सारांश, हिंदुस्थानचे व जगाचे भवितव्य, निदान ब्रिटिशांच्या राज्यकर्त्या, वर्गाच्या हाती होते तेवढ्यापुरते तरी, भूतकाळापेक्षा वेगळे नव्हते, आणि वर्तमानकाळालाही त्याच पंक्तीला बसणे भागच होते. ह्याच वर्तमानकाळात त्या भविष्याची बीजे पेरली जात होती. क्रिप्स यांनी मांडलेल्या सूचना वर वर दिसायला जरी प्रगतिकारक भासत असल्या तरी वस्तुत: त्यांच्यात अशी काही नव्या भयानक अडचणी पेरलेल्या होत्या की, त्यांतून आम्हाला स्वातंत्र्याच्या वाटेवर दुर्लंघ्य अडथळे येण्याचा धोका निर्माण व्हावा. तसे पाहू गेले तर आता एवढ्या थोड्या काळात देखील त्यांची ती कामगिरी थोडीफार यशस्वी होऊन गेली आहे. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकारची सर्वव्यापी अरेरावी हुकुमशाही वृत्ती, व त्या सारकारने अगदी साध्या, नेहमीच्या नागरिक हक्कांची व स्वातंत्र्याची जिकडे तिकडे चालवलेली दडपणूक यांची या युध्दाच्या कालात, युध्दाचे निमित्त करून पराकाष्ठा झाली. हल्लीच्या पिढीच्या कोणाच्याही आठवणीत असा कळस कधी झाला नव्हता. या चाललेल्या प्रकारामुळे आमच्या गुलामगिरीची, आमच्या कायमच्या मानहानीची जाणीव आम्हाला सतत होत होती. आमच्या भवितव्याची रूपरेषा दाखविणारे ते एक लक्षणच होते, कारण वर्तमानकाळी जे काय घडेल त्यातूनच भविष्य निर्माण होणार. आम्हाला असे वाटे की, ही मानहानी सोसण्यापेक्षा आमचे काय वाटेल ते झाले तरी चालेल.
हिंदुस्थानातल्या किती लोकांची ही अशी भावना झाली असेल ? ते सांगणे शक्य नाही. ह्या कोट्यवधी लोकांपैकी बहुतेक सार्यांची संवेदनाशक्ती दारिद्र्याने व दैन्याने पार बधिर झाली आहे. बाकी जे कोणी उरले त्यांपैकी काहींना नोकर्या, तर काहींना अधिकार व काहींचे पूर्वापार हितसंबंध निर्माण झालेले, म्हणून ते सरकारचे मिंधे झालेले होते, व काहींना त्यांच्या पुरते विशेष हक्क मिळण्याची आमिष समोर असल्याने त्यांचे चित्त तिकडेच लागले होते. परंतु एकंदरीत पाहिले तर ही भावना बहुतेक सार्या लोकांनाच होती, मात्र तिचे प्रमाण व्यक्तीपरत्वे कमी-अधिक होते, आणि काहींच्या मनात या भावनेवर इतर भावनांची पुटे चढली होती एवढेच. या भावनेच्या अनेक पायर्या होत्या. काही लोकांची भावना श्रध्देइतकी तीव्र होती, त्यापायी तो धोका पत्करण्याची त्यांना हौस होती व त्यामुळे अर्थातच त्यांच्या हातून प्रत्यक्ष कार्य घडे, तर काही लोकांची भावना मोघम सहानुभूतीची असल्यामुळे ते दूर उभे राहून नुसते हळहळत. दु:खाची जाणीव मनाला विशेषच लागून घेण्याची ज्यांची प्रवृत्ती होती त्यांना त्यांच्या भोवतालचे हे खिन्न वातावरण असह्य होऊन जीव कोंडल्यासारखे वाटे, परिस्थितीचा काच मानेभोवती बसून श्वास घेववत नसे. इतरांची वृत्तशी मनाला कोणतीही गोष्ट फारशी लागू न देण्याची, सामान्य माणसाची असल्यामुळे, भोवतालची परिस्थिती त्यांना आवडत नसली तरी तिच्याशी जुळते घेऊन चालण्याचे त्यांना अधिक साधत असे.
हिंदुस्थानचा राज्यकारभार चालविणार्या हिंदुस्थानातल्या ब्रिटिश अधिकार्यांची मनोवृत्ती पाहू लागले तर तो अगदी वेगळाच देखावा वाटे. हिंदी व ब्रिटिश लोक यांच्यात मनोमनी जे प्रचंड अंतर पडलेले आहे ते पाहून मन स्तिमित होते. त्यात न्याय कोणाचा अन्याय कोणाचा हा प्रश्न वेगळा, पण एवढे अंतर आहे ह्या एकाच मुद्दयावरून हिंदुस्थानचे राज्य चालविण्याची ब्रिटिशांची पात्रता नाही हे अगदी स्पष्ट आहे. कारण, कोणत्याही देशाची काहीही प्रगती करायची म्हटले तर राज्यकर्ते व प्रजा यांच्यामध्ये मेळ असला पाहिजे, दोघांचीही दृष्टी काही एकाच साध्यावर स्थिर असली पाहिजे, नाहीतर एकाचे तोंड एकीकडे तर दुसर्याचे भलतीकडे होऊन अप्रत्यक्ष विरोध किंवा प्रत्यक्ष लढा होणार हे निश्चितच आहे. हिंदुस्थानातले ब्रिटिश अधिकारी, म्हणजे ब्रिटनच्या अत्यंत प्रतिगामी वर्गाचे नमुने आहेत, ब्रिटनमधील उदारमतवादी परंपरेच्या वर्गात आणि ह्या ब्रिटिश अधिकार्यांत साम्य काहीच नाही. हिंदुस्थानात हे अधिकारी जितकी अधिक वर्षे काढतील तितकी त्यांची वृत्ती अधिक ताठर बनत जाते आणि हेच लोक सेवानिवृत्त होऊन परत विलायतला जाऊन तेथे राहू लागले की, हिंदुस्थानातल्या प्रश्नावरचे ते तज्ज्ञ ठरून त्यांचा त्या बाबतीत सल्ला घेतला जातो. आपल्या हातून कधी चूक म्हणून व्हायचीच नाही, ब्रिटिश राज्य हिंदुस्थानला अत्यंत आवश्यक आहे व ब्रिटिश राज्यामुळे हिंदुस्थानचे कोटकल्याण झालेले आहे, जगात ज्यांनी साम्राज्ये चालवली त्यांच्या थोर परंपरेचे प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे ह्या उच्च कर्तव्याची धुरा वाहण्याची मोठी कामगिरी आली आहे अशी त्यांची खात्री असते. ह्या राज्याला उघड आव्हान देऊन काँग्रेसने मुळालाच हात घातला व ब्रिटिश राज्यातून हिंदुस्थानला सोडविण्याची खटपट चालविली, तेव्हा अर्थातच या अधिकार्यांच्या दृष्टीने ही काँग्रेस म्हणजे सगळ्यात वाईट, काँग्रेस म्हणजे समाजाचा क्रमांक एकचा शत्रू. सर रेजिनाल्ड मॅक्सवेल हे हिंदुस्थान सरकारच्या मंत्रिमंडळातले गृहमंत्री होते, त्यांनी सन १९४१ साली मध्यवर्ती कायदेमंडळात केलेल्या भाषणातून त्यांच्या अंतरंगाचे ओझरत दर्शन घडले. काँग्रेस पक्षाचे, समाजवादी पक्षाचे व कम्युनिस्ट पक्षाचे लोक चौकशी विना तुरुंगात ठेवलेले असताना त्यांना गुरासारखे वागविले जाते, जर्मन व इटालियन युध्दकैद्यांना देखील यापेक्षा बरी वागणूक असते असा गृहमंत्र्यांवर आरोप होता व ते आपल्या कृत्यांचे समर्थन करीत होते. तेव्हा सर रेजिनाल्ड यांनी असे उद्गार काढले की, काहीही झाले तरी हे जर्मन व इटालियन आपल्या देशाकरिता तरी लढले होते, पण काँग्रेसवाले, समाजवादी व कम्युनिस्ट हे स्वदेशाचे शत्रू आहेत, कारण हल्ली असलेली राज्याची व्यवस्था उधळून लावण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला असतो. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळावे, तेथील आर्थिक व्यवस्थेची घडण बदलावी अशी एका हिंदी माणसाने मागणी करावी, असे त्याचे मत असावे, हाच ह्या गृहमंत्र्यांच्या दृष्टीने केवढा बेछूटपणा, केवढे धाडस ! ह्या गृहमंत्र्यांच्या मायदेशाचे इटली व जर्मनी यांच्याशी अगदी निकाराचे युध्द जुंपलेले असले तरी त्या जर्मन किंवा इटालियनांपैकी कोणीही झाला तरी तो मॅक्स्वेलसाहेबांना हिंदी लोकांपेक्षा जवळचा वाटे, हे यावरून स्पष्टच दिसले. हे भाषण झाले तेव्हा रशिया या युध्दात शिरला नव्हता, म्हणून सामाजिक व्यवस्था बदलण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो गुन्हेगार आहे अशी भाषा वापरण्यात मंत्रिमहाशयांना काही धोका नव्हता. हे दुसरे महायुध्द सुरू होण्यापूर्वी हुकूमशाही, सोटेशाही राजवटींची अनेकवार अनेकांकडून प्रशंसा ऐकू येत होतीच. स्वत: हिटलरने आपल्या 'मीन काम्फ' या पुस्तकात व त्यांनतरही, ब्रिटिश साम्राज्य असेच पुढेही कायम राहावे अशी आपली इच्छा बोलून दाखविली होती ना ?