महायुध्दाविषयी काँग्रेसचे धोरण
महायुध्दाविषयी काँग्रेसने स्वीकारावयाचे धोरण व्दिविध होते, व ते काँग्रेसने एकदा ठाम ठरवून त्या धोरणाचा वारंवार पुनरुच्चारही वरील हकीकतीत आला आहे तसा केला. त्या धोरणाचे एक अंग असे होते की, फॅसिस्टशाही, नाझीशाही, जपानी लष्करशाही, या सर्व राजवटींनी ज्या प्रकारे आपापल्या देशातील राज्याचा कारभार चालविला होता व परदेशावर आक्रमण चालविले होते त्या प्रकाराला विरोध करून त्या आक्रमणाला बळी पडलेल्या जनतेबद्दल अत्यंत सहानुभूती बाळगणे, व हे आक्रमण थांबवण्याकरिता युध्द किंवा दुसरे काही उपाय कोणी केले तर त्या युध्दाला व उपायांना संतोषपूर्वक सहाय्य करणे. काँग्रेसच्या व्दिविध धोरणांचे दुसरे अंग असे होते की, हिंदुस्थान देश स्वतंत्र व्हावा असा काँग्रेसचा विशेष आग्रह होता. हा आग्रह धरण्याचे कारण म्हणजे त्या एका स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन आम्ही सतत तोच उद्योग श्रमपूर्वक करीत आलो होतो. एवढेच नव्हे, तर संभाव्य युध्दाच्या दृष्टीनेही विशेषत: ते स्वातंत्र्य विशेष अवश्य होते. हिंदुस्थान स्वतंत्र झाला तरच हिंदुस्थान देशाला या आगामी युध्दातील कामगिरीत योग्य तो भाग उचलणे शक्य होते. गेल्या काळात या देशाचे व ब्रिटनचे जे संबंध आले होते त्यांत निर्माण झालेला सारा कडूपणा विसरून जाऊन जनतेत उत्साहाचे भरते येणे व देशातील मोठे मनुष्यबळ, साधनसंपत्ती गोळा होणे शक्य होते. हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आगामी महायुध्द सुरू झाले तर, दोन परस्परविरोधी साम्राज्यशाहींचा एक लढा, ब्रिटिशसाम्राज्यशाहीचे रक्षण करून तिला अढळ करून ठेवणे, हे जे जुन्या युध्दांचे स्वरूप, त्याहून या नव्याचे स्वरूप वेगळे नसणार. ज्या साम्राज्यशाहीविरुध्द आम्ही इतकी वर्षे लढा चालवला होता त्याच साम्राज्यशाहीच्या रक्षणाकरिता आम्ही खांद्याला खांदा भिडवून सिध्द व्हावे हे आम्हाला अशक्य दिसे, मूर्खपणा वाटे. अधिक दूरवरचा विचार पाहून त्यातल्यात्यात हाच ह्या साम्राज्यशाहीशी सहकार्य करण्याचा पर्याय म्हणजे दगडापेक्षा वीट मऊ असे जरी आमच्यापैकी काही लोकांना वाटत असले तरी आमच्या देशबांधवांची मन:स्थिती या पर्यायाला अनुकूल करणे हे आम्ही करू म्हटले तरी आमच्या आटोक्याबाहेर होते. देशाला स्वातंत्र्य मिळाले तरच जनतेत चैतन्य येऊन राज्यकर्त्यांविषयी वाटणार्या द्वेषाच्या जागी त्यांच्या पक्षाविषयी अभिनिवेश संचारणे शक्य होते. हे सारे घडवून आणण्याला दुसरा मार्गच नव्हता.
काँग्रेसने स्पष्ट शब्दात अशी मागणी केली की, देशातील जनतेची किंवा त्या जनतेच्या प्रतिनिधींची संमती घेतल्यावाचून हिंदुस्थान सरकारने या देशाला कोठल्याही युध्दाच्या भानगडीत गुंतवू नये, व अशी संमती मिळाल्यावाचून हिंदी फौजा देशाबाहेरच्या कामगिरीवर पाठवू नयेत. अनेक पक्ष व गट असूनही मध्यवर्ती कायदेमंडळाने हिंदी फौजांबाबत हीच मागणी मांडली होती. साम्राज्यवादी हेतूने चालविलेल्या कामगिरीवर व ज्या देशाशी हिंदुस्थानचे काहीही भांडण नाही. इतकेच नव्हे तर गेलेले स्वातंत्र्य पुन्हा मिळविण्याकरिता त्या देशातून चाललेल्या चळवळींना आमची सहानुभूती आहे अशा देशांवर आक्रमण करण्याकरिता किंवा त्यांना दडपून टाकण्याकरिता पुष्कळ प्रसंगी आमच्या हिंदी फौजा बाहेर देशी पाठविण्यात येतात या अन्यायाचा निषेध हिंदी लोकांनी फार वर्षांपासून चालविला होता. ह्या असल्या कामगिरीकरिता भाडोत्री फौजेप्रमाणे हिंदी फौजांचा उपयोग ब्रह्मदेश, चीन, इराण व मध्यपूर्व आशियामधील देशांतून, सरकारने चालविला होता. ह्या सार्या देशांतून हिंदी सैन्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्यशाहीचे प्रतीक होऊन बसले होते व त्यामुळे तद्देशीय जनतेत हिंदुस्थानशी वैरभाव पसरला होता. ''तुम्ही आपले स्वातंत्र्य तर गमावून बसलातच, पण शिवाय तुम्ही आता दुसर्यांचे स्वातंत्र्य घालवायला ब्रिटिशांना हातभार लावता'' असे एका इजिपिशअनचे कडू उद्गार मला आठवतात.