संमिश्र संस्कृतीचा समन्वय व विकास
पडदा, कबीर, गुरू नानक, अमीर खुश्रू
ब्रिटिशांच्या हिंदुस्थानात येण्याला ज्याप्रमाणे ख्रिश्चनांचे आक्रमण असे म्हणता येणार नाही, किंवा हिंदुस्थानातील ब्रिटिश कालखंडला ख्रिश्चन कालखंड असे म्हणता येणार नाही, त्याचप्रमाणे मुसलमानांची हिंदुस्थानवर स्वारी किंवा हिंदुस्थानातील मुसलमान कालखंड असे म्हणणे चुकीचे व गैरसमज करणारे आहे. इस्लामने हिंदुस्थानवर स्वारी केली नाही, कितीतरी शतके त्याच्याआधी इस्लामी धर्म हिंदुस्थानात आला होता. हिंदुस्थानवर तुर्कांनी (गझनीचा महमूद) स्वारी केली; अफगाणांनी केली, तुर्को-मोगल किंवा मोगल यांनी केली. या तिघांपैकी शेवटच्या दोघांच्या आक्रमणाला महत्त्व होते. अफगाण हे हिंदुस्थानच्या हद्दीजवळचेच लोक, हिंदुस्थनला ते परके नव्हते. अपरिचित नव्हते. आणि हिंदुस्थानातील त्यांच्या राजकीय वर्चस्वाच्या काळाला इंडो-अफगाण काळ असे म्हटले पाहिजे. मोगल हे बाहेरचे आणि परके होते. परंतु हिंदी वातावरणाशी ते झपाट्याने एकरूप झाले, आणि इंडो-मोगल कालखंड सुरू झाला.
स्वेच्छेने किंवा परिस्थितीमुळे किंवा दोन्हीमुळे अफगाण राजांना आणि त्यांच्याबरोबर आलेल्यांना हिंदी जीवनाशी मिळून जावे लागले. त्यांची घराणी संपूर्णपणे हिंदी झाली, त्यांची पाळेमुळे या भूमीत खोल गेली, हिंदुस्थान त्यांची मातृभूमी झाली, आणि इतर देश त्यांना परके वाटू लागले. राजकीय झगडे असत; तरीही त्यांना हिंदुस्थानातले असे मानण्यात येऊ लागले; आणि पुष्कळ रजपूत राजांनीही त्यांची अधिसत्ता मान्य केली. परंतु काही रजपूत राज्यांनी त्यांचे प्रभुत्व मान्य केले नाही आणि मोठमोठ्या भयंकर लढाया झाल्या. फिरोजशहा हा दिल्लीचा एक सुप्रसिध्द सुलतान होता. त्याची आई हिंदू होती. घियासुद्दीन तघलखाची आईही हिंदू होती. अफगाण, तुर्क आणि हिंदू सरदार घराणी यांच्यामध्ये असे विवाह फारसे होत नसले तरी होत असत ही गोष्ट खरी. दक्षिणेकडे गुलबर्ग्याच्या एका मुसलमान राजाने विजयानगरच्या हिंदू राजकन्येशी मोठ्या थाटामाटाने लग्न लावले होते.
मध्य व पश्चिम आशियातील देशांमध्ये हिंदी लोकांविषयी आदरबुध्दी होती. हिंदी लोकांचा नावलौकिक तिकडे पसरला होता. अफगाणांनी हिंदुस्थानावर स्वार्या करण्यापूर्वी, त्याच्या खूप अगोदर, अकराव्या शतकातील इद्रिसी या मुसलमान भूगोलवेत्त्याने लिहिले आहे; ''हिंदी लोकांची सामान्य प्रवृत्ती न्यायाकडे असते; न्यायापासून ते कधीही व्यवहारात दूर जात नाहीत; ते प्रामाणिक आहेत; केलेला करार, दिलेला शब्द पाळण्याविषयी ते प्रसिध्द आहेत. त्यांच्या या गुणांची कीर्ती इतकी दूरवर पसरली आहे की, सार्या दिशांतून त्यांच्या देशात लोकांच्या झुंडी येत असतात.'' *
राज्यकारभाराची घडी चांगली बसली व लष्करी उपयोगाकरता दळणवळणाची साधने सुधारण्यात आली. मध्यवर्ती सत्ता जरी प्रबळ असे तरी स्थानिक रिवाजात फारशी ढवळा-ढवळ केली जात नसे. मोगल काळात मध्यंतरी काही वर्षे सूर घराणे दिल्लीच्या गादीवर होते. शेरशहा हा त्यातील सर्वांत कर्तबगार असा अफगाण सुलतान होऊन गेला. जमाबंदी खात्याचा त्याने नीट पाया घातला. अकबराने तीच पध्दती पुढे वाढविली. अकबराचा महसूल खात्याचा सुप्रसिध्द प्रधान तोडरमल हा शेरशहाच्या तालमीत तयार झालेला होता. अफगाण राज्यकर्त्यांनी हिंदू बुध्दिमत्तेची अधिकाधिक मदत घेण्याचे धोरण ठेवले होते.