ग्रंथ--परिचय

तिपिटक : हिंदूंना ज्याप्रमाणें वेद पवित्र आहेत किंवा मुसलमानांना कुराण, किंवा ख्रिस्ती लोकांना बायबल, त्याप्रमाणें बुद्धानुयायींना तिपिटक (त्रिपिटक) हा ग्रंथसंग्रह आहे. तिपिटकांमध्यें तीन पिटकें-पेटारे-असून त्याचे तीन भाग आहेत; म्हणजे (१) विनय-पिटक, (२) सुत्त-पिटक व (३) अभिधम्म-पिटक. विनयपिटकांत भिक्षू व भिक्षुणी ह्यांच्या वागण्यासंबंधीचे नियम, प्रसंगोपात्त दाखले देऊन, दिलेले आहेत. मूळच्या नियमांतही अनुभवानंतर गौतम बुद्धानें अनेक फेरफार केलेले आहेत. या संबंधाची सर्व माहिती विनयपिटकांत दिलेली आहे. भगवान् बुद्ध किंवा त्याचे शिष्य ह्यांची बुद्धधर्माच्या धार्मिक व नैतिक तत्त्वांबद्दल जी मनोरंजक चर्चा झाली ती लोकप्रिय रीतीनें सुत्तपिटकांत दिली आहे. अभिधम्म पिटकांत बुद्धधर्माचें तत्त्वज्ञान जराशा रूक्ष पद्धतीनें सांगितलें आहे. अभिधम्मपिटकांतील वर्गीकरणावरून बौद्ध लोकांच्या संख्यायुक्त विभागणी पद्धतीवर चांगला प्रकाश पडतो. या पुस्तकांचा अभ्यास बुद्धीचा विकार करण्यास किंवा स्मरणशक्ति तीव्र करण्यास फार उपयोगी पडतो.

सुत्तनिपात व त्याचा तिपिटकांतील इतर ग्रंथांशीं संबंध
:- सुत्तनिपात हा सुत्तपिटकाचा एक भाग असून पान १७ वरील कोष्टकावरून त्याचा तिपिटकांतील इतर ग्रंथांशीं असलेला संबंध दिसून येईल.

तिपिटक : तीन शतकांतील बौद्ध साहित्यिक चळवळींचा विपाक
– तिपिटकातील सगळे ग्रंथ एकाच वेळी तयार झालेले नाहीत. गौतम बुद्ध जेव्हांपासून नवीन धार्मिक संप्रदायाचा संस्थापक म्हणून मान्य केला गेला तेव्हांपासून, म्हणजे आपण असें म्हणूं या कीं बौद्धसंघ-स्थापनेपासून तीनशें वर्षांतील बौद्ध साहित्यिक चळवळीचा निदर्शक असा हा तिपिटक ग्रंथसंग्रह दिसतो. संयुत्त व अंगुत्तर-निकायाचा बराचसा भाग व खुद्दक निकाय हा दीघ व मज्झिम निकायानंतरचा दिसतो. बुद्धाच्या मृत्यूनंतर चाळीस वर्षांनीं राज्य करीत असलेल्या मगध देशच्या मुंड राजाच्या पत्नीच्या मृत्यूवर आधारलेलें एक सुत्त अंगुत्तरनिकायांत आहे. खुद्दकनिकायांतील पुस्तकावरूनही हे सर्व ग्रंथ एकाच वेळचे नाहींत हें स्पष्ट होतें. समन्तपासादिका नांवाच्या विनयअट्ठकथेच्या चिनी संस्करणांत खुद्दकनिकायांत चौदाच ग्रंथ असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. खुद्दकपाठ हें छोटेखानी पुस्तक त्या यादींतून वगळलें आहे. पेतवत्थु व विमानव्तथु या ग्रंथावरूनही वरील विधानाला पुष्टि मिळते. गोतमबुद्धाच्या मृत्यूनंतर सुमारें दोनशें वर्षांनीं सौराष्ट्रांत (सुरट्ठ) राज्य करीत असलेल्या राजा पिंगलकाचा उल्लेख पेतवत्थूमध्यें (४-३ १) सांपडतो. बुद्धाच्या मृत्यूनंतर बर्‍याच वर्षांनी घडलेल्या दुसर्‍या एका गोष्टीचा उल्लेखही विमानवत्थु ग्रंथांत (७.१०) सांपडतो. विनय आणि अभिधम्मपिटक यांतही हेंच आढळतें. विनय पिटकाचा पांचवा ग्रंथ, परिवार, हा पहिल्या चार ग्रंथांनंतर बर्‍याच काळानें तयार झाल्याचें स्पष्ट दिसतें. तसेंच अभिधम्मपिटकांतील कथावत्थु हा ग्रंथ धम्मसंगणीनंतर बर्‍याच काळानें म्हणजे अशोक-कालच्या तिसर्‍या धर्मसंगीतींत तयार झाल्याचा स्पष्ट उल्लेख आढळतो.

राजगृह, वैशाली व पाटलिपुत्र येथें भरलेल्या धर्मसंगीती
—बौद्धपरंपरेला अनुसरून असें म्हटलें जातें कीं, बुद्धाच्या मृत्यूनंतर लगेच त्याच्या शिष्यांनीं महाकाश्यप नांवाच्या महास्थविराच्या नेतृत्वाखालीं राजगृह येथें पहिली संगीति भरविली. या सभेंत पांचशें सुज्ञ लोक उपस्थित होते. त्यांनीं बुद्धाच्या अनुयायी लोकांत तीव्र स्वरूप देण्याचा निश्चय केला. अजातशत्रुराजानें या भिक्षूंना ह्या कामीं मदत केली. बुद्धाचा बरींच वर्षें परिचारक बनलेल्या आनंदानें धर्माचें व उपालीनें विनयाचें गायन केलें अशी आख्यायिका आहे. यानंतर शंभर वर्षांनी वैशाली येथें सातशें सुज्ञांनीं पुन: धर्मसंगीति भरवून, बौद्ध संघांत फूट पाडणार्‍या कांहीं मुद्यांवर चर्चा केली. या संगीतींतही बौद्ध उपदेशास पुन: साहित्यिक स्वरूप देण्यांत आलें. पुढें एकशें छत्तीस वर्षांनंतर म्हणजे बुद्धाच्या निर्वाणापासून दोनशें छत्तीस वर्षांनंतर, अशोक राजाच्या कारकीर्दींत तिसरी संगीति पाटलिपुत्र (पाटणा) येथें भरली व आतांपर्यंत तयार असलेल्या बौद्ध शिकवणीच्या साहित्यिक स्वरूपास पुन: उजळा देऊन सुधारून वाढविलेली नवीन आवृत्ति तयार करण्यांत आली. ह्याच संगीतींत भोग्गलिपुत्त- तिस्स थेरानें कथावत्थूचा अंतर्भाव अभिधम्मपिटकांत केला. हाच मोग्गलिपुत्त थेर ह्या संगीतीचा अध्यक्ष होता. या तीन संगीती सेथविरवादी पंथीयांनीं मान्य केलेल्या आहेत.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel