२
डान्टे मेला तेव्हां पेट्रार्क तेरा वर्षांचा होता. त्याचें पूर्ण नांव फ्रॅन्सिस पेट्रार्क. १३०४ मध्यें अरेझ्झो गांवीं त्याचा जन्म झाला. त्याचा बाप फ्लॉरेन्समधील प्रतिष्ठित नागरिक होता. पण त्याला तेथें हद्दपार करून ठेवण्यांत आलें होतें. ज्या अल्पसंख्य पक्षाला मागाहून डान्टे मिळाला, त्याच पक्षाचा पेट्रार्कचा बापहि होता; वयाच्या पंधराव्या वर्षी पेट्रार्कला कायद्याचा अभ्यास करण्यासाठीं फ्रान्समधील माँटपेलियन विद्यापीठांत घालण्यांत आलें. कायद्याकडे त्याच्या मनाचा ओढा नव्हता; पण बापाचा धंदा पुढें चालविण्यासाठीं तो कायदेपंडित होणार होता. तो इतर वाचन करी, काव्य करी. त्यानें लॅटिनचा सांगोपांग अभ्यास केला होता; पण तत्कालीन युरोपियन विद्यार्थ्यांप्रमाणें त्यालाहि ग्रीकचा गंध सुध्दां नव्हता.
१३२६ सालीं त्याचा बाप वारला तेव्हां तो अॅव्हिगनॉन येथे धर्मोपदेशक झाला. १३२७ सालच्या एप्रिलच्या सहाव्या तारखेस अॅव्हिगनॉनमधील एका चर्चमध्यें लॉरा नांवाच्या तरुणीशीं त्याची गांठ पडली त्या वेळीं तो तेवीस वर्षांचा होता. लॉराचें लग्न झालेलें होतें. तरुण कवीकडे—या पेट्रार्ककडे-तिचें मन आकर्षिलें गेले. ती त्याच्या भावना व वासना चेतवी, उचंबळवी, पेटवी; पण ती त्याला स्वत:च्या अधिक जवळ येऊं देत नसे. ती त्याला दुरून दुरूनच खेळवी. त्यांची पहिली भेट झाली त्या क्षणापासून लॉरानें पेट्रार्कच्या मनावर व प्रतिभेवर सत्ता मिळविली. ती त्याच्या काव्याची स्वामिनी होती. त्याच्या सुनीतांमुळें ती अमर झाली आहे. नवयुगांतील अत्यंत मनोहारिणी स्त्री म्हणून ती ओळखली जाते. चौदाव्या शतकांतील या भावनाशून्य सुंदरीच्या सन्मानार्थ भावनाप्रधान तरुण आजपर्यंत भावनोत्कट काव्यांच्या राशी निर्माण करीत आले आहेत. लॉरानें जरी पेट्रार्कचें मन सर्वस्वी व्यापिलें होतें तरी इतर स्त्रियांच्या बाबतींतहि तो कांही अंधळा नव्हता. त्याला त्याच्या एका पूजकानें एक बेवारशी मूल अर्पण केलें. दुसर्या एकानें एक बेवारशी मुलगी दिली व पोपच्या खास फर्मानानें पुढें ही मुलें कायदेशीर मानलीं गेलीं.
पेट्रार्क अॅव्हिगनॉन येथें १३३३ पर्यंत राहिला. नंतर तो प्राचीन काळांतील सौंदर्य मिळविण्यासाठीं आपल्या पहिल्या दीर्घ यात्रेवर निघाला. विनवुड रीड आपल्या ग्रंथांत म्हणतो, ''त्यानें ग्रंथ धुंडाळण्याचें युग सुरू केलें.'' पॅरिस, घेंट, लीज, कोलोन, रोम, इत्यादि शहरीं तो गेला. त्यानें जुने हस्तलिखित लॅटिन ग्रंथ शोधून काढले व त्यांच्या नकला करून घेऊन तें जुनें ज्ञान व ते प्राचीन विचार त्यानें आत्मसात् करून घेतले. मॅटरजिंकच्या 'निळा पक्षी' या पुस्तकांत दोन जिज्ञासू भावंडांचे मृत बंधू जिवंत होतात, त्याप्रमाणें लॅटिन वाङ्मयांतील प्राचीन वागीश्वर पेट्रार्कच्या स्मृतीचा जादूचा स्पर्श होतांच जणूं पुन: जिवंत झाले ! पेट्रार्कनें सिसरो व सेनेका यांना पत्रें लिहिलीं : जणूं ते त्याचे समकालींनच होते ! शेंकडों शतकें ओलांडून तो आपल्या सहानुभूतिपूर्ण दृष्टीनें त्यांना भेटला, त्यांच्याबरोबर त्यांच्याच भाषेंत बोलला, त्यांचेच वाक्सांप्रदाय वापरूं लागला. जरी तो कॅथॉलिक चर्चचा धर्मनिष्ठ पुत्र होता तरी तो प्राचीन ज्ञानमन्दिराचा व प्राचीन धर्माचाहि चाहता व उद्गाता बनला. ईश्वराच्या तोंडावरील मध्ययुगीन बुरखा दूर करून त्यानें ख्रिस्त केवळ दु:खमूर्ति नसून आनंदमूर्तीहि आहे असें दाखवून युरोपला चकित केलें. दु:खमूर्ति ख्रिस्त म्हणजे हास्यमूर्ति व विनोदमूर्ति बॅकसचा जुळा भाऊ असें त्यानें दाखविलें.
सौंदर्यासाठीं ही भूतकाळांतील यात्रा करण्यांत पेट्रार्कचीं बरींच वर्षे गेलीं. नंतर तो लोकांपासून दूर अशा व्हॉक्लूज येथील भव्य व भीषण पर्वतांमधील एका दरींत घर करून राहिला व तेथें त्यानें आपलें शेष आयुष्य अत्यंत शांतपणें घालविलें, प्राचीनांचा काव्याचा अभ्यास केला आणि संगीत व नादमाधुर्यं हें त्यांचे गुण आपल्या काव्यांत आणले. वाङ्मयांत त्यानें एक नवीनच तार छेडली व मध्ययुगीन विचाराच्या छंदाला एक नवीन, तेजस्वी आणि उत्कट जोड दिली. मरण वा नरकयातना यांविषयींच काव्यें करीत बसण्याऐवजीं तो जीवनाविषयीं व प्रेमाच्या आनंदाविषयीं लिहूं लागला. झोंपून उठल्याप्रमाणें जग त्याचीं हीं गीतें ऐकूं लागलें व टाळ्या वाजवून त्याची वाहवा करूं लागलें.