आपल्यांतील ज्या कोणी संस्कृतचे अध्ययन केले असेल त्यांनाही या प्राचीन भाषेच्या संपूर्ण अंतरंगाची ओळख होणे, त्या प्राचीन युगात जाऊन पुन्हा जगू पाहणे सोपे नाही.  तथापि प्राचीन परंपरेचे आपण वारसदार असल्यामुळे आणि आपल्या कल्पनांभोवती त्या प्राचीन जगाचा सुगंध अद्याप दरवळत असल्यामुळे काही अंशी तरी या भाषेच्या आत्म्याचे दर्शन आपण घेऊ शकू.  आपल्या आजच्या हिंदी भाषा संस्कृतोद्भवच आहेत.  या भाषांतील शब्दसंपत्ती संस्कृतातूनच घेतलेली आहे, अर्थप्रकटीकरणाचे प्रकारही संस्कृतापासूनच आले आहेत.  परभाषेत भाषान्तरित करण्यास कठीण असे संस्कृत काव्यातील व तत्त्वज्ञानातील शेकडो समृध्द व अर्थपूर्ण शब्द आपल्या आजच्या भाषांतून जसेच्या तसे जिवंत वावरत आहेत, आणि जनतेची भाषा या नात्याने संस्कृत जरी कधीच मृत झाली असली, तरी तिच्यात अद्यापि आश्चर्यकारक जिवंतपणा आहे.  परंतु विदेशी पण्डित कितीही विद्वान असले तरी त्यांच्यामार्गात कितीतरी जास्त अडचणी असतात.  दुर्दैवाची गोष्ट ही की, पंडित व विद्वान लोक हे बहुधा कवी नसतात, आणि भाषेचे स्वरूप विशद करून दाखविण्यासाठी ज्याच्याजवळ पांडित्याची आणि काव्यशक्तीची उभयविधा शक्ती आहे असा मनुष्य हवा.  केवळ पंडितापासून एम. बार्थ याने म्हटल्याप्रमाणे आपणांस फक्त ''निर्जिव, केवळ शाब्दिक भाषान्तरे'' मिळत असतात.

म्हणून तौलानिक व्युत्पत्तिशास्त्राची जरी प्रगती झाली असली, संस्कृत भाषेसंबंधी जरी बरेचसे संशोधन झाले असले, तरी भाषेकडे कवीच्या दृष्टीने, प्रेमळ सहानुभूतीच्या दृष्टीने पाहण्याच्या बाबतीत फारसे प्रयत्न झालेले नाहीत.  हे अभ्यासक्षेत्र अद्याप रूक्ष व उजाड आहे.  संस्कृतातील कोणत्याही ग्रंथाचे इंग्रजी किंवा दुसर्‍या कोणत्याही भाषेतील भाषांतर पाहा, बहुतेक रद्दी व मूळच्या ग्रंथाला न शोभेसे भाषांतर करणारे हिंदी असोत वा परदेशी असोत, दोघेही या बाबतीत अपयशी आहेत.  त्यांच्या अपयशाची कारणे मात्र भिन्नभिन्न आहेत.  अशी सुंदर भाषांतरे जगाला देता येऊ नयेत ही केवढी दु:खाची गोष्ट !  कारण संस्कृतात जे जे सुंदर आहे, उदात्त आहे, कल्पनारम्य आहे, अर्थगंभीर आहे त्याचा वारसा केवळ हिंदुस्थानापुरता नसून सार्‍या मानवजातीसाठी आहे.

बायबलचे इंग्रजीत ज्यांनी भाषांतर केले, त्यांना कडक शिस्त, मूळच्या ग्रंथाविषयी आदर आणि त्यातील अर्थाशी एकरूप करणारी अंतर्दृष्टी होती.  त्यामुळे इंग्रजी भाषेत त्यांनी एक मोठा ग्रंथ निर्मिला, एवढेच नव्हे, तर त्या भाषेला त्यांनी प्रतिष्ठा आणि सामर्थ्य दिले.  युरोपियन पंडितांच्या व कवींच्या शेकडो पिढ्यांनी ग्रीक व लॅटिन भाषेचा भक्तिप्रेमाने अभ्यास करून अनेक युरोपियन भाषांतून त्यांची सुंदर, सरस भाषांतरे केली.  त्यामुळे तिकडील सामान्य जनताही त्या प्राचीन संस्कृतीचा आस्वाद घेऊ शकते आणि आपल्या रोजच्या रटाळ जीवनातही सत्याचे, सौंदर्याचे अंधुक दर्शन घेऊ शकते.  संस्कृतातील ग्रंथांच्या बाबतीतही ही गोष्ट अद्याप व्हावयाची आहे की खेदाची गोष्ट होय.  हे काम केव्हा होईल, होईल की नाही, ते मला सांगता येत नाही.  आपल्यामध्ये विद्वान लोक आहेत, त्यांची संख्या व विद्वत्ता वाढत आहे, आपल्यांत कवीही आहेत.  परंतु प्राचीन वाङ्मय व आजचे कवी व विद्वान लोक यांच्यामध्ये दिवसेंदिवस वाढता दुरावा होत आहे.  आमच्या सर्जनशक्ती आज निराळ्या दिशेने जात आहेत; आजच्या जगाचे अनेक प्रश्न आ पसरून आपल्या डोळ्यांसमोर असतात; त्यामुळे प्राचीन वाङ्मयाचे नीट सावकाश अध्ययन करायला फारसा वेळच आपल्याला नसतो.  परंतु हिंदुस्थानातील विद्वानांनी तरी अत:तर दुर्लक्ष करून चालणार नाही.  कारण आतापर्यंतचा गेलेला वेळ भरून काढावयाचा आहे.  भूतकाळात आपण आपल्या प्राचीन वाङ्मयात खूप डुंबत होतो.  परंतु आपल्यातील सर्जनशक्ती पुढे नष्ट झाल्यामुळे, त्या आपण मोठे मोलाचे म्हणत असलेल्या त्या प्राचीन वाङ्मयातूनही आपणांस स्फूर्ती मिळेनाशी झाली.  प्राचीन संस्कृत ग्रंथांचे अनुवाद अद्यापिही होत राहतील, मूळची संस्कृत नावे नीट छापली गेली आहेत किंवा नाही त्याकडे पंडित लोक काळजीपूर्वक पाहतील, टीका, टिप्पणी, विवरणे भरपूर असतील, अभ्यासपूर्ण विवेचन असेल.  हे सारे मनापासून केलेले पुढे दिसून येईल, परंतु एकाच गोष्टीचा अभाव तेथे असेल.  मुळातही जिवंत वृत्ती येणार नाही, जे मुळात चैतन्यमय, आनंदमय व सौंदर्यमय होते, ज्यात कल्पनापूर्ण साहस होते, संगीत होते, ते सारे नीरस, निष्प्राण, निरानंद, शिळे असे आपणांसमोर उभे राहते; मूळचे ते तारुण्य व सौंदर्य नष्ट होऊन पंडितांच्या अभ्यासाची धूळ आणि रात्रभर जळून विझलेल्या दिव्याचा वास आपल्याला अनुभवावा लागतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel