पारायणवग्ग सुत्तनिपाताच्या शेवटीं यावा हें यथायोग्यच आहे. या वग्गांतच बुद्धानें बौद्धांचें जें उच्च ध्येय, निर्वाण किंवा मोक्ष, ह्यासंबंधीं उत्तरें देऊन त्या सोळा शिष्यांचें समाधान केलें आहे. भवसागर कशा रीतीनें तरून जावा, लोभ व तृष्णा यांचा कसा नाश करावा, दृष्टि (दिट्ठि), शील व व्रत या कशामध्येंही आसक्त न होतां, मृत्यूची भीति न बाळगतां, या जगांत संपूर्ण सुखाचें स्थान कसें मिळवितां येईल—हें सांगितलें आहे. थोडक्यांत म्हटलें म्हणजे मृत्यूपार जाण्याचा, विमोक्षाचा किंवा निर्वाणाप्रत जाण्याचा, मार्ग सांगितला आहे (१०८९, ११०९, १११९).

आदर्शमुनि व त्याचें जीवन :- आदर्श मुनीच्या जीविताविषयीं व त्याच्या ध्येयप्रप्तीकरितां कराव्या लागणार्‍या यत्‍नाविषयींची माहिती देणारीं बरींच सुत्तें या ग्रंथांत आहेत. एका जुन्या वचनाला सुत्तनिपाताचा पाठिंबाच मिळतो—“न यिदं सुकरं अगारं अज्झावसता एकन्तपरिपुण्णं एकन्तपरिसुद्धं संखलिखितं ब्रह्मचरियं चरितुं” (दीघ, सूत्र २,§४१). “जो मनुष्य घरांत राहतो त्याला संपूर्णपणें निष्कलंक असें जीवित जगणें कठिण.” हें माहीत असल्यामुळें मुनि सर्व ऐहिक वस्तूंपासून व इष्टमित्रांपासून दूर राहतो. कारण त्यांचा सहवास दु:खास कारणीभूत होईल असें तो समजतो. तो रानांत राहतो व भिक्षा मागण्यापुरताच गांवांत येतो. भिक्षा मिळवून गावांतील राजकारणांत किंवा इतर भानगडींत न पडतां लगेच तो रानांत परततो. उत्तम वागणूक ठेवतो, म्हणजे प्राणिहत्या, अब्रह्मचर्य, चोर्‍या, खोटें बोलणें व मद्यपान इत्यादीपासून दूर राहतो. उच्च आसनें, अलंकार, फुलें अत्तरें यांचा त्याग करून तो साधें आयुष्य घालवितो. सोन्या-चांदीचा स्वीकार करीत नाहीं, खरेदी-विक्रींत गुंतून पडत नाहीं, कोणाचें दास्य पत्करीत नाहीं; अधोदृष्टि ठेवून, चंचलता वर्ज्य करून, तो सरळ मार्गानें चालतो. दिवसांतून एकदांच जेवतो व तें सुद्धां मध्याह्न होण्यापूर्वींच. तो मिताहार घेतो. पोट फुटेल इतकें जेवत नाहीं. तो कोणाला ज्योतिष सांगून किंवा औषधें देऊन किंवा अथर्व-वेदांतल्याप्रमाणें मंत्रतंत्र सांगून आपली उपजीविका करीत नाहीं. स्वप्नांचीं फळें सांगत नाहीं किंवा पशुपक्ष्यांच्या ओरडण्यांतील मर्मही सांगत नाहीं. तो पातिमोक्खांतील नियमांचें कडक पालन करतो व शरीर, मन व जिव्हा यांवर संयम राखतो. नफा-तोटा, सुख-दु:ख, स्तुति-निंदा, कीर्ति-अपकीर्तिर्‍यांमुळें त्याचें मन हेलावत नाहीं, आज मी कुठें झोपूं?” (९७०), इत्यादि विचारांना थारा देत नाहीं. शीत-उष्ण ह्यांसारखे हवामानांतील फरक तो सहन करतो. चिलटें, डांस किंवा भुईवर सरपटणार्‍या प्रण्यांच्या दंशासंबंधीं तो पर्वा करीत नाहीं. जेवणानंतरची दुपार ध्यानचिंतनांत घालवतो. रूपावचर-अरूपावचर-ध्यानें प्राप्त करून घेतो किंवा ब्रह्मविहाराची भावना करतो; म्हणजे विश्वांतील अखिल प्राणिमात्रांवर दया करतो, रोगांनीं पछाडलेल्या लोकांबद्दल करुणा बाळगतो, लोकांच्या भरभराटींत आनंद मानतो, पण कशांतही त्याचें मन आसक्त राहत नाहीं. सर्वांच्याबद्दल त्याच्या भावना समान असतात.

मुनीचें तत्त्वज्ञान :- मुनि कामभोगांत बेहोषहि होत नाहीं, किंवा उलटपक्षी देहदंडही आचरणांत आणीत नाहीं. दोन्ही टोंकें कटाक्षानें टाळून तो सुवर्ममध्य स्वीकारतो. शाश्वतदृष्टि किंवा उच्छेददृष्टि या दोन्हीपासूनही तो दूर राहतो. बौद्ध तत्त्वज्ञानांतील तीन तत्त्वांवर त्याची अढळ श्रद्धा असते. म्हणजे जगांतील प्रत्येक वस्तु ‘अनित्य’ आहे, ‘दु:खमय’ आहे, व ‘अनात्म’ आहे, म्हणजे तत्त्वत: आपली म्हणता येईल अशी, किंवा चिरकाल टिकणारी अशी, नाहीं हें जाणतो. मुनीचा विश्वास असा कीं जग हें कर्मानुसारी आहे-

“कम्मना वत्तति लोको, कम्मना वत्तति पजा।
कम्मनिबन्धना सत्ता रथस्सणीव यायतो ।” (६२५)

जगांतील दु:खांवर विचार करून त्याला चार आर्यसत्यें व जगांतील कार्यकारणभाव (पटिच्चसमुप्पाद) यांचें ज्ञान चांगलें झालेलें असतें. अविद्येमुळें तृष्णा उत्पन्न होते व तृष्णा हें सर्व दु:खाचें मूळ आहे, हें तो जाणतों. द्वयतानुपस्सनासुत्तांत (३८) हें स्पष्ट सांगितलें आहे कीं सर्वसाधारण लोक अज्ञानामुळें हा नियम जाणत नाहींत (भवरागपरेतेहि भवसोतानुसारिहि। मारधेय्यानुपन्नेहि नायं धम्मो सुसंबुधो।। (७६४). ज्या स्थितींत सर्व आश्रवांचा नाश होतो त्याचें ज्ञान फक्त आर्यांनाच होतें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel