सैन्य, आरमार, विमानदल किंवा पोलिस यांच्याशी अहिंसेचा संबंधा जोडून अहिंसातत्त्वाची कधी चर्चा झाल्याचे निदान मला तरी माहीत नाही. या अहिंसातत्त्वाची व्याप्ती स्वातंत्र्याकरिता आम्ही चालविलेल्या लढ्यापुरतीच आहे असे समजूनच आजपर्यंत सर्वजण चालले होते. तथापि हेही खरे की, या अहिंसातत्त्वाची अनेक रीतींनी आमच्या विचारावर छाप बसली होती व जगातील सर्वच राष्ट्रांनी आपले शस्त्रबल कमी करावे व देशादेशांच्या दरम्यानची किंवा देशांतर्गत जी काही भांडणे असतील ती शांततामय मार्गांनी मिटवावी या मताचा विशेष प्रभाव या तत्त्वामुळेच काँग्रेसवर पडला होता.
प्रांतातून काँग्रेस मंत्रिमंडळांचा कारभार सुरू होता तेव्हा त्यांच्यापैकी अनेक मंत्रिमंडळांची विश्वविद्यालयातून व कॉलेजातून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण देण्याची व्यवस्था व्हावी अशी तीव्र इच्छा होती. परंतु या इच्छेला विरोध हिंदुस्थान सरकारलाच होता व त्यांनी अशी व्यवस्था होऊ दिली नाही.
अर्थात गांधीजींना ही प्रवृत्ती आवडत नव्हतीच, परंतु ते ह्या बाबतीत काही आडवे आले नाहीत. दंगेधोपे झाले तरी ते मोडण्याकरिता सशस्त्र पोलिसांचा उपयोग करणे त्यांना आवडत नसे व त्यामुळे आपणाला फार खेद वाटतो असे ते बोलून दाखवीत, पण त्यातल्या त्यात हा प्रकार कमी अनिष्ट म्हणून ते कसाबसा सहन करीत व हळूहळू कालांतराने आपली अहिंसेची शिकवण हिंदी जनतेच्या मनावर बिंबेल अशी त्यांना आशा वाटे. अहिंसेशी विसंगत अशी प्रवृत्ती या अशा काही प्रकाराने गांधीजींना खुद्द काँग्रेसमध्येच आढळल्यामुळे व ती प्रवृत्ती त्यांच्या मनाविरुध्द असल्यामुळे त्यांनी काँग्रेसशी असलेला आपला औपचारिक संबंध सन १९३० नंतर लवकरच आपल्या सभासदत्वाचा राजीनामा देऊन तोडला, तथापि हा औपचारिक संबंध सुटल्यावरही तेच काँग्रेसचे नेते कायम राहिले व त्यांच्याच सल्ल्याप्रमाणे काँग्रेस चालत राहिली ह्यात शंका नाही. त्यांना आणि आम्हाला सर्वांनाच हे नाते चमत्कारिक वाटे, कोणालाच ते बरे वाटत नव्हते, पण कदाचित गांधीजींना असे वाटत असावे की, आपल्या तत्त्वाशी व आपली ज्यांच्यावर श्रध्दा आहे अशा सिध्दान्ताशी सर्वस्वी सुसंगत नसलेले जे अनेक प्रकारचे ठराव काँग्रेस अधूनमधून करते त्याची निदान आपल्यावरची व्यक्तिश: जबाबदारी या अशा प्रकाराने टळते. एका राष्ट्राचा नेता असलेले गांधी व केवळ हिंदुस्थानपुरताच नव्हे तर सार्या मानवजातीला, सार्या जगाला, एक प्रेषित म्हणून संदेश सांगणारे गांधी या दोन गांधींमुळ स्वत: गांधींमुळे स्वत: गांधीजींच्या मनात व आमच्या राष्ट्रीय राजकारणात हा अंतर्यामीचा विरोध नेहमीच त्यांना व आम्हाला जाणवत आला आहे. प्रत्यक्षाच्या जीवनात, विशेषत: राजकारणात, अवश्य किंवा हिताचे म्हणून जे जे काही करावे लागते ते करताना आपल्या कृत्यांचा व जे काही एक सत्य म्हणून आपण मानले असते त्या सत्याचा काटेकोरपणे मेळ बसविणे कधीच सुलभ नसते. नित्याच्या व्यवहारात सहसा कोणी असल्या अडचणींचा बाऊ करून मनाला त्रास करून घेत नाही. सत्य पाळायला विचार कधी काळी कोणाला सुचलाच तर ते सत्य मनाच्या कोणत्या तरी कोनाकोपर्यात बाजूला निराळे ठेवले जाते व प्रस्तुतच्या कार्याचा बरेवाईटपणा तूर्तच्या आपल्या हिताच्या मापाने मोजला जातो. दुर्दैवाने राजकारणी पुरुष म्हणजे काही एक वेगळाच संधिसाधू लोकांचा वर्ग आहे एवढ्यामुळेच नव्हे, तर राजकारणी पुरुषांना केवळ एकट्या स्वत:च्या वैयक्तिक पातळीवर वागणे शक्य नसते त्यामुळेही, राजकारणात हा प्रकार सर्वत्र नियम होऊन बसला आहे. दुसर्यांनी अमुक एक गोष्ट करावी, ती त्यांच्या हातून घडावी, अशी योजना राजकारणी पुरुषांना करावी लागते व म्हणून त्यांना त्या इतरांची धाव कोठपर्यंत जाते, त्यांना नित्य कितपत समजते, सत्याचा प्रभाव स्वत:वर ते कितपत पडू देतील याचाही विचार करावा लागतो, आणि ह्यामुळेच आपल्या मनातल्या सत्याला काही मुरड घालून ते प्रचलित परिस्थितीशी जुळवून घेणे त्यांना भाग पडले. राजकारणात हा प्रकार अपरिहार्य होऊन बसतो हे तर खरेच, पण ह्या प्रकारातही धोके नेहमी येतातच; सत्याकडे दुर्लक्ष करून ते सोडून देण्याची वृत्ती बळावत जाते व कर्म आणि अकर्म यांचा निकष सत्याच्या ऐवजी सोय, स्वहित हाच होऊन बसतो.