त्यांच्या भावना पेटाव्या, त्यांनीं मरावयास तयार व्हावें, म्हणून तो म्हणाला, ''तीस शतकें त्या पिरॅमिड्सवरून तुमच्याकडे पाहत आहेत !'' इतिहासांतील अति प्रसिध्द व अत्यंत मूर्खपणाचें हें वाक्य आहे. या वाक्यांत लष्करशाहीचें स्वरूप प्रतीत होत आहे. लष्करशाही जिवंत व प्रगतिपर वर्तमानकाळाला भूतकाळाशीं जखडून टाकून प्रगति होऊंच देत नाहीं. लष्करशाही आम्हांला आपलें जीवनाचें नाटक जणूं भुतांसमोर करावयास लावते; चार हजार वर्षे-मृतांचीं चार हजार वर्षे-तुमच्याकडे पाहत आहेत म्हणून मारा व मरा असें ही सांगत असते. एका वेडपटाचा मूर्खांच्या पिढीला हा उपदेश आहे; तो मूर्खांनीं ऐकला, मानला व ते मेले; त्या वेडपटाचें वैभव व त्याची कीर्ति वाढविण्यासाठीं ते मूर्ख मातींत पडले !
नेपोलियन फक्त स्वत:ची पूजा करी व बाकी सार्या दुनियेला तुच्छ मानी. कृतज्ञतेशीं त्याचा परिचय नव्हता. मानवी दु:खांविषयीं त्याला सहानुभूति नसे. ईजिप्तमधील जखमी शिपायांना परत स्वदेशीं आणणें फार त्रासाचें होतें, म्हणून त्यांना क्लोरोपचॅर्म देऊन त्यानें ठार मारलें ! नेपोलियन वंचक व असत्यवादी होता ! त्याला सत्य ठाऊक नव्हतें. तो दंभाचा पुतळा होता. फसवणूक करणें हा तर त्याचा धर्म होता ! ज्या ध्येयांवर त्याची श्रध्द नव्हती तींहि आपलीं आहेत असें तो खुशाल सांगे ! पाळावयाचीं नसलेलीं वचनेंहि तो खुशाल देई ! चढाऊ वीराचा तो आदर्श नमुना होता. जगावर सत्ता गाजवूं पाहणारे तलवारबहाद्दर असेच असतात. मानवप्राणी म्हणजे मातीचीं डिखळें असें तो मानी व आपली लहर तृप्त करण्यासाठीं या मातीला मन मानेल तसा आकार देई वा फोडून टाकी.
आपल्या कारकीर्दीच्या आरंभी त्यानें आपण मानवजातीचे मित्र आहों असें ढोंग केलें. युरोपभर अनेक रिपब्लिकें स्थापून त्यानें तीं स्वत:च लुटलीं ! क्रांतीच्या नांवानें लढत असतां तो स्वत:चेंच घोडें कसें पुढें दामटतां येईल हेंच खरोखरीं पाहत असे. सैन्यावर आपला पूर्ण ताबा बसला आहे असें दिसल्यावर त्यानें १८०४ सालीं पोपला बोलावून आणून त्याच्याकडून 'फ्रान्सचा ईश्वरनियोजित सम्राट' असा अभिषेक आपणांस करून घेतला. कार्लाइल म्हणतो, ''त्या राज्याभिषेकांत कशाचीहि वाण नव्हती; पांच लाख लोक त्यासाठीं मेले नव्हते का ? मग आणखी कोणतें भाग्य हवें ?'' आतांपर्यंत तो पददलितांचा कैवारी म्हणून मिरविला; पण आतां तो अत्यंत रानटी व जुलुमी हडेलहप्प बनला. युरोपांतील सार्या रिपब्लिकांच्या पुन: राजेशाह्या करून स्वत:च्या भावांत व आपतेष्टांत त्यानें सारें युरोप जणूं वांटून टाकलें ! पण हें भावांवर व आपतेष्टांवर त्याचें प्रेम होतें म्हणून नव्हे, तर राजे बनविणें व नष्ट करणें हा आपला खेळ आहे, आपल्या तळहातचा मळ आहे असें त्यांना दाखवून दिपवून टाकण्यासाठीं. आपण 'कर्तुमकर्तुमन्यथाकर्तुं' असे सत्ताधारी आहों हें तो दाखवूं इच्छीत होता. एकाद्या उकिरड्यावर ऐटीनें बसणार्या कोंबड्याप्रमाणें उध्वस्त जगाच्या विनाश-राशीवर तो बसला होता. आणि अद्यापहि या कोंबड्याचें कुकूऽकूऽ सर्व राष्ट्रांतील मुलांच्या वर्गांतून शिकविण्यांत येत असतें व या नवयुवकांतून पुढच्या लढाईचे शिपाई तयार करण्यांत येत असतात.