मुख्य जाती कोणत्या ? क्षणभर अस्पृश्य बाजूला ठेवले तर चार प्रमुख जाती आपणांस दिसतात. ब्राह्मण : उपाध्याय, शिक्षक, बुध्दिप्रधान लोकांचा यात समावेश असे. क्षत्रिय : राज्यकर्ते आणि लढवय्ये यांचा यांत अंतर्भाव असे. वैश्य : छोटे मोठे व्यापारी, पेढीवाले यांचा यात समावेश केला जाई. शूद्र : शेतीवर व इतर काम करणारे लोक. या चार जातींपैकी ब्राह्मण जातच नीट सुसंघटित व सरमिसळ होऊ न देणारी अशी असेल असे दिसते. क्षत्रियांत नेहमी भरच पडत असे. जे विदेशी लोक येत, जे राज्य करीत ते क्षत्रिय होऊन जात व देशातीलही जे लोक हातात सत्ता घेऊन राजे बनत, तेही स्वत:ला क्षत्रिय म्हणवू लागत. वैश्य हे मुख्यत: व्यापारी आणि पेढीवाले असत व इतरही अनेक धंद्यांतही ते गुंतलेले असत. घरकाम, शेती, यात मुख्यत: शूद्रांचा भरणा असे.
नवीन धंदे जसजसे निर्माण होत तसतशा नवीन जातीही बनत; दुसर्याही काही कारणांसाठी नवीन जाती बनत. दुसर्या जाती, नवीन जातींपेक्षा स्वत:ला श्रेष्ठ समजण्याची कोशिस करीत. अशा प्रकारची सामाजिक संघटनेची ही क्रिया आतापर्यंत चालत आली आहे. कधी कधी खालच्या जाती वरिष्ठ जातींनीच वापरावयाचे जे यज्ञोपवीत ते एकदम वापरू लागतात, त्यामुळे काही मोठा उत्पात होत नाही. कारण त्या त्या जातीचे काम त्या त्या विशिष्ट क्षेत्रातच असे; आपापला उद्योगधंदा सारे चालवीत. प्रश्न प्रतिष्ठेचा असे. प्रसंगविशेषी खालच्या जातीतील लोक स्वत:च्या कर्तृत्वाने आणि पुरुषार्थाने अधिकाराच्या आणि सत्तेच्या जागेवर जाऊन बसत, परंतु असे क्वचितच घडे.
सामान्यत: समाजाची रचना, संघटना अशी होती की, त्यात वर्णावर्णामध्ये स्पर्धा असू नये, अभिलाषा येऊ नये. त्यामुळे निरनिराळ्या जाती झाल्या तरी मोठासा फरक वाटत नसे. हे जर हेतू असते तर नाना जातींत वितुष्ट आले असते. ब्राह्मण वरिष्ठ असे, स्वत:च्या विद्येचा आणि ज्ञानाचा त्याला अभिमान असे, दुसरे त्याला मानही देत, परंतु प्रापंचिक वैभव, धनदौलत त्याच्याजवळ क्वचितच आढळे. व्यापारी धनसंपन्न आणि श्रीमंत असला तर एकंदर समाजात त्याचे स्थान वरचे असे मानण्यात येत नसे.
बहुजनसमाज कृषिप्रधान होता. जमीनदारी नव्हती किंवा रयतवारीही नव्हती. कायद्याने जमीन कोणाच्या मालकीची हे सांगणे कठीण आहे. आजचे मालकीतत्त्व त्या वेळेस नव्हते. जमिनीची लागवड करण्याचा शेतकर्याला हक्क होता, परंतु उत्पन्नाची वाटणी कशी करायची हा मुख्य प्रश्न असे. मोठा भाग शेत कसणाराला जाई. राजाला बहुधा उत्पन्नाचा सहावा भाग देण्यात येई, आणि गावातील इतर सर्वांनाच थोडाथोडा भाग मिळे. गावाची जे जे कोणी सेवा करीत, त्या सर्वांचा त्यात थोडा थोडा हिस्सा असे. उपाध्याय व शिक्षक म्हणून ब्राह्मण, सुतार, लोहार, न्हावी, भंगी, कुंभार, दुकानदार वगैरे या सर्वांना हिस्सा मिळे. अशा प्रकारे राजापासून तो झाडूवाल्यापर्यंत, भंग्यापर्यंत सारेच शेतीच्या उत्पन्नात भागीदार-हिस्सेदार असत.
अस्पृश्य हे कोण होते ? दलित कोण होते ? दलितवर्ग हा नवीन शब्द आहे. तळच्या अनेक जातींना दलितवर्ग हा शब्द मोघमपणे लावण्यात येत असतो. इतरांपासून त्यांना पृथक करणारी अशी स्पष्ट विभागरेषा नाही. परंतु अस्पृश्यांसंबंधी असे म्हणता येणार नाही. अस्पृश्य कोण ते निश्चित आहे. उत्तर हिंदुस्थानात भंगी काम करणारे तसेच इतर अस्वच्छ काम करणारे असे जे थोडे लोक आहेत, त्यांनाच अस्पृश्य मानण्यात येते. फाहियान या चिनी प्रवाशाने लिहून ठेवले आहे की, मनुष्याचे मलमूत्र दूर करणारास अस्पृश्य मानीत. दक्षिण हिंदुस्थानात अस्पृश्यांची मोठी संख्या आहे. त्यांची संख्या इतकी का वाढली ते सांगणे कठीण. ज्यांचे धंदे अस्वच्छ मानले जात, त्या सर्वांना बहुधा अस्पृश्य मानण्यात येई असे दिसते. ज्यांना जमीन नाही असे शेतीवर काम करणारे, त्यांनाही यात नंतरच्या काळात ढकलण्यात आले असावे.