नवीन समस्या

अरब आणि मोगल


उत्तर हिंदुस्थानात प्रतापी राजा हर्षवर्धन राज्य करीत असताना आणि प्रख्यात चिनी यात्रेकरू व विद्यार्थी ह्युएनत्सँग नालंदा विद्यापीठात अभ्यास करीत असताना, अरबस्थानात इस्लामी धर्म रंगरूप घेत होता.  राजकीय व धार्मिक नवशक्ती म्हणून इस्लाम भारतात यायचा होता आणि नवीन प्रश्न उत्पन्न करणार होता.  परंतु हिंदी घडामोडींत महत्त्वाचे फेरबदल घडवून आणण्याला इस्लामला अद्याप पुष्कळ अवकाश होता.  भारताच्या काळजाला त्यांचा हात पोचायला अजून सहाशे वर्षे जायची होती; आणि हिंदुस्थानात येऊन राजकीय विजय मिळवून स्थिरस्थावर होईपर्यंत इस्लामच्या रूपातही पुष्कळ बदल झाला होता, त्याचे निशाण घेऊन जे अखेर पोचले तेही निराळे लोक होते.  वेड लागल्यासारखे अंगात वारे येऊन, प्रचंड उत्साहाने जे अरब स्पेनपासून मंगोलियापर्यंत सारखे जिंकीत पसरत गेले व ज्यांनी एक उज्ज्वल संस्कृती आपल्याबरोबर सगळीकडे फिरवली, ते खुद्द भारतवर्षाच्या काळजापर्यंत पोचले नाहीत,  हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीजवळच ते थबकले.  अरब संस्कृती हळूहळू अवनत झाली आणि मध्य व पूर्व आशियात तुर्की जातिजमाती पुढे आल्या.  हिंदी हद्दीजवळपास असणारे अफगाण आणि तुर्क यांनी हिंदुस्थानात इस्लामला राजकीय शक्तीच्या स्वरूपात आणले.

या सत्यकथा डोळ्यांसमोर नीट यायला थोड्या तारखा वगैरे बघितल्या तर बरे होईल.  महंमद पैगंबर मक्केहून मदिनेस जायला निघाले, त्यांनी हे जे हिजरात केले त्या वेळेपासून म्हणजे इ. सन ६२२ पासून इस्लाम सुरू झाला असे समजायला हरकत नाही.  नंतर दहा वर्षांनी पैगंबर मरण पावले.  अरबस्थानातीलच घडी नीट बसविण्यात नंतरचा काही काळ गेला, आणि मग थक्क करणार्‍या घटना झपाट्याने घडत जाऊन अरब लोक इस्लामचा झेंडा हातात घेऊन पूर्वेकडील मध्य आशियापासून तो सारी उत्तर आफ्रिका पादाक्रान्त करून थेट स्पेन आणि फ्रान्सपर्यंत युरोपच्या हद्दीतही गेले.  सातव्या शतकात आणि आठव्या शतकाच्या आरंभी इराक, इराण आणि मध्य आशिया त्यांनी घेतला.  इ. सन ७१२ मध्ये त्यांनी हिंदुस्थानच्या वायव्येकडील सिंध घेऊन तेथेच मुक्काम केला.  हिंदुस्थानचे अधिक सुपीक भाग आणि सिंध यांच्यामध्ये विस्तृत वाळवंट होते.  तिकडे पश्चिमेकडे आफ्रिका व युरोपमधील अरुंद सामुद्रधुनी ओलांडून ते फ्रान्समध्ये शिरले.  सारा स्पेन ताब्यात घेऊन पिरनीज ओलांडून ते फ्रान्समध्ये शिरले.  आणि शेवटी इ. सन ७१२ मध्ये टूर्सच्या सुप्रसिध्द लढाईत चार्ल्स मार्टेलने त्यांना थोपवून त्यांचा पराजय केला.

अरबस्थानातील वाळवंटात ज्यांची घरेदारे, आतापर्यंत जगाच्या इतिहासात ज्यांनी फारसा भाग घेतला नव्हता, ते एकाएकी सर्वत्र विजयी होत चालले, ही अद्‍भुत घटना होती.  ही शक्ती महंमदाच्या क्रांतिकारक व विद्युन्मय अशा सामर्थ्यसंपन्न व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांनी मानवी भ्रातृभावाचा जो संदेश दिला, त्याचा परिणाम होता. त्यातूनच अरबांना हे नवे तेज प्राप्त झाले होते.  तरीही इस्लामचा उदय होताच एकएम विस्मृत जगातून, शून्यातून अरब संस्कृती वर आली, आणि फोफावली हे समजणे चुकीचे आहे.  इस्लामी पंडितांची एक प्रवृत्ती आहे की, इस्लामपूर्व अरबस्थान म्हणजे केवळ अज्ञानमय व अंधकारमय दाखवायचा; इस्लामपूर्व अरबस्थानातील काळाला ते जालिहियत म्हणजे अज्ञानाचा, दुष्ट रूढींचा अंधारमय काळ असे म्हणतात.  पूर्वीच्या गोष्टींना कमीपणा द्यायचा असे त्यांचे धोरण असते.  परंतु इतर संस्कृतीप्रमाणे अरबी संस्कृतीलाही परंपरा होती.  सेमिटिक वंशाच्या लोकांच्या संस्कृतीशी त्यांचे दृढ संबंध होते.  फोनिशियन, क्रेटन, खाल्डियन, हिब्रू इत्यादींशी त्यांचा परिचय होता.  इस्त्रायली लोक अधिक अलग वृत्तीचे झाले.  उदार वृत्तीच्या खाल्डियन वगैरे लोकांपासून ते दूर झाले.  त्यांच्यात आणि इतर सेमिटिक जातिजमातींमध्ये नेहमी संघर्ष असत, लढाया असत.  असे असूनही त्यांची सर्व सेमिटिक प्रदेशभर जा-ये असे, दळणवळण असे.  इस्लामपर्वू अरब संस्कृती विशेषत: येमेनमध्ये वाढली.  पैगंबराच्या काळी अरबी भाषा चांगलीच विकसित झाली होती.  तिच्यात काही इराणी आणि काही हिंदी शब्दही होते.  फोनेशियनांप्रमाणे अरबही व्यापार शोधीत समुद्रावरून दूरदूर जात.  दक्षिण चीनमध्ये एक अरब वसाहत कन्तानजवळ होती, ती इस्लामपूर्व काळातील होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel