- ५ -

स्थानिक कारभार चालविण्यांत पेरिक्लिसचा हात धरणारा कोणी नव्हता.  तो अद्वितीय मुत्सद्दी होता, परंतु त्याची दृष्टि मर्यादित होती.  अथेन्सच्या भिंतींपलीकडे त्याला पहातां येत नसे.  विनवुडरीड आपल्या ''मनुष्याचें हौतात्म्य'' या उत्कृष्ट पुस्तकांत लिहितो, ''पेरिक्लीस हा चांगला अथीनियन होता, परंतु वाईट ग्रीक होता.'' तो अथेन्सचें कल्याण पाही.  परंतु सर्व ग्रीकांचें हित, मंगल पाहणारी उदार व विशाल दृष्टि त्याला नव्हती.  आपलें अथेन्स शहर पहिलें असलें पाहिजे अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती.  परंतु दुसर्‍या एका ग्रीक शहराला अशीच महत्त्वाकांक्षा होती.  स्पार्टालाहि पहिलें स्थान मिळविण्याची उत्कट इच्छा होती.  स्पार्टातील सारे लोक युध्दकर्माला पूजीत.  प्रत्येक जण शिपाई होता, शूर लढवय्या होता.  स्पार्टन लोक प्रामाणिकपणापेक्षां धैर्याला महत्त्व देत.  लढाईंतील शौर्य म्हणजे परमोच्च सद्‍गुण असें मानलें जाई.  या स्पार्टन लोकांत पहिल्या नंबरचें कलावान् नव्हते ; पहिल्या दर्जाचे कवी, तत्त्वज्ञानी त्यांच्यांत नव्हते.  परंतु ते पहिल्या दर्जाचे उत्कृष्ट लढवय्ये होते.  त्यांनीं ग्रीसचें लष्करी नेतृत्व आपणांकडे पाहिजे अशी घोषणा केली आणि अथेन्सनें मूर्खपणानें ते आव्हान स्वीकारलें.  दोन्ही शहरें निकरावर आलीं, हातघाईवर आलीं.  आणि एक ग्रीक दुसर्‍या ग्रीकाशीं भिडल्यावर रक्त वाहिल्याशिवाय कसें राहील ?

हें युध्द टळावें म्हणून पेरिक्लिसनें कांहीहि खटपट केली नाही.  उलट तें युध्द पेटावें म्हणून त्यानें वाराच घातला.  त्याची लोकप्रियता कमी होत होती म्हणून युध्द पेटलें तर बरें असें कदाचित् त्याला वाटलें असेल.  जें युध्द धुमसत होतें, रेंगाळत होतें, त्याचा भडका उडावा, सोक्षमोक्ष व्हावा असें त्याला वाटलें असेल.  एकदां युध्द पेटलें म्हणजे अथेन्स शहर पुन्हा त्यालाच शरण जाणार.  त्याच्याशिवाय अथेन्सला कोण वांचवणार ? 'तुम्हीच आमचे नेतें, तुम्हीच तारक' असें मला अथीनियन म्हणतील.  मावळणारी लोकप्रियता पेटत्या युध्दाबरोबर पुन्हा वाढेल असें का त्याला वाटलें ? त्यानें शेवटीं स्वत:ची महत्त्वाकांक्षाच जनतेच्या कल्याणापेक्षां श्रेष्ठ मानली.  स्वत:च्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठीं युध्दाचा वणवा पेटवायला तो उभा राहिला, इतिहासांतील हे नेहमींचेच प्रकार.  पेरिक्लिसहि त्याच मार्गानें गेला आणि शेवटीं व्हायचे तें झालें.  लोकांचा सर्वनाश झाला.  पेरिक्लीस एका सार्वजनिक सभेंत म्हणाला, ''तुम्ही युध्द न कराल तर तें दुबळेपणाची कबुली दिल्याप्रमाणें होईल.'' स्पार्टावर अथेन्सचें प्रभुत्व स्थापावयाचेंच असा त्यानें निर्धार केला.  परंतु स्पार्टाहून अथेन्स श्रेष्ठ आहे हें सिध्द करण्यासाठीं का रक्तपाताचीच जरूर होती ?

युध्द पुकारलें गेलें.  आणि त्याचबरोबर दुष्काळ आला.  रोगांच्या सांथी आल्या.  अथेन्समधील निम्मी जनता रोगांना बळी पडली.  स्पार्टन लोक आक्रमण करीत, हाणामार्‍या करीत पुढें येत होते, म्हणून आसपासचे सारे लोक रक्षणार्थ अथेन्स शहरांत शिरले.  अथेन्समधील आरोग्याची व्यवस्था नीट नव्हती.  सर्वत्र घाण झाली.  जणूं दुसरा नरक झाला !  पेरिक्लिसची बहीण प्लेगनें मेली, त्याचे दोन मुलगेहि मेले आणि शेवटी पेरिक्लिसलाहि प्लेगची गांठ आली आणि त्यानेंहि राम म्हटला !

पुन्हाहि का हा काव्यमय न्याय त्याला मिळाला ? परंतु मूर्खपणाच्या गोष्टीसाठीं केवढी किंमत द्यावी लागली !  हें युध्द जवळजवळ एक पिढीपर्यंत चाललें.  ख्रि.पू. ४३१ ते ४०४ पर्यंत हें युध्द सुरू होतें.  आणि शेवटीं अथेन्स हरलें.  अथेन्सनें जगाला एकच गोष्ट दाखविली, कीं अथेन्स चांगल्या लोकांची भूमि असेल, परंतु स्पार्टापुढें अथेन्सचे शिपाई रद्दीच !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel