याला मरेमरेतों ठोकलें.  शेवटीं तो आश्रयार्थ एका मठांत गेला.  त्यानें शार्लमनची मदत मागितली.  शार्लमन हा धर्माचा परित्राता होता, संघटित चर्चचा संरक्षक होता.  शार्लमननें गुन्ह्याची चौकशी करून पोप निर्दोषी आहे असें जाहीर केलें.  पोप खरोखर गुन्हेगार होता कीं नाहीं, हा भाग वेगळा ; पण न्यायाधीश म्हणून बसण्याला मात्र शार्लमन लायक नव्हता ; कारण तो निष्ठावंत ख्रिश्चन असला तरी त्याच्या आवडीनिवडी मुसलमानी होत्या.  त्याच्या चार बायका होत्या, पांच रखेल्या होत्या ; त्याला सतरा मुलें होतीं, त्यांपैकीं बरींच अनौरस होतीं.  पण त्यानें पोपला निर्दोष ठरविल्यामुळें पोपचें कल्याण झालें, त्याचप्रमाणें त्याचा स्वत:चाहि फायदा झाला.  इ.स. ८०० च्या नाताळच्या दिवशीं तो सेंट पीटरच्या चर्चमध्यें प्रार्थना करीत असतां एकदम पोप लिओ जणूं काय दैवी प्रेरणा झाल्याप्रमाणें तेथें आला व त्यानें शार्लमनच्या मस्तकावर सुवर्णमुकुट ठेवला.  शार्लमन चकित झाला ; निदान वरपांगी तरी त्यानें आश्चर्यचकित झाल्यासारखें दाखविलें.  वास्तविक त्या क्षणाची तो वाटच पाहत होता.  तो मुकुट तयार झाल्याचें, तद्वतच पोप तो त्या दिवशीं त्याच्या डोक्यावर ठेवणार असल्याचें, त्याला माहीत होतें.  तो जणूं प्रार्थनेंतच तन्मय झाला होता, प्रभुचिंतनांत एकरूप झाला होता !  त्याच्या डोक्यावर मुकुट ठेवला जातांच त्यानें चकित होऊन डोळे उघडले.

नाटक बेलामूम वठलें.  प्रभूनेंच जणूं शार्लमनला सम्राट् बनविलें.  प्रभूनेंच पोपला ऐन वेळीं स्फूर्ति दिली असें सर्वत्र बोललें जाऊं लागलें.  शार्लमन अति पवित्र व देवाचा लाडका म्हणून मानला जाऊं लागला.  जुन्या रोमन साम्राज्याची पुन:स्थापना करून विजयी ख्रिस्ताच्या नांवे नवें राज्य स्थापण्यासाठीं शार्लमनची ईश्वरानेंच निवड केली असें सर्व जण म्हणूं लागले.

शार्लमनला बाहत्तर वर्षांचें आयुष्य लाभलें.  त्यानें मठ बांधले, लॅटिन भाषेच्या व्याकरणांत ढवळाढवळ केली व त्याला नीट लिहितांवाचतां येत नव्हतें तरी ज्योतिष व तत्त्वज्ञान या विषयांतहि त्याची लुडबुड चालूच होती ! न ऐकणार्‍यांचाहि डोक्यांत सोटे मारून तो बायबल कोंबूं पाहत होता.  तो दारू पीत होता, मांसाच्या मिटक्या मारीत होता, परधर्मीयांना स्वधर्मात आणीत होता, त्यांच्या बायकांस आपल्या विलासस्थानी नेत होता, ईश्वराची पूजा करीत होता व बेकायदा मुलेंहि पैदा करीत होता. अशा लीला करीत इ.स. ८१४ मध्यें या स्वारीनें देह ठेवला.

पुढें तीनशें वर्षांनी ख्रिश्चन चर्चनें त्याच्या कामगिरीचा गौरव करून त्याला संत केलें.  पण ख्रिस्तानें अशांचा अन्तर्भाव आपल्या मित्रांत खचित केला नसता.  ख्रिश्चन धर्म वाढविण्याची त्याला इतकी तहान लागली होती कीं, त्या भरांत ख्रिस्ताच्या शिकवणीचा आत्माहि तो विसरून गेला.  ईश्वराच्या नांवाआड स्वत:चीं पापकृत्यें लपविणार्‍या दांभिक गुंडांमधला तो मुकुटमणि होता !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel