२० महिने
अहमदनगरचा किल्ला. १३ एप्रिल १९४४
आम्हाला येथे आणण्यात आले त्या गोष्टीला आता वीस महिन्यांहून अधिक दिवस झाले. तुरुंगाची ही माझी नववी खेप. या नवव्या खेपेचेही इतके दिवस गेले. आम्ही आलो तेव्हा शुक्लपक्षातील चंद्रकोरीने आमचे स्वागत केले होते. आकाश अधिकच काळेभोर दिसत होते आणि त्यात ती चंद्रकोर लकाकत होती. चंद्रकोर कलेकलेने वाढत होती. त्या वेळेपासून पुन्हा नवीन बीजेचा चंद्र आला की तुरुंगवासाचा आणखी एक महिना संपला असे जाणवत असे. माझी तुरुंगवासाची मागची खेपही अशीच शुक्लपक्षाबरोबरच सुरू झाली होती. तेव्हा दीपावली—तो प्रकाशाचा (रोषणाईचा) उत्सव नुकताच संपला होता आणि नवी चंद्रकोर दिसू लागली होती. चंद्र हा मला तुरुंगवासातील चिरमित्र वाटे. अधिक परिचयामुळे आमची जवळची मैत्री जमली. चंद्र म्हणजे जगातील रमणीयतेचे स्मरण करून देणारा ; जीवनातील क्षयवृध्दीची आठवण देणारा; अंधारामागून येणार्या प्रकाशाची, मरणानंतर येणार्या जीवनाची—अखंड परंपरांची स्मृती करून देणारा. सदैव बदलणारा परंतु सदैव तोच आहे. चंद्राच्या निरनिराळ्या कला मी पाहात आलो आहे. त्याच्या निरनिराळ्या दशा मी अवलोकिल्या आहेत. सायंकाळी तो कसा दिसतो, रात्रीच्या प्रशांत समयी किंवा उगवत्या दिवसाची आशा फुलविणार्या उष:कालच्या मंदमधुर वातावरणात तो कसा शोभतो ते सारे सारे मी अवलोकिले आहे. दिवस नि महिने मोजायला चंद्राचा किती बरे उपयोग आहे ! चंद्र दिसत असला की त्याच्या आकारावरून महिन्याचा कोणता दिवस आहे हे आपण साधारणपणे बिनचूक सांगू शकतो. चंद्र म्हणजे सहज समजणारे आपले पंचांगच (अर्थात वेळोवेळी ते नीट समजून घ्यावे लागते). ॠतू हळूहळू कसे बदलत आहेत. किती काळ लोटला आहे हे कळायला शेतावरील शेतकर्यास चंद्रासारखे दुसरे साधन कोणते ?
तीन आठवडे जगातील घडामोडींचा आम्हाला पत्तादेखील लागू दिला गेला नाही. कोणत्याही प्रकारे बाहेरच्या विश्वाशी संबंध राहिला नाही. भेटी नाहीत, पत्रे नाहीत, वर्तमानपत्रेही नाहीत की नभोवाणीही नाही. ज्यांच्या ताब्यात आम्ही होतो त्या सरकारी अधिकार्यांव्यतिरिक्त दुसर्या कोणासही आम्ही नगरच्या किल्ल्यात असल्याची माहिती नव्हती असे सरकार समजत होते. आमचे वास्तव्यस्थान हे एक सरकारी गुपित होते. परंतु आम्ही कोठे होतो हे अवघ्या हिंदुस्थानाला माहीत होते ! कसचे ते गुपित नि काय ! हळूहळू आम्हाला वर्तमानपत्रे मिळू लागली. आठवडाभराने फक्त घरगुती गोष्टी असलेली घरची पत्रेही मिळू लागली. परंतु गेल्या वीसएक महिन्यांत कोणाची भेट नाही की बाह्य जगाशी दुसरा कोणता संबंध नाही.
वृत्तपत्रांतील बातम्यांवर कडक नियंत्रण असे. तरीहि निम्म्याहून अधिक जगाला ग्रासणार्या महायुध्दाची थोडीफार कल्पना त्यांवरून येई. तसे त्या युध्दाच्या झळा आमच्या हिंदी जनतेला कशा लागत असत तेही कळे. पण फारच थोडे. हजारो-लाखो हिंदी माणसे तुरुंगात आहेत; चौकशीविना ठायी ठायी स्थानबध्द केलेले आहेत. हजारो गोळ्या घालून मारले गेले; हजारोंना शाळा-कॉलेजांतून बडतर्फ करण्यात आले; एक प्रकारचा लष्करी कायदाच जणू हिंदुस्थानभर थैमान घालतो आहे; भीती आणि दहशत पसरून एक प्रकारचा अंधारच सर्वत्र पसरला आहे (याशिवाय त्या वृत्तपत्रातून अधिक काय कळणार म्हणा !) इतकेच काय पण आमच्याप्रमाणे जे सहस्त्रावधी लोक विनाचौकशी तुरुंगात डांबले गेले होते त्यांची स्थिती तर आमच्यापेक्षाही वाईट होती. त्यांना भेटी मुलाखती नसत- एवढेच नाही, तर पत्रे, वर्तमानपत्रेही देण्यात येत नसत. पुस्तकांचीही क्वचितच परवानगी मिळे. चांगले अन्न नसे म्हणून कितीतरी आजारी होऊन पडत. योग्य औषधपाणी न मिळाल्यामुळे आणि काळजी न घेतली गेल्यामुळे आमची काही माणसे तर देवाघरीही गेली.
हजारो युध्दकैदी—प्रामुख्याने इटलीतील हिंदुस्थानात आणून ठेवण्यात अले होते. त्यांच्या परिस्थितीशी आम्ही आमच्या लोकांच्या परिस्थितीची तुलना करीत असू. महायुध्दातील कैद्यांना जिनेव्हा येथील आंतरराष्ट्रीय करारानुसार वागविण्यात येत असल्याचे आम्हाला सांगण्यात येई. परंतु हिंदी राजबंदी, हिंदी राजकैदी यांच्या बाबतीत मात्र करार नाही, नियम नाही की कायदा नाही. वेळोवेळी ब्रिटिश सत्ताधीश लहरीप्रमाणे जे वटहुकूम काढतील— व जी फर्माने सोडतील त्याबरहुकूम हिंदी स्थानबध्दांना, हिंदी राजकीय कैद्यांना जीवन कंठावे लागे.