युगायुगातून
गुप्त राजवटीतील राष्ट्रवाद आणि साम्राज्यवाद

मौर्य साम्राज्य अखेर अस्ताला गेले आणि सुंग घराणे आले.  सुंगांची सत्ता फारच अल्प प्रदेशावर होती.  दक्षिणेकडे मोठमोठी राज्ये उदयास येत होती आणि उत्तरेकडे काबूल ते पंजाबपर्यंत बॅक्ट्रियन किंवा इंडो-ग्रीक हे पसरत होते.  बॅक्ट्रियन राजा मिनँडर याच्या कारकीर्दीत बॅक्ट्रियनांचा प्रत्यक्ष पाटलिपुत्र राजधानीलाही धोका उत्पन्न झाला होता; परंतु त्यांचा शेवटी पराभव होऊन त्यांना मागे लोटण्यात आले.  हिंदुस्थानातील एकंदर वातावरण आणि वृत्ती यांचा मिनँडरवर अपार परिणाम होऊन तो बौध्द धर्मी झाला.  बौध्द धर्मीय वाङ्मयात आणि दंतकथांत राजा मिलिंद या नावाने तो प्रसिध्द आहे व तो एक संत, राजर्षी मानला गेला आहे.  हिंदी आणि ग्रीक कलांच्या मिश्रणातून गांधारची ग्रीको-बुध्दिस्ट कला जन्माला आली.  ही कला अफगाणिस्थान आणि सरहद्दप्रांत यांत प्रामुख्याने पसरली.

मध्य हिंदुस्थानात बेसनगर येथे सांचीच्याजवळ एक दगडी स्तंभ आहे,  त्याला 'हेलियोडोरस स्तंभ' असे म्हणतात.  त्याच्यावर संस्कृत लेख आहे त्यावरून ग्रीकांचे हिंदीकरण कसे होत होते, सरहद्दीजवळ येणार्‍या ग्रीकांना हिंदी संस्कृतीत कसे घेण्यात येत असे त्याची थोडी काही कल्पना करता येते.  या स्तंभावर पुढीलप्रमाणे मजकूर आहे.  ''डिऑनचा पुत्र तक्षशिलानिवासी हेलिओडोरस हा विष्णुभक्त होता; त्याने देवाधिदेव जो वासुदेव त्याच्यासाठी हा स्तंभ उभारला.  महान भूपती अँटिआल्सिडास याचा वकील म्हणून हेलिओडोरस प्रजारक्षक राजा काशीपुत्र भगभद्र याच्याकडे आला तेव्हा भगभद्राला गादीवर येऊन चौदा वर्षे झाली होती.  तीन शाश्वत सत्ये, जर नीट आचरणात आणली तर मोक्ष मिळतो. ''संयम, त्याग आणि सदसद्विवेक.''

मध्य आशियात शक ऊर्फ सीथियन (शेस्तान-शकस्तान) ऑक्सस नदीच्या खोर्‍यात वस्ती करून बसले होते.  अतिपूर्वेकडून युएची स्वारी करून आले आणि त्यांनी या शकांना उत्तर हिंदुस्थानच्या बाजूला ढकलून दिले.  या शकांनी बौध्दधर्म अंगीकारिला; आणि काहींनी हिंदू धर्मही स्वीकारला.  युएची लोकांतील कुशान म्हणून एक कुल होते.  या कुशान लोकांनी हातात सत्ता घेऊन उत्तर हिंदुस्थानावर अंमल बसविला.  त्यांनी शकांना आणखी खाली दक्षिणेला पिटाळले, तेव्हा शक काठेवाडात आणि दक्षिणेकडे घुसले.  त्यानंतर कुशानांची सत्ता वाढत जाऊन सबंध उत्तर हिंदुस्थान व थेट मध्य आशियापर्यंत त्यांचे साम्राज्य झाले.  त्यांच्यापैकी जरी काहींनी हिंदू धर्म स्वीकारला तरी बरेच जणांनी बौध्द धर्मच पसंत केला.  त्यांपैकी कनिष्क हा अतिप्रसिध्द असा सम्राट होऊन गेला.  बौध्द दंतकथांत याच्याही पराक्रमाच्या, लोककल्याणाच्या आख्यायिका आहेत.  कनिष्क जरी बौध्द धर्मीय होता, तरी त्याच्या राज्यात एक सर्व धर्मांचे मिश्रण राजमान्य होते.  त्यात झरथुष्टाच्या धर्माचाही समावेश होता.  कुशान साम्राज्य हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीच्या सभोवती सर्वत्र चौफेर पसरलेले असून हल्लीच्या पेशावरजवळ व प्राचीन तक्षशिला विद्यापीठाशेजारी त्याची राजधानी होती.  या राजधानीत व विद्यापीठात नाना देशांतील लोकांची भेट होई.  हिंदी लोकांची या ठिकाणी युएची लोकांशी; इराणी जनतेशी, बॅक्ट्रियन ग्रीकांशी, तुर्की आणि चिनी लोकांशी भेटगाठ होई व या सर्व संस्कृतींचा एकमेकांवर क्रियाप्रतिक्रियात्मक परिणाम होई.  या प्रतिक्रियांतूनच शिल्प आणि चित्रकलेतील एक नवीन सामर्थ्यवान संप्रदाय निर्माण झाला.  इतिहास म्हणून निश्चित खरे मानण्यासारखे चीन आणि हिंदुस्थान यांच्या दरम्यान संबंध याच काळात प्रथम दिसतात.  इसवी सन ६४ मध्ये पहिला चिनी वकील हिंदुस्थानात आला व त्याने हिंदुस्थानला साधीच परंतु उपयुक्त अशी पीच आणि पिअर झाडे नजराणा म्हणून आणली.  गोबीच्या वाळवंटाच्या थेट सीमेवर तुर्फान आणि कुची येथे हिंदी चिनी आणि इराणी संस्कृतींचे मनोहर गुच्छ तयार झाले.

कुशान काळातच बौध्द धर्माचे महायान आणि हीनयान असे दोन भेद होऊन दोघांत खडाजंगीचे वाद सुरू झाले व हिंदुस्थानच्या परंपरेप्रमाणे मोठमोठ्या सभांतून हे वाद चालले असताना देशाच्या सर्व भागांतून प्रतिनिधी येऊन ह्या वादात भाग घेत.  साम्राज्याच्या मध्यभागी काश्मीर असल्यामुळे तेथे या वादांना पूर आला होता व तेथे सांस्कृतिक चळवळीही भरपूर चालत असत.  या वादविवादांत एक मोठे नाव आपल्यासमोर येते.  ते म्हणजे नागार्जुनाचे होय.  इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेला हा महापुरुष हिंदी तत्त्वज्ञान आणि बौध्दधर्मीय विचार यात पारंगत होता व त्याच्याच प्रभावामुळे महायान पंथाचा हिंदुस्थानात विजय झाला.  महायान पंथ चीनकडे पसरला आणि हीनयान पंथ, ब्रह्मदेश, सीलोन इकडे पूर्वीसारखा राहिला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel