उद्योगधंद्यांची वाढ, प्रांतिक भेद
१८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दानंतर आलेला थकवा जाऊन हळूहळू हिंदुस्थान सावरत गेला. ब्रिटिशांचे हे असे धोरण असूनही त्या धोरणाविरुध्द देशात स्थित्यंतर घडवून आणणार्या अनेक प्रबळ शक्तींचे कार्य चाललेच होते व समाजाला एक वेगळीच नवीन जाणीव येऊ लागली होती. राजकीय दृष्ट्या सर्व देशभर एकच सत्ता चालत होती. पश्चिमेकडील देशांशी संबंध येत होता, यंत्रशास्त्रात प्रगती होत होती, त्यामुळे व सर्व देशाला एकाच गुलामगिरीत राहावे लागत होते; त्यामुळेही नवीन विचारप्रवाह सुरू झाले, उद्योगधंद्यांची धीरेधीरे वाढ होत गेली व राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी नवीन चळवळीचा उदय होऊ लागला. हिंदुस्थानची ही जागृती द्विविध होती. लोकांची दृष्टी पश्चिमेकडे वळली व शिवाय स्वत:कडे, पूर्वीच्या स्वत:च्या स्थितीकडेही वळली.
हिंदुस्थानात आगगाडी आल्यामुळे प्रत्यक्ष स्वरूपात औद्योगिक युग इकडे आले. तोपर्यंत ब्रिटिशांकडून येणार्या पक्क्या मालाच्या अप्रत्यक्ष स्वरूपातच नवीन औद्योगिक युग येथे माहीत झाले होते. हिंदुस्थानात यांत्रिक उद्योगधंदे वाढू नयेत म्हणून येथे येणार्या यंत्रसामग्रीवर जकात असे. ती १८६० मध्ये उठविण्यात आली व मोठ्या प्रमाणातील कारखानदारी येथे मुख्यत: ब्रिटिश भांडवलावर वाढू लागली. प्रथम बंगालमध्ये ज्यूटचा धंदा सुरू झाला. त्याची सर्व सूत्रे स्कॉटलंडमध्ये डंडी येथून हलविली जात. पुढे बर्याच वर्षांनी अहमदाबाद व मुंबई येथे हिंदी भांडवल आणि हिंदी मालकी मुख्यत्वे असलेल्या कापसाच्या कापडाच्या गिरण्या सुरू झाल्या. नंतर खाणी सुरू झाल्या. हिंदुस्थानातील ब्रिटिश सरकार अडथळा करीतच होते. लॅकेशायरच्या कापडाशी स्पर्धा करता येऊ नये म्हणून देशातल्या देशात हिंदी कापडावर जकात बसविण्यात आली. देशात खून, दरोडे, मारामारी असल्या प्रकारचे गुन्हे होऊ नयेत असा बंदोबस्त राखणे यापलीकडे काही एक काम राज्यकर्त्यांनी करू नये असे सरकारी धोरण होते. याची सर्वांत उत्तम खूण अशी की विसाव्या शतकापर्यंत शेतकी खाते, उद्योगधंद्याचे खाते, व्यापारी खाते ही मुळी अस्तित्वातही आली नव्हती. माझ्या समजुतीप्रमाणे एक अमेरिकन या देशात आला होता त्याने दिलेल्या देणगीतून हिंदी शेती सुधारण्यासाठी म्हणून मध्यवर्ती सरकारात शेतकी खाते सुरू करण्यात आले. (हे शेतकीखाते आजही एक क्षुल्लक खाते म्हणूनच आहे.) १९०५ मध्ये व्यापार व उद्योगधंद्याचे खाते उघडण्यात आले. परंतु एकंदरीत ह्या दोन्ही खात्यांचा व्याप अगदीच किरकोळ प्रामाणात सुरू राहिला. हिंदी उद्योगधंद्यांची वाढ कृत्रिम रीतीने मुद्दाम मर्यादित केली होती आणि हिंदुस्थानची आर्थिक स्थिती जी आपोआप सुधारली असती तीही त्यामुळे थांबली.
हिंदुस्थानातील बहुजनसमाज कमालीचा दरिद्री होताच, तो दिवसेंदिवस अधिकाधिक दरिद्री होत गेला. काही वरचे मूठभर लोक मात्र नवीन परिस्थितीत भरभराटत होते. भांडवल जमवीत होते. हे मूठभर लोक राजकीय सुधारणा मागू लागले व भांडवल गुंतवायला संधी मागू लागले. राजकीय क्षेत्रात १८८५ मध्ये हिंदी राष्ट्रीय सभा स्थापन करण्यात आली. हळूहळू व्यापार व उद्योगधंदे वाढत होते व लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही की शेकडो वर्षे जे वर्ग परंपरागत धंदा म्हणून या कामात होते तेच त्यांत मुख्यत: पडले. अहमदाबाद शहर मोगल अमदानीत किंबहुना त्यांच्या अगोदरच्या काळातही माल तयार करण्याचे व व्यापाराचे प्रसिध्द केंद्र होते व तेथून परदेशापर्यंतही माल पाठविला जाई. तेच शहर आता नवीन उद्योगधंद्यांचेही केंद्र बनले. अहमदाबादच्या बड्याबड्या व्यापार्यांची स्वत:च्या मालकीची मोठमोठी गलबते असत आणि आफ्रिका, इराणपर्यंतचा दर्यावर्दी व्यापार ते चालवीत. भडोच तर ग्रीक-रोम काळीही सुप्रसिध्द बंदर म्हणून गाजलेले होते.