प्रथम आसपासचे लहान लहान विस्कळीत प्रदेश घेऊन ते तो खुशाल आपल्या राज्यात जोडीत चालला. जर्मनीच्या उत्तरेस श्लेज्विग व होल्स्टेन हे प्रांत होते. या दोन प्रदेशांतील लोकवस्ती अंशत: डॅनिश व अंशत: जर्मन होती. या दोन्ही प्रदेशांवर डेन्मार्कच्या राजाची सत्ता होती; पण प्रशियाच्याच राजाची हुकमत व या भागावर असली पाहिजे असें बिस्मार्कनें ठरविलें व तो डेन्मार्कशीं युध्द करावयास उभा राहिला. ऑस्ट्रियाचा सम्राट्च अद्यापि संयुक्त जर्मनीचा अधिराजा मानला जात असे. श्लेज्विग व होल्स्टेन हे आपले गेलेले प्रांत परत मिळविण्यासाठीं ऑस्टियाची मदत घेऊन त्यानें युध्द पुकारलें. ऑस्ट्रिया व प्रशिया यांच्या संयुक्त सेना डॅनिश हद्दींत शिरल्या. डॅनिश लोकांनीं फ्रान्सचा राजा तिसरा नेपोलियन याच्याशीं करार करण्याचा यत्न केला. पण नेपोलियन निराळयाच उद्योगात होता. अमेरिकेंत या वेळीं चाललेल्या यादवी युध्दांत तो आपलीं बोटें घुसवूं पाहत होता. अमेरिकेंतील रिपब्लिकच्या जागीं तो पुन: पूर्वीचें जुनें फ्रेंच साम्राज्य स्थापूं पाहत होता. त्यानें आपलें सैन्य व्हेरा व्रूच्झ येथें पाठविलें. मेक्सिकन लोकांनीं ऑस्ट्रियाच्या मॅक्झिमिलियनला राजा मानावें असा हट्ट त्यानें धरला. पण अमेरिकेंतील यादवी युध्द संपलें व फ्रान्सनें आपलें सैन्य अमेरिकेंतून काढून घ्यावें असें वॉशिंग्टन सरकारनें बजावलें. मेक्सिकन लोकांना तो ऑस्ट्रियन राजा नकोच होता. त्याला गोळी घालून ठार मारण्यांत आलें. तिसरा नेपोलियन युरोपियन शेजार्‍यांच्या घाणेरड्या भांडणांत हात घालण्याला पुन: मोकळा झाला.

पण या वेळेपावेतों जर्मन व ऑस्ट्रियन फौजांनीं डेन्मार्कच्या राजाजवळून श्लेज्विग व होल्स्टेन प्रांत घेतले होते. ते दोन्ही प्रदेश जर्मनी व ऑस्ट्रिया यांच्या संयुक्त मालकीचे होते. पण ही मिळालेली सारी लूट केवळ जर्मनीसाठीं राहावी अशी बिस्मार्कची इच्छा होती. तसेंच त्याला ऑस्ट्रियाचे अधिराज्यत्व नष्ट करून स्वतंत्र जर्मन साम्राज्य स्थापावयाचें होतें, म्हणून त्यानें ऑस्ट्रियाशीं कांहीं तरी भांडण उकरून काढलें व संरक्षक युध्द पुकारलें. वास्तविक प्रत्येक युध्द दोन्ही बाजूंच्या भाडोत्री प्रचारकांकडून संरक्षकच दाखविण्यांत येत असतें. ऑस्ट्रियाचें सैन्य दोन शत्रुदेशांत कोंडण्यासाठीं बिस्मार्कनें इटलीशीं करार केला व मुत्सद्देगिरीनें युरोपांतील इतर राष्ट्रांस त्यानें तटस्थ ठेवलें. त्यासाठीं त्यानें कोणाला खोटीं वचनें दिलीं, कोणाला खोटे सांगितलें, कोणाची खुशामत केली, कोणाला दमदाटी दिली, कोणाला धाक घातला आणि आपलें व आपल्या राजाचें हित साधण्यासाठीं मॅकिऑव्हिलियन कोडांतील प्रत्येक मार्गाचा अवलंब केला.

ऑस्ट्रियाविरुध्द पुकारलेलें हें युध्द पटकन् संपलें. दोनच महिन्यांत प्रशियन फौजांनीं ऑस्ट्रियन सैन्यास खडे चारले ! ऑस्ट्रियाचा पुरा मोड झाला व युरोपच्या घोड्यावर बिस्मार्क आरूढ झाला. त्यानें उत्तर जर्मनींतील संस्थानांचें फेडरेशन करून तें प्रशियाच्या अधिराज्यत्वाखालीं आणलें. येवढें केल्यानंतर तो आपल्या चढाऊ धोरणाचें पुढचें पाऊल टाकावयास निघाला. प्रशियांतील लष्करी अधिकारी धर्माधिकार्‍यांप्रमाणें सन्मानिले जाऊं लागले. बिस्मार्कच्या संतत कशाघातानें व त्याच्या अहर्निश चळवळीनें जर्मनीभर लष्करामध्यें नोकरी करणें हें केवळ देशभक्तीचेंच नव्हे तर पवित्र व धार्मिक कर्तव्य मानलें जाऊं लागलें. प्रशियन सेनापति व्हाँ मोल्टके हा बिस्मार्कच्या हाताखालीं होता, त्यानें स्वत:च्या देशबांधवांना व इतर राष्ट्रांनाहि शिकविलें कीं 'युध्द ही जगाच्या रचनेंत ईश्वरनिर्दिष्ट अशी एक आवश्यक बाब आहे. या वेळचें बिस्मार्कचें चित्र पाहा. डोक्यावर मध्ययुगीन शिरस्त्राण, निष्ठुर दिसणारे डोळे, जाड पापण्या, जबड्याचीं मोठीं हाडें, मोठ्या लष्करी मिशा, यांमुळें तो जणूं प्राचीन काळांतला युध्ददेवच दिसतो ! तो सर्वत्र लाल रक्ताळ मुठीचा कारभार सुरू करूं पाहत होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to मानवजातीची कथा


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
सापळा
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
अजरामर कथा
 भवानी तलवारीचे रहस्य
लोकभ्रमाच्या दंतकथा
वाड्याचे रहस्य
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय