म्हणून, राष्ट्राचा पूर्वेतिहास केवळ त्याज्य म्हणून टाकून देऊन किंवा ग्राह्य म्हणून गिरवीत बसून, राष्ट्राची प्रगती होणार नाही. नवे नवे नमुने तर घेत राहिले पाहिजेच, पण ते घेताना त्यांचा आपल्याजवळच्या पूर्वीच्या नमुन्याशी मेळ घातला पाहिजे. एखादा बाहेरचा नवा प्रकार अगदीच वेगळा असला तरी तो अशा रीतीने स्वीकारला तर आपल्याजवळच जुन्या प्रकाराचाच तो एक पर्याय काय तो आहे असे वाटते आणि आपण पूर्वीचेच पुढे चालवतो आहो, आपल्या विशिष्ट मानववंशाच्या प्रदीर्घ इतिहासाच्या साखळीत आणखी एक कडी घालून ती वाढवतो आहोत अशी भावना येते. भारतीय इतिहास पाहिला तर अशा रीतीने नव्यानव्या गोष्टी जुन्यांचाच पर्याय म्हणून प्रचारात कशा आणल्या गेल्या, नव्या परिस्थितीशी जुळेल अशा रीतीने जुन्या कल्पना नव्या प्रकाराने कशा मांडल्या गेल्या, नव्याजुन्याचा मेळ कसा घातला गेला, ह्या सतत चाललेल्या क्रमाचा मन चकित करून टाकणारा वृत्तान्त त्यात स्पष्ट आढळतो. ह्या सतत चालत आलेल्या क्रमामुळे भारतीय इतिहासाच्या, भारतीय संस्कृतीच्या प्रवाहाच्या धारेत कोठेही खंड पडलेला भासत नाही, आणि मोहें-जो-दारोच्या अतिप्राचीन कालापासून ते आजच्या चालू काळापर्यंत अनेकवार अनेक घडामोडी होऊन जाऊनही भारतीय समाजाचे हे सातत्य, ही अखंडता, टिकून आहे. प्राचीन भारतीय इतिहासात आढळणार्या ह्या वृत्तान्तांवरून त्या काळच्या लोकांत भूतकालीन गोष्टीविषयी व स्मृतिपरंपरागत चालत आलेल्या आचार-विचार विधिनियमांविषयी आदरबुध्दी होती असे दिसते, पण या आदरबुध्दीच्या जोडीला मनाची स्वतंत्रबुध्दी, विकासक्षमता व परमतसहिष्णुताही होती असा प्रत्यय येतो. त्यांच्या ह्या मनोवृत्तीचा परिणाम असा झाला की, त्या समाजात अनेक गोष्टींचे बाह्यरूप तेच राहिले असले तरी आतून त्या गोष्टी पालटत जाण्याची क्रियाही अखंड चालू राहिली. तो समाज कित्येक हजार वर्षे टिकून राहिला. तसे टिकून राहणे इतर कोणत्याही उपायांनी शक्य नव्हते. त्या समाजाच्या अंतर्यामीची मनोवृत्ती जिवंत व वर्धिष्णू होती म्हणूनच त्याच्या स्मृतिपरंपरागत बाह्यरूपाचा कडकपणा त्याला बाधला नाही, व परंपरागत आचार-विचार विधिनियम यांनी बाह्यरूप निश्चित करून ठेवले होते म्हणूनच समाजाला स्थैर्य आले व तो टिकून राहिला.
परंतु या दोन दृष्टीमधोमध संभाळावा लागणारा तोल डळमळीत होण्याचाही संभव असतो व तसे झाले म्हणजे त्यापैकी एकच दृष्टी अधिक प्रभावी होऊन दुसरी तिच्यामुळे दडपली जाणे शक्य आहे. हिंदुस्थानात विचार-स्वातंत्र्याला विलक्षण मोकळीक होती व त्याच्या जोडीला समाजव्यवस्थेचे काही कडक निर्बंध होते. पुढे शेवटी असे झाले की, या निर्बंधांची छाया मानसिक स्वातंत्र्यावर पडली व विचारक्षेत्रात नसले तरी आचारक्षेत्रात ते निर्बंध अधिक कडक व संकुचित होत गेले. पाश्चात्त्य युरोपात अशा प्रकारचे विचार-स्वातंत्र्य पूर्वी मुळीच नव्हते, व समाजव्यवस्थेच्या निर्बंधात तेथे एवढा कडकपणा नव्हता. युरोपात विचारस्वातंत्र्याकरिता लोकांना फार दीर्घकाल झगडावे लागले व त्याचा परिणाम असा झाला की, असे झगडत असताना त्यांचे सामाजिक निर्बंध पालटत गेले.
चीनमध्ये हिंदुस्थानपेक्षाही अधिक मानसिक स्वातंत्र्य होते, आणि तेथील लोकांना आपल्या स्वत:च्या परंपरेविषयी इतके प्रेम असूनही, व ते त्या परंपरेला इतके चिकटून राहूनही तेथील लोकांची परमतसहिष्णुता, मनाचा लवचिकपणा कधीही लोपला नाही. चीनमध्ये स्थित्यंतरे व्हावयाला काही प्रसंगी परंपरा आडवी आल्यामुळे अधिक वेळ लागे, पण स्थित्यंतरे करायला तेथील लोक भीत नसत, मात्र कोणत्याही गोष्टीत फेरफार करायचा झाला तरी ते त्या गोष्टीची परंपरागत ठोकळ रूपरेषा पूर्वीचीच ठेवीत. परंपरागत निर्बंध व मानसिक स्वातंत्र्य यांचा चिनी लोकांनी सुरेख समन्वय साधून असा काही तोल सांभाळला की तो हजारो वर्षात अनेक घडामोडी होऊनही ढळला नाही. ज्या काही गुणात इतर देशांच्या मानाने चीन फारच पुढारलेला आहे, त्यात कर्मठपणा किंवा धर्मसंप्रदायाविषयी संकुचित दृष्टी यांचा लवलेशही अंगी नसणे व बुध्दिप्रामाण्य आणि व्यवहारी सुज्ञपणावर भिस्त ठेवणे हे त्यांचे गुण धरता येतील. देशात विशिष्ट संस्कृतीची रचना करताना धर्माचा आधार, चीनइतका कमी, कोणत्याच देशात घेतला गेलेला नाही, आणि संस्कृतीत सद्गुण, नीतितत्त्वे, व मानवी जीवनातील चित्रविचित्र विविधतेचा अर्थ काय आहे हे उमजण्याची विशाल दृष्टी यांना चीन देशात दिले आहे तितके महत्त्व इतर कोणत्याच देशात दिले गेलेले नाही.