सुत्तनिपाताच्या अभ्यासाचें महत्त्व:-- अनेक दृष्टींनी सुत्तनिपाताच्या अभ्यासाचें महत्त्व आहे. पालि तिपिटकांत जागतिक वाङ्मयांत देखील अंतर्भूत करतां येतील असे जर कोणते दोन ग्रंथ असतील तर ते धम्मपद व सुत्तनिपात हे होत. पालि वाङ्मयाच्या अभ्यासकानें जर हे दोन ग्रंथ वाचले नाहींत तर तें व्यर्थ होय. वर सांगितल्याप्रमाणें (पृ.१९) सुत्तनिपातांत सम्राट् अशोकानें प्रशंसिलेल्या सात सुत्तांपैकीं तीन सुत्तें (१२, ३७, ५४) आहेत. बुद्धाची सर्वांत जुनी शिकवण आपणांस येथें सांपडते. त्याचप्रमाणें बुद्धभिक्षूचें ध्येय काय असावें हेंही सांगितलें आहे. २४०० वर्षांपूर्वीच्या भारताचें सामाजिक चित्रही या पुस्तकांत सांपडतें. श्रमण, ब्राह्मण इत्यादि धार्मिक पंथीयांविषयीं माहिती सांपडते. कांहीं ठिकाणीं लोकांच्या रीति-रिवाजाचा उल्लेख सांपडतो. गाथा ५९८ मध्यें आपणांला अमावस्येनंतर प्रथम दिसणार्‍या चंद्राला वंदन करण्याच्या भारतीय चालीचा उल्लेख सांपडतो. गाथा ४४४ मध्यें योद्धयानें डोक्यावर गवत ठेवून युद्धाला बाहेर पडण्याची चाल दिसून येते. गवत हें विजयी वीराचें चिन्ह आहे. अजून ही चाल हिंदुसाथानांतील कांहीं प्रांतांत दिसते. नवरात्रानंतर विजयादशमीच्या दिवशीं सीमोल्लंघन करण्यास जाणारे लोक डोक्यावरील पागोट्यांत किंवा पगडींत, नवरत्‍नांत घरीं मुद्दाम रोंवून उगवलेलें गवत (धान्य) खोंवून बाहेर पडतात. अशा रीतीनें सीमोल्लंघनास जाणें म्हणजे पावसाळ्यानंतर विजय मिळविण्याच्या ईष्येंनेंच मुलुखगिरीस जाण्यासारखें समजलें जातें. गौतमबुद्धाबद्दलही कांहीं ऐतिहासिक माहिती मिळते. बुद्ध शाक्यवंशीय असून आदित्य कुळांतील होता. नालकसुत्तांतील असित ऋषीच्या दंतकथेंतील पैराणिक भाग वगळला, तरी त्यांत थोडेंबहुत सत्यच असेल असें वाटतें. बुद्धाला विरक्ति येण्याचें कारण म्हणजे बारिकसारिक गोष्टींवरून लोकांची कलहप्रवृत्ति! त्यानें थोड्या पाण्यांत तडफडणार्‍या माशाप्रमाणें या संसारांत झगडणार्‍या लोकांची वृत्ति पाहिली. त्यामुळें भीतिग्रस्त होऊन त्याच्या ठिकाणीं वैराग्य उत्पन्न झालें (९३५-३८). हें साधेंसुधें वर्णन आणि ह्याचसंबंधींचें नंतर लिहिलेलें जातक-अट्ठकथेंतील निदानकथा, अगर ललितविस्तर, अगर अश्वघोषाचें बुद्धचरित्र, ह्यांतील अदभुत वर्णनांत किती महदन्तर! पब्बज्जासुत्तांतील (२७) राजा बिंबिसार व गौतम यांच्या भेटींतील नाट्यमय संभाषणावरून ती एक ऐतिहासिक घटनाच असावी असें वाटतें. प्रधानसुत्तांत (२८) बुद्धानें परमपद प्राप्त करून घेण्याकरितां केलेले प्रयत्‍न व त्यासाठीं त्याच्या मनांत होणारें द्वंद्व, याचें चित्र सांपडतें. बुद्धाचे दोन पट्टशिष्य सारिपुत्त व मोग्गलान यांचाही उल्लेख कोकालीय-सुत्तांत (३६) सांपडतो. सारिपुत्त बुद्धाचा मुलगा राहुल याचा गुरु होता (२३). ह्यानेंच बुद्धाच्या पश्चात् धर्मचक्र चालूं ठेवलें. पारायणवग्गांतील वत्थुगाथांमध्यें आपणांस भारतांतील भौगोलिक माहिती मिळून त्या वेळच्या व्यापारी दळणवळण-मार्गाची कल्पना येते. ह्यासंबंधीचें विवरण पुढें येईलच (पान ३२).

सुत्तनिपाताचे लेखक
:- सुत्तनिपात हा ग्रंथ कांहीं एका लेखकाचें काम नाहीं. हा अनेकांच्या गाथांचा संग्रह आहे. डॉ. र्‍हिस डेव्हिड्स म्हणतात त्याप्रमाणें१ (१. Buddhist India, p. 179.) “सुत्तनिपात” हा एका व्यक्तीच्या प्रयत्‍नांचा परिपाक नसून एका सबंध संघटित वर्गाचा प्रयत्‍न आहे. पहिल्या चार वर्गांतील सूत्रें एकमेकांशीं संबद्ध नाहींत. पांचव्या वर्गांतील सूत्रें मात्र एकमेकांशीं निगडित आहेत हें दाखविण्याकरितां त्या वर्गाच्या आरंभीं व शेवटीं कथानकभाग दिला आहे. ह्या कथानकामुळें हीं सूत्रें एकत्र गोवलीं जातात. अट्ठक व पारायणवग्ग हीं सुरवातीपासूनच स्वतंत्र काव्यें म्हणून ओळखली जात असता व त्यांचा स्वतंत्र उल्लेख बौद्ध वाङ्मयांत येत इसल्याचें वर (पान २१) सांगितलेंच आहेच. तिपिटक ग्रंथांमध्येंच निद्देस नांवाचा टीकाग्रंथ आहे. चूलनिद्देस ह्या दुसर्‍या भागांत पारायणवग्ग व खग्गविसाणसुत्त ह्यांवरील टीका आहे. बुद्धाचा धर्मसेनापति सारिपुत्त यानें ही टीका केली अशी आख्यायिका आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel