सातव्या शतकाच्या आरंभी ज्याने नवीन साम्राज्य स्थापिले तो राजा हर्ष नाटककार होता. त्याची तीन नाटके उपलब्ध आहेत. इ.सन ७०० च्या सुमारास संस्कृत साहित्याच्या आकाशातील एक तेजस्वी तारा भवभूती हा झाला. त्याच्या नाटकांचे भाषांतर करणे कठीण, कारण भाषेतील सौंदर्य हाच त्याचा प्रधान गुण आहे. भवभूती फार लोकप्रिय आहे. कालिदासाच्या खालोखाल त्याचेच स्थान मानण्यात येते. ऑक्सफर्डच्या विद्यापीठात वुइल्यम हा संस्कृताचा आचार्य होता. तो म्हणतो, ''भवभूती आणि कालिदास यांच्या काव्यांतील भाषेसारखी नादमधुर, सुंदर आणि भव्योदात्त भाषा अन्यत्र कल्पिणे कठीण आहे.''
संस्कृत नाट्याचा प्रवाह काही शतके वहात राहिला. परंतु नवव्या शतकाच्या आरंभी मुरारी हा नाटककार झाला. त्यानंतर या कलेचा हळूहळू र्हास होऊ लागलेला आढळतो. जीवनाच्या अन्य क्षेत्रांतही हळूहळू र्हासाची लक्षणे दिसू लागली होती. हिंदुस्थानात अफगाण, मोगल यांची राजसत्ता पुढे आली व राजदरबारी या कलेचा आधार उरला नाही, त्याचे मुख्य कारण भारतीय नाट्यकला भारतीय परंपरेशी व धर्माशी दृढ संनिबध्द होती व इस्लामी धर्मही नाट्यरूप कलेला प्रतिकूल होता, अशा प्रकारची कारणे नाट्यकलेच्या र्हासासंबंधी देण्यात येतात. भारतीय नाट्यकलेत बरेचसे बहुजनसमाजाला प्रिय असले तरी एकंदरीत ही कला नबाबीच होती, वरिष्ठांची होती. थोरामोठ्यांच्या आश्रयानेच ती जगत होती. वाढत होती. हे सारे खरे असले तरी केवळ राजकीय क्रांतीमुळे ही कला नष्ट झाली असे म्हणवत नाही. नवीन राज्यकर्ते, निराळ्या परंपरेचे आले म्हणून थोडासा परिणाम होणे अपरिहार्यच होते. परंतु हे राजकीय फेरफार होण्यापूर्वीच भारतीय नाट्यकला अवनत होत होती हे स्पष्टच आहे. आणि राजकीय घडामोडी काही शतके तरी वरती उत्तर हिंदुस्थानात होत होत्या. भारतीय नाट्यकलेत काही राम उरला असता, काही चैतन्य असते तर ती दक्षिणेकडे फुलली असती. हिंदुस्थानातील अफगाण, तुर्क, मोगल राजे सामान्यत: हिंदी संस्कृतीला उत्तेजन देणारेच होते. कलाद्वेषी काही राजांचा अपवाद सोडून देऊ. परंतु सामान्यत: हिंदी संस्कृतीत भरच पडली. तिच्यात नवीन प्रकार आले, नवीन रंग भरले.
मुसलमान राजांनी हिंदी संगीत तर संपूर्णपणे उचलले व राजेमहाराजे अमीर उमराव यांच्या दरबारात संगीताचे साम्राज्य असे. संगीत शास्त्रात मान्यता मिळविलेल्या संगीताचार्यांत काही मुसलमानही होते. वाङ्मय, काव्य यांनाही उत्तेजन देण्यात आले आणि हिंदीतील प्रसिध्द कवींत मुसलमानही आहेत. विजापूरचा बादशहा इब्राहिम अदिलशहा याने हिंदी संगीतावर हिंदी भाषेत एक पुस्तकही लिहिले. हिंदी काव्य व हिंदी संगीत यांतून हिंदू देवदेवतांचे सर्वत्र उल्लेख आहेत. परंतु त्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार घातला गेला नाही, त्यांचा स्वीकार करून जुनी रूपके, दंतकथा, आख्यायिका यांची परंपरा सुरूच राहिली. मुसलमान राजांनी मूर्तीच्या शिल्पाला विरोध केला असेल, परंतु इतर नानाविध कलात्मक निर्मितींना त्यांनी सहसा विरोध केला नाही, त्या कलास्वरूपांना दडपले नाही. अर्थात काही अपवाद असतील.
संस्कृत नाट्यकलेचा र्हास होऊ लागला, कारण त्या काळात हिंदी जीवनातच र्हास शिरला होता. सर्जनशक्तीच लोपत होती. दिल्लीच्या सिंहासनावर अफगाण आणि तुर्क बसण्याच्या कितीतरी वर्षे पूर्वीच संस्कृत नाट्यकलेला उतरती कळा लागली होती. पुढे संस्कृत भाषेला दरबारी रूढ होणार्या पर्शियन भाषेशी तोंड द्यावे लागले. एक सबळ कारण हे दिसते की, संस्कृत नाटकातील भाषा आणि जनतेच्या रोजच्या व्यवहारातील भाषा यांत दिवसेंदिवस अपार अंतर पडत चालले होते. इ.सन १००० च्या सुमारास ज्यातून आपल्या आजच्या अर्वाचीन भाषा समृध्द झाल्या, त्या भाषा सर्वत्र उदयाला आल्या होत्या आणि त्यांनी वाङ्मयीन स्वरूप धारण केले होते.