पण महायुध्द वाढत चालले तेव्हा उत्तरोत्तर असे स्पष्ट दिसू लागले की, काही जागतीक स्थित्यंतर घडवून आणावे या हेतूने नव्हे, उलट आहे तीच जागतिक परिस्थिती अबाधित राखण्याकरिताच पाश्चिमात्य लोकशाही राष्ट्रांनी हे महायुध्द चालविले आहे. हे महायुध्द सुरू होण्यापूर्वीच्या काळात त्यांनी इटालीच्या फॅसिस्ट (सोटेशाही) तत्त्वाने चालणार्‍या राजवटीला काही बळी देऊन संतुष्ट केले होते, त्याचे कारण त्या राजवटीला विरोध केला तर त्यापासून होणार्‍या परिणामाचे भय एवढेच नव्हते.  या पाश्चात्य लोकशाही राष्ट्रांना फॅसिस्ट तत्त्वाबद्दल थोडीफार आत्मीयता वाटत होती, व फॅसिस्ट पध्दतीऐवजी जे काही इतर पर्याय करता येण्याजोगे होते त्यांचा ह्या लोकशाही राष्ट्रांना मनापासून तिटकारा होता.  युरोपात नाझीवाद व फॅसिस्टवाद ह्या तत्त्वप्रणाली निघाल्या त्या एकाएकी चमत्कार व्हावा किंवा एका क्षणात कोयीचे झाड बनावे असा काही एक प्रकार न होता यथाक्रम निघाल्या होत्या.  त्या अस्तित्वात येण्यापूर्वी जे काही घडत गेले त्याच्या ओघाच्या अनुरोधानेच, त्याचा परिणाम म्हणून ह्या तत्त्वप्रणालींचा उदय होणे प्राप्त होते.  साम्राज्यवाद, वंशभेदावर आधारलेले वर्तन, अनेक देशांतून चाललेल्या राष्ट्रीय चळवळी व त्यामुळे चाललेले लढे, राज्यसत्तेचे वाढते केंद्रीकरण, निरनिराळ्या व्यवहारोपयोगी पदार्थांच्या उत्पादनात रासायनिक व यांत्रिक साधनांच्या द्वारे झालेली सुधारणा व चालू समाजव्यवस्थेत होत असलेली त्या सुधारणेची कुचंबणा, लोकशाही ध्येय व प्रचलित सामाजिक घटना ह्यांच्यामध्ये येणारा मूलभूत विरोध असल्या अनेक कारणांपासून परिणामी ही फॅसिस्ट व नाझी तत्त्वप्रणाली साहजिकच उदयाला आली.  पश्चिम युरोप व उत्तर अमेरिका येथील देशांतून प्रचलित असलेल्या लोकशाही स्वरूपाच्या राजवटीमुळे तेथील राष्टांच्या व व्यक्तींच्या प्रगतीची वाट मोकळी झाली होती व त्याबरोबरच आर्थिक समतेचे ध्येय असलेल्या नव्या कल्पना व नव्या शक्ती यांनाही मोकळीक मिळाली होती.  अशी एकंदर जागतिक परिस्थिती असल्यामुळे या नानाप्रकारच्या तत्त्वप्रणालींचा कोठे ना कोठेतरी संघर्ष होणे क्रमप्राप्तच होते.  राज्यांच्या लोकशाही पध्दतीचा एकतर प्रसार होत जाणार, नाहीतर त्या पध्दतीला बंधने पडून तिचा नाश करण्याचे प्रयत्न होत जाणार.  लोकशाही या शब्दाने प्रतीत होणारा अर्थ त्यात अधिक भर पडून विस्तार पावू लागला, व जगात ते तत्त्व मान्य करणारे प्रदेश अधिक होऊ लागले.  लोकशाहीला सारखा विरोध होत असूनही तिचा अर्थ व प्रदेश वाढत चालला, आणि राज्यव्यवस्थेच्या क्षेत्रात लोकशाही हे सर्वमान्य ध्येय होऊन बसले.  परंतु असे होता होता वेळ अशी आली की, लोकशाहीची आणखी वाढ झाली तर त्यामुळे समाजाच्या चालू असलेल्या व्यवस्थेला धोका पोचण्याचा संभव आला, तेव्हा या चालू व्यवस्थेचे पाठीराखे आरडाओरडा करू लागले व लोकशाही विरुध्द चढाईचे धोरण आखून त्यांनी प्रस्तुत व्यवस्थेत काही स्थित्यंतर होऊ नये म्हणून आपल्या मताच्या लोकांची संघटना केली.  ज्या देशात नव्या विरुध्द जुन्या मतांचा हा लढा लवकरच अगदी निकरावर येण्यासारखी परिस्थिती होती त्या देशातून लोकशाही उघडपणे हेतुपूर्वक चिरडून टाकण्यात आली व तेथे फॅसिझम व नाझीझम यांची तत्त्वप्रणाली उदयाला आली.  पश्चिम युरोप व उत्तर अमेरिका इकडच्या लोकशाही राज्यांतूनही नव्या-जुन्यांमध्ये विरोधाची ही क्रिया सुरू होती, परंतु इतर कारणांमुळे निकराचा प्रसंग लांबणीवर पडला, आणि सामोपचाराने जुळते घेऊन चालण्याची तेथील लोकशाही राजवटीची जी दीर्घतर परंपरा होती तिचाही हा प्रसंग टळण्याच्या कामी उपयोग बहुधा झाला असावा.  पश्चिम युरोप व उत्तर अमेरिका येथील लोकशाही राजवटीच्या देशाबाहेर त्या देशांची साम्राज्ये इतर देशांवर पसरलेली होती.  ह्या इतर देशांतून फॅसिझमच्या तत्त्वाशी निगडित संबंध असलेली हुकुमशाही राज्यपध्दती चालू होती, आणि फॅसिस्ट राजवटीच्या देशाप्रमाणे ह्याही देशांतून राज्यकर्त्यांच्या वर्गाने त्या देशातील प्रतिगामी, संधिसाधू किंवा सरंजामशाही काळातले अवशेष राहिलेले असे जे गट होते त्यांच्याशी सख्य ठेवून देशातील स्वातंत्र्याची मागणी दडपून टाकण्याचे कार्य चालविले होते.  एवढ्यावर न थांबता या राज्यकर्त्यांनी या देशातून असेही जोरजोराने सांगायला कमी केले नाही, की लोकशाही हे ध्येय म्हणून अगदी उत्तम असले, व आमच्या स्वत:च्या देशात लोकशाही आम्हाला पाहिजे असली तरी आमच्या साम्राज्यातील या इतर देशांतील विशिष्ट परिस्थितीच्या दृष्टीने पाहता लोकशाहीने ह्या देशांचे कल्याण होणार नाही.  अशी एकंदर जगाची परिस्थती होती, तेव्हा, फॅसिस्ट राजवटीतील त्यातल्या त्यात विशेषच पाशवी व हीन मनोवृत्ती दाखविणारे काही प्रसंग ह्या पाश्चात्य लोकशाही राष्ट्रांना आवडत नसले तरी त्यांना त्या फॅसिझमच्या तत्त्वाबद्दल केवळ एक विचार म्हणून थोडाफार बंधुभाव वाटणे क्रमप्राप्तच होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel