पण अधिक भयंकर हिंस्र श्वापदांनीं मानवांवर हल्ले चढविले तेव्हां त्यांना गुहांमध्यें आश्रय शोधणें भाग पडलें. हे पशुसम मानवी जीव एकेका गुहेंत समुदायानें राहूं लागले. त्यांच्यात भाषा प्रकट झाली. त्यांना एकमेकांबद्दल आपलेपणा, करुणा, मैत्री वाटूं लागली. त्यांना स्वप्नांत जे विचित्र आकार दिसत, त्यांना देव मानून आणि अमर जीवन व अपरंपार शक्ति त्यांच्या ठायीं कल्पून, त्या काल्पनिक देवदेवतांची ते पूजा करूं लागले. पुढें त्यांना धातूंचा शोध लागल्यावर ते अधिक चांगली हत्यारें तयार करूं लागले व स्वत:चा बचाव आणि दुसर्यांचा संहार करण्याच्या क्रियांत अधिक तरबेज झाले. निरनिराळे मानवसमुदाय परस्परांशीं विचारविनिमय व वस्तुविनिमय करूं लागले, मालाची अदलाबदल व ठोशांची देवाण-घेवाण करूं लागले आणि अशा रीतीनें ते नाना कला व उद्योग शिकले. देवघेव, व्यापार, नौकानयन, शेती, काव्य, संगीत, शिल्प, राजकारण, मुत्सद्देगिरी, भांडणतंटे, फिर्यादी, मारामार्या, लढाया, सारें कांही ते शिकले. थोडक्यात म्हणजे ही संस्कृति—ही सुधारणा—हळूहळू उत्क्रान्तीनें होत आली आहे. आपत्तींनीं भरलेल्या या जगांत स्वत:चें सारें कसें जुळवून घ्यावयाचें हें मानव हळूहळू ठरवीत होता. तो बदल करीत, फरक करीत चालला होता. जीवनार्थ चाललेल्या या अखंड झगड्यांत थोडा वेळ जगतां यावें म्हणून मनुष्य प्रयत्न करीत आहे. हे सारें जीवन म्हणजे एक अखंड, अविरत झगडा आहे. या जगात मरणाशिवाय शांति नाहीं.
- ६ -
आणि अशा रीतीनें आपण एपिक्युरसच्या विज्ञानांतूनच त्याच्या तत्त्वज्ञानाकडे येतों. ज्या पृथ्वीवर आपण जगत असतों ती जणूं आपणांस थोडा वेळ भाड्यानेंच मिळाली आहे. येथून निघून जाण्याची वेळ आली की आपलें सारें लुबाडलें जातें व अकिंचन होऊनच आपणांस येथून जावें लागतें. पण आपणांस मरणावर जय मिळवितां आला नाहीं तरी मरणाच्या भयावर आपण जय मिळवूं या. मानवी जीवन अल्प आहे म्हणून दु:ख करीत बसण्याचें कारण नाहीं. उलट तें अल्प आहे म्हणून आनंदच मानूं या. मरणानंतर जाणीव नाहीं ; मरणानंतर ना दु:ख ना वेदना, ना शिक्षा ना बक्षीस, ना स्वर्ग ना नरक ! या पृथ्वीवर केलेल्या चुकांबद्दल आपणांस मरणोत्तर कोणी सजा देणार आहे असें नाहीं. मृत्युदेवाचा तो कारुण्यपूर्ण शुभ्र हात आपणांस थोपटतो व स्वप्नहीन, चिर, मधुर निद्रेंत नेऊन सोडतो. जगद्रूपी वेड्यांच्या घरांतून होणार्या आपल्या सुटकेच्या कागदावर सही करणारा प्रेमळ रक्षक म्हणजे मृत्यु. सर्व रोगांहून भयंकर रोग म्हणजे हें जीवन. जीवनाच्या दुर्धर व भीषण रोगापासून आपणांस मुक्त करणारा सौम्य व शांत वैद्यराज म्हणजे मृत्यु.
पण तुम्हांपैकी कांहींना जरी हें जीवन सुखाचें, चिरसुखोपभोगांची जणूं मेजवानींच अशा स्वरूपाचें लाभलें असलें तरी तुम्हीं नेहमींच चैन करीत व अधाशासारखें खातपीत राहावें हें बरें का ? ओ येईपर्यंत खात बसणें बरें नव्हे. पोटाला तडस लागण्यापूर्वीच उठावें. दोन घांस कमीच खाल्लेले बरे. एकाद्या दमलेल्या पण सुखी अशा मेजवानी झोडलेल्या माणसाप्रमाणें प्रसन्नपणें व हंसतमुखानें सुखाची झोंप घ्यावयाला जाणें बरें नव्हे का ? एक दुर्दिन येईल व तुमच्या जीवनांतील सारें नष्ट होईल याचें तुम्हांला वाईट वाटतें. पण हा जो अखेरचा दिवस येणार आहे तो या नानाविध हव्यासांतून, वासनांतून व इच्छांतून सोडविणारा आणि हें हवें, तें हवें अशा धांवपळीपासून मुक्त करणारा असेल ही गोष्ट तुम्ही विसरतां.