भाषांतरकारांची प्रस्तावना

पालि त्रिपिटकाचे सुत्तपिटक, विनयपिटक व अभिधम्मपिटक असे तीन मुख्य विभाग आहेत. सुत्तपिटकाचे पुन: दीघनिकाय, मज्झिमनिकाय, संयुत्तनिकाय, अंगुत्तरनिकाय व खुद्दकनिकाय असें पांच पोटभेद आहेत. खुद्दकनिकायांत जीं १५ प्रकरणें आहेत तीं अशीं—(१) खुद्दकपाठ, (२) धम्मपद, (३) उदान, (४) इतिवुत्तक, (५) सुत्तनिपात, (६) विमानवत्थु, (७) पेतवत्थु, (८) थेरगाथा, (९) थेरीगाथा, (१०) जातक, (११) निद्देस, (१२) पटिसंभिदामग्ग, (१३) अपदान, (१४) बुद्धवंस, (१५) चरियापिटक. म्हणजे सुत्तपिटकांत खुद्दकनिकाय शेवटचा असून त्यांतील १५ प्रकरणांत सुत्तनिपात पांचवा आहे. तेव्हां सकृद्दर्शनीं हें प्रकरण कालमानानें फार प्राचीन नसावें अशी समजूत होणें साहजिक आहे. परंतु बायबलाचे जसे जुना आणि नवा करार असे कालमानावरून भाग पाडले गेले आहेत तसे त्रिपिटकाचे नाहींत.

दीघनिकाय याचा अर्थ मोठा निकाय असा नसून मोठ्या प्रमाणांच्या सूत्रांचा संग्रह असा आहे. मिज्झिमनिकाय म्हणजे मध्यम प्रमाणाच्या सूत्रांचा, संयुत्तनिकाय म्हणजे गद्यपद्यमिश्रित व इतर विविध विषयांवरील सूत्रांचा संग्रह. अंगुत्तरनिकाय म्हणजे ज्यांत एक वस्तूचा, दोहोंचा, तीहींचा, तहत अकरा वस्तूंचा समावेश होतो अशा सूत्रांचा संग्रह. उत्तरोत्तर एक एक अंग (वस्तु) वाढत जाते म्हणून याला अंगुत्तर (अंग + उत्तर) ही संज्ञा या चारही निकायांत असा मजकूर आहे कीं, जो सुत्तनिपातांतील मजकुराहून बराच अर्वाचीन ठरेल. खुद्द खुद्दकनिकायांत तर सुत्तनिपाताएवढें दुसरें कोणतेंहि प्राचीन प्रकरण नाहीं.

भाबरा येथील शिलालेखांत खालील सात धर्मपर्यायांचा निर्देश केला आहे. (१) विनयसमुकसे (२) अलियवसानि (३) अनागतभयानि (४) मुनिगाथा (५) मोनेयसूते (६) उपतिसपसिने (७) लाघुलोवादे मुसावादे अधिगिच्य भगवता बुधेन भासिते. यांतील विनयसमुकसे हें कोणतें सुत्त असावें याचा अद्यापि निकाल लागला नाही. तथापि सध्यां माझी अशी समजूत झाली आहे कीं, येथें अशोकानें धम्मचक्कपवनसुत्तालाच विनयसमुकसे म्हटलें असावें. विनय शब्दावरून एकदम विनयग्रंथ किंवा त्यांत उपदेशिलेले नियम
यांजकडे लक्ष जातें. त्या विनयाचा समुत्कर्ष ज्यांत आहे असें कोणतेंहि सुत्त पालि ग्रंथांत आढळत नाहीं. परंतु विनय या शब्दाचा ‘उपदेश’ असाही दुसरा अर्थ आहे. आणि त्या अर्थी हा शब्द नसला तरी हा धातु पुष्कळ ठिकाणी वापरलेला आढळून येतो. उदा. – चूळ-सच्चक सुत्तांतील (मज्झिम नि. नं. ३४) “कथं पन भो अस्सजि समणो गोमणो सावके विनेति.” येथें विनेति किंवा विनयति या शब्दाचा संबंध कोणत्याही रीतीनें विनयग्रंथांतील नियमाशीं नाहीं. “हे अस्सजि, श्रमण गोतम आपल्या श्रावकांना काय उपदेशितो?” – असा त्याचा सरळ अर्थ आहे. तेव्हां विनय याचा उपदेश असा अर्थ धरला तर त्या उपदेशाचा समुत्कर्ष म्हणजे धम्मचक्कपवनसुत्तच धरावें लागेल. कारण यांतील उपदेशाला अनेक ठिकाणीं ‘बुद्धानं सामुक्कंसिका धम्मदेस१ना’(१. उदाहरणार्थ, उपालिसुत्त, मज्झिम नि. भाग १ [P.T.S.] पुष्ठ ३८० पहा.) असें म्हटलें आहे. या सुत्ताचें तिपिटकांत फारच महत्त्व आहे. तेव्हां तें अशोकानें आपल्या यादीच्या अग्रभागीं घातलें असल्यास आश्चर्य नाहीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel