प्रास्ताविक चार शब्द

आमचे गुरु प्रा. धर्मानंद कोसंबी ह्यांनी सुत्तनिपात ह्या ग्रंथाचें मराठी भाषांतर विविधज्ञानविस्ताराच्या ६८ व्या वर्षाच्या (१९३७ च्या) अंकांत क्रमश: छापून काढलें व त्यांनीं छोटीशी प्रस्तावनाही जोडली होती ती येथें छापली आहे. धर्मानंद स्मारक ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांनीं त्यांचे ग्रंथ छापून काढण्याची योजना आंखली व त्यांनीं सुत्तनिपाताचें भाषांतर मूळ पालि ग्रंथासह छापण्याचें ठरविलें. ह्या ग्रंथाचें संपादन करण्यासंबंधीं सुमारें पांच वर्षांपूर्वी माझ्याकडे पृच्छा केली व तें मी मोठ्या आनंदानें कबूल केलें.

पुढें भाषांतर मी मूळ ग्रंथाबरोबर वाचून पाहिलें तेव्हां भाषांतरांत कांहीं दुरुस्त्या आवश्यक आहेत असें मला आढळून आलें. ट्रस्टचे विद्वान् सेवार्थी कार्यवाह श्री. पुरुषोत्तम मंगेश लाड, आय् सी. एस. ह्यांच्या नजरेस मीं ही गोष्ट आणली व त्यांनीं मला जरूर ते फेरफार करण्यास परवानगी दिली. ह्यांतील बरेचसे फेरफार शाब्दिक आहेत व कांहीं अर्थाचे बाबतींत ही आहेत शिवाय अर्थ स्पष्ट करण्याकरितां कांहीं टीपाही जोडल्या आहेत.

मूळ पालि ग्रंथाच्या बाबतींत मी १९२४ सालीं छापलेल्या माझ्या सुत्तनिपाताच्या देवनागरी आवृत्तीचाच मुख्यत: उपयोग केला आहे. त्यांतील सुत्तनिपाताच्या ग्रंथाशीं विचारसाम्य दाखविणारा भाग व अट्ठकथेंतील संक्षिप्त उतारे ह्या आवृत्तींत वगळले आहेत. इतरही किरकोळ फेरफार केले आहेत.

हा मूळ ग्रन्थ छापतांना अर्थावबोधास उपकारक अशा कांहीं टाइपांच्या क्लृप्त्या ह्या आवृत्तींत योजिलेल्या आहेत. उदाहरणार्थ, पालि भाषेंत दोन स्वरांचे सन्धि होतांना कांहीं ठिकाणीं पहिल्या स्वराचा लोप होतो, तर कांहीं ठिकाणीं दुसर्‍यास्वराचा लोप होतो, तर कांहीं ठिकाणीं दोन्ही स्वर मिळून तिसराच स्वर होतो; म्हणून संस्कृत सन्धीहून भिन्न सन्धि पाहून वाचक बुचकळ्यांत पडतो. ज्या ठिकाणी पहिल्या स्वराचा लोप , इतर कांहीं फेरफार न घडवितां, झाला असेल, त्या ठिकाणीं त्या अक्षराच्या खालीं बिन्दु दिला आहे उदाहरणार्थ- महिया + एक रत्तिवासो = महियेकरत्तिवासो (१९); येन + इच्छिकं = येनिच्छकं (३९); न + एति = नेति (५३५); अनेजो + अस्स = अनेजस्स (९२१); बहुजा- गरो + अस्स = बहुजागरस्स (९७२); हि + अञ्ञदत्थो + अत्थि = हञ्ञदत्थात्धि (८२८). ज्या ठिकाणीं दुसर्‍या स्वराचा लोप झाला असेल व तो स्वर ‘अ’ खेरीज अन्य असेल, तर त्या स्वराचा लोप शिरोरेखेमध्येंच टिंब देऊन दाखविला आहे. ‘अ’ स्वर असेल तर संस्कृतप्रमाणेंच अवग्रहाची खूण वापरली आहे. उदाहरणार्थ को + इध = को ध (१७३); दिट्ठे + एव = दिट्ठे व (३४३); सुदुत्तरं + इति = सुदुत्तरं ति (३५८); पण सुसुक्कदाठो + असि = सुसुक्कदाठोऽसि (५४८); एते + अपि = एतेऽपि (८६८). हा सन्धि होतांना मागच्या स्वरांत कांहीं फरक घडून आला असल्यास ह्या बिन्दूचें चिन्ह वापरलेलें नाहीं. करेय्य + इत = करेय्या ति (९०); सद्धा + इध = सद्धीध (१८२); ब्रह्मलोक + उपगो = ब्रह्मलोकूपगो (१३९); थोडक्यांत म्हणजे स्वराचा केवळ लोप झाला हें दाखविण्याकरितांच ह्या बिन्दूची योजना केलेली आहे. संस्कृतच्या नियमाप्रमाणेंच सन्धि झाला असल्यास ही योजना केलेली नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel