मराठी अनुवादः-
३३
[७. सेलसुत्त]


असें मीं ऐकलें आहे. एके समयीं भगवान् अंगुत्तराप देशांत मोठ्या भिक्षुसंघासह म्हणजे साडेबाराशें भिक्षूंसह प्रवास करीत असतां ‘आपण’ नांवाच्या अंगुत्तरापाच्या शहराजवळ आला. केणिय जटिलानें असें ऐकलें कीं, श्रमण गोतम शाक्यपुत्र शाक्यकुलांतून परिव्राजक झालेला अंगुत्तराप देशांत मोठ्या भिक्षूंसंघासह म्हणजे साडेबाराशें भिक्षूंसह, प्रवास करीत असतां ‘आपणा’ला आला आहे आणि त्या भवान् गोतमाची अशी कल्याणकारक कीर्ति फैलावली आहे-“याप्रमाणें तो भगवान्, अर्हन्, सम्यक्-संबुद्ध, विद्याचरण-संपन्न, सुगत, लोकविद्, श्रेष्ठ, दमन करण्यास योग्य अशा पुरुषांचा सारथी, देवांचा आणि मनुष्यांचा गुरु, बुद्ध भगवान् आहे. तो हें सदेवक, समारक, सब्रह्मक जग आणि सश्रमण ब्राह्मणी सदेवमनुष्यप्रजा स्वत: ज्ञानानें साक्षात्कार करून घेऊन जाणतो व उपदेशितो. तो आदिकल्याण, मध्यकल्याण पर्यवसानकल्याण असा धर्म उपदेशितो व सार्थ, सव्यंजन, केवल परिपूर्ण ब्रह्मचर्य प्रकाशित करतो. अशा अर्हन्ताचे दर्शन लाभदायक आहे.”

तेव्हां केणिय जटिल भगवन्तापाशीं आला. येऊन त्यानें भगवन्ताला कुशल प्रश्न विचारले; आणि कुशल प्रश्नादिक संभाषण आटोपून तो एका बाजूला बसला. एका बाजूस बसलेल्या केणिय जटिलाला धार्मिक भाषणाच्या द्वारें भगवन्तानें सन्मार्ग दाखविला, उपदेश केला, उत्तेजित केलें व संप्रहर्षित केलें. तेव्हां भगवन्ताकडून धर्मिक भाषणाच्याद्वारें सन्मार्ग दाखविला गेलेला, उपदेश केला गेलेला, उत्तेजित केला गेलेला व संप्रहर्षित केला गेलेला असा केणिय जटिल भगवन्ताला म्हणाला- भवान् गोतमानें भिक्षुसंघासह उद्यांला माझें आमन्त्रण स्वीकारावें. त्यावर भगवान् केणिय जटिलाला म्हणाला, हे केणिय, भिक्षुसंघ मोठा, साडेबाराशें भिक्षू आणि तूं तर ब्राह्मणांचा भक्त. दुसर्‍यांदाही केणिय जटिल भगवन्ताला म्हणाला-भो गोतमा, जरी मोठा भिक्षुसंघ, साडेबाराशें भिक्षू आणि मी ब्राह्मणांचा भक्त, तरी भवान् गोतमानें भिक्षुसंघासह माझें आमन्त्रण स्वीकारावें. दुसर्‍यांदाही भगवान् केणिय जटिलाला म्हणाला- हे केणिय, भिक्षुसंघ मोठा, साडेबाराशें भिक्षू आणि तूं तर ब्राह्मणांचा भक्त. तिसर्‍यांदाही केणिय जटिल भगवन्ताला म्हणाला-भो गोतमा, जरी मोठा भिक्षुसंघ, साडेबाराशें भिक्षू आणि मी ब्राह्मणांचा भक्त, तरी भवान् गोतमानें भिक्षुसंघासह उद्यां माझें आमन्त्रण स्वीकारावें. कांहीही न बोलतां तें भगवन्तानें स्वीकारलें. तेव्हां भगवन्तानें आपले आमन्त्रण स्वीकरालें असें जाणून केणिय जटिल आसनावरून उठला व आपल्या आश्रमाकडे गेला. आश्रमाला जाऊन तो आपल्या मित्रांना व सग्यासोयर्‍यांना म्हणाला-माझे मित्र आणि सगेसोयरेहो, ऐका. उद्यां मी श्रमण गोतमाला भिक्षुसंघासह जेवण्याचें आमन्त्रण दिलें आहे, त्यासाठीं तुम्ही मला काया झिजवून मदत करा. “ठीक आहे” असें म्हणून त्या केणिय जटिलाच्या मित्रांपैकीं आणि सग्यासोयर्‍यांपैकी कांहीं चुली तयार करूं लागले, कांहीं लांकडे फोडूं लागले, व कांहीं आसनें मांडूं लागले. परंतु केणिय जटिल स्वत:च मंडप तयार करूं लागला.

त्या काळीं सेल (शैल) नांवाचा ब्राह्मण ‘आपणां’त राहत असे. तो निघंटुकैटुभासह१ (१ कवींना उपयोगी पडणारें शास्त्र (टीका)) अक्षरप्रभेदासह व पांचव्या इतिहासासह, तीन वेदांत पारंगत, पदें जाणणारा, वैयाकरण, लोकायत व महापुरुषांची लक्षणें यांत निष्णांत असून तीनशें विद्यार्थ्यांना वेद शिकवीत होता. त्या वेळीं केणिय जटिल सेल ब्राह्मणाचा भक्त होता. तेव्हां सेल ब्राह्मण तीनशें विद्यार्थ्यांसह फिरावयास निघाला असतां, फिरत फिरत केणिय जटिलाच्या आश्रमाच्या बाजूस आला. सेल ब्राह्मणानें केणियाच्या आश्रमांतील कांहीं जटिल चुली तयार करीत आहेत इत्यादी.....परन्तु केणिय जटिल स्वत:च मंडप तयार करीत आहे. हें पाहिलें. पाहून तो केणिय जटिलाला म्हणाला-“भवान् केणियांच्या आश्रमांत मुलाचा किंवा मुलीचा विवाह व्हावयाचा आहे काय? किंवा मोठा यज्ञ होणार काय? अथवा उद्यां सैन्यासह मगधराज श्रेणिय बिंबिसार ह्याला आमंत्रण आहे काय?” “हे सेला, माझ्याकडे मुलाचें किंवा मुलाचें लग्न नाहीं, किंवा सैन्यासह मगधराजा श्रेणिय बिंबिसार ह्यालाही येथें उद्यां आमन्त्रण नाहीं; परंतु येथें मोठा यज्ञ आहे खरा. श्रमण गोतम शाक्यपुत्र शाक्य कुलांतून परिव्राजक झालेला अंगुत्तराप देशांत मोठ्या भिक्षुसंघासह म्हणजे साडेबाराशें भिक्षूंसह प्रवास करीत असतां ‘आपणां’ला आला आहे. आणि त्या भवान् गोतमाची अशी कीर्ती...इत्यादि...बुद्ध भगवान् आहे. त्याला भिक्षुसंघासह उद्यांला मी आमंत्रण दिलें आहे.”
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel