दुसर्‍यांच्या मतांचें खंडन करीत करीत व स्वत:च्या पंथांचे स्तोम माजवीत हे धर्मगुरू देशभर हिंडत असत व आपापल्या पंथांचे अनुयायी वाढवीत. स्वत:करितां किंवा लोकांकरितां भरीव कार्य कांहीही न करतां हे लोक उगीचच आपलें मत आढ्यतेनें सांगत व वादविवाद करीत फिरत असत. अशीं प्रतिपादिलीं जाणारीं तार्किंक मतें ६३ प्रकारचीं होतीं असें गाथा ५३८ मध्यें सांगितलें आहे. अशा उपदेशकांचे अनुकरण न करण्याबद्दल गौतमबुद्धानें आपल्या अनुयायीजनांना सक्त ताकीद दिलेली होती. अट्ठकवग्गांत अशीं कैक सुत्तें आहेत कीं ज्यांत, “स्वत:च्या मतांचें प्रदर्शन करूं नये व दुसर्‍यांच्या मतांना तुच्छ लेखूं नये” (७८२, ७९८, ८६०, ९१८, ९५४, ९६५), असें स्पष्ट म्हटलें आहे जो, दुसर्‍यांनीं विचारल्याशिवाय, आपल्या तत्त्वाचें किंवा मताचें प्रदर्शन करतो, त्यास शहाणे लोक “अनार्य-धर्मी” समजतात असें सांगितलें आहे (७८२). निरनिराळ्या पंथांत ज्यायोगें वादविवाद माजतील अशा तर्‍हेचें वर्तन आपल्या अनुयायीजनांनी करूं नये अशी बुद्धाची इच्छा होती (वादं च जातं मुनि नो उपेति ७८०; ७८७, ७९६, ८२५, ९२७ इ.). तसेंच त्यांनीं आपली तुलना दुसर्‍यांशी करून, आपल्याला श्रेष्ठ, कनिष्ठ अथवा इतरांशीं समान समजूं नये (७९९, ८४२, ८५५, ८६०, ९१८, ९५४). दुसर्‍यांचे सिद्धान्त कितीही अपायकारक असले तरी आपण सहिष्णुता दाखवावी अशी बुद्धाची शिकवण होती (९६५). आपल्या तत्त्वज्ञानाला चिकटून राहण्यांतच शुद्धि आहे असें कांहीं श्रमणांचें म्हणणें होतें (८२४). अशा तर्‍हेच्या मतांना चिकटून राहून ते सभागृहांतून वादविवाद करीत व अन्य मतांच्या लोकांना मूर्ख ठरवीत. ह्या श्रमणांचें वर्तन व त्यांची धर्मासंबंधीची आस्था पाहून या लोकांचे चार वर्ग कल्पिलेले आहेत—(अ) मार्गजिन, (आ) मार्गदर्शक, (इ) मार्गजीवी व (ई) मार्गदूषक (८४-९१).

(आ) ब्राह्मण- ब्राह्मणांचाही एक महत्त्वाचा वर्ग होता. हे लोक तीन वेद, निघण्टु, इतिहास, व्याकरण, ज्योतिष, छन्द:शास्त्र वगैरेमध्यें निष्णात होते व शेंकडो लोकांना विद्यादान करीत असत. चौथ्या वेदाचें नांव आथब्बण (आथर्वण) असें गाथा ९२७ मध्यें सांगितलें आहे. परंतु या वेदाचा अभ्यास फारसा स्तुत्य नव्हता असें दिसतें. ब्राह्मणांना मंत्रबंधू (मन्तबन्धुनो, १४०) असें म्हटलें असून सावित्री हा त्यांचा मुख्य मंत्र सांगितला आहे (४५७). ब्राह्मणधम्मिक-सुत्तामध्यें (१९) ब्राह्मणांची अधोगति कशी झाली व ते नीतिपासून व साध्या राहणीपासून कसे च्युत झाले हें सांगितलें आहें. ब्राह्मण लोभी बनले, राजांच्या चैनी जीवनाबद्दल त्यांना आसक्ति उत्पन्न झाली व ते सुंदर स्त्रिया व पैसा यांचा स्वीकार करूं लागले. तसेंच राजदरबारीं जाऊन अश्वमेध, पुरुषमेध, शम्याप्रास, वाजपेय व निरर्गड अशा नावानें ओळखले जाणारे यज्ञ करूं लागले; निरपराध गाई मारल्या जाऊं लागल्या व धर्माचा र्‍हास होऊन अधर्म पसरूं लागला. ९८ रोगांनीं पृथ्वीतल काबीज केलें. स्त्रिया पतीबद्दल अनादर दाखवूं लागल्या व सगळीकडे गोंधळ व गैरव्यवस्था उत्पन्न झाली. ह्याची महाभारतात (भांडारकर संशोधन-मंदिर प्रत, १२. २५४. ४५-४७) सांगितलेल्या १०० रोगांच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीशीं तुलना करण्याजोगी आहे. ज्यामध्यें प्राणिहत्या होते अशा यज्ञांबद्दल बुद्धानें नापसंति दर्शविली आहे.

सुन्दरिकभारद्वाज व माघसुत्तांमध्यें पुण्याची इच्छा करणार्‍या ब्राह्मणानें तथागताला, म्हणजे बोधिप्राप्त झालेल्या कोणाही व्यक्तीला, जातगोत न पाहतां दान द्यावें असें लिहिलें आहे. बुद्धाच्या मतें हाच खरा यज्ञ होय. ब्राह्मण्य हें उच्चकुलोत्पत्तीवर अवलंबून नसून आचार-विचारांवर अवलंबून आहे हें तत्त्व वासेट्ठसुत्तामध्यें (३५) “त्याला मी ब्राह्मण म्हणतों” अशा तर्‍हेचें धृपद असलेल्या गाथांमध्यें निक्षून सांगतिलें आहे व्यक्तीच्या जन्माला महत्त्व नसून त्याच्या आचारविचाराला महत्त्व आहे हें तत्त्व महाभारतामध्येंहि१ [१. महाभारतावर बौद्धमताची छाप—ह्यासंबंधीं सविस्तर विवेचन, “The Buddhist Influence on the Mahabharata, (The Buddhist, Vesak 1955, Ceylon, Pages 75-77.) ह्या माझ्या निबंधांत सापडेल.] सांगितलेलें आढळतें—

“श्रृणु यक्ष कुलं तात न स्वाध्यायो न च श्रुतं।
कारणं हि द्विजत्वे च वृत्तमेव न संशय।।” : ३. ३१३. १०८

ब्राह्मण जर वाईट वर्तनाचा (असदवृत्त) असेल व शुद्र जर सच्छील असेल तर तो ब्राह्मणाप्रमाणेंच पूजार्ह होय असें अनुशासनपर्व (चित्रशाळाप्रत, १४३. ४७-५९) मध्यें सांगितलें आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel