परंतु वादळासमोर भारतवर्षाने सदैव मान लवविली, परकीयांचे सैन्यांचे लोंढे आले तरी तिकडे लक्ष दिले नाही ही गोष्ट खरी नाही. त्याने सदैव परकीयांचा प्रतिकार केलाच आहे. बहुतेक प्रसंगी हा प्रतिकार यशस्वी ठरला आहे. क्वचितप्रसंगी प्रतिकार तात्पुरता अयशस्वी ठरला व अपयश आले, तरी ते ध्यानात ठेवून पुन्हा तयारी करण्यास भारत कधी विसरला नाही. परकीयांचा प्रतिकार, त्यांचा मुकाबला दोन मार्गांनी केला जाई. एक त्यांच्याशी प्रत्यक्ष लढून त्यांना हाकलून देऊन आणि दुसरा मार्ग म्हणजे ज्यांना हाकलून लावता येत नसे त्यांना आपल्यात मिळवून आणि पचवून टाकून आत्मसात करून. अलेक्झांडरच्या फौजांना भारतीयांनी चांगलाच हात दाखविला व तो मरताक्षणीच उत्तर प्रांतात त्याने ठेवलेल्या सैन्याला मार खाताखाता पाय काढावा लागला. पुढे इंडो-ग्रीकांना आणि इंडो-सिथियनांना त्याने आपल्यात मिसळून घेतले, आणि अखेर आपल्या राष्ट्राचे अखंड प्रामुख्य दाखविले. हूणांबरोबर तर पिढ्यानपिढ्या त्याने लढाया केल्या आणि सरतेशेवटी त्यांना हाकलून दिले. जे येथे राहिले ते भारतीय बनून. अरब आले परंतु सिंधूशीच थबकले. पुढे तुर्की आणि अफगाण टोळ्या आल्या. त्या पुढे सरकल्या, परंतु आस्तेआस्तेच. दिल्लीच्या सिंहासनावर दृढमूल व्हायला त्यांना कित्येक शतके लागली. त्यांच्याबरोबर लढाया, कितीतरी वर्षे सारख्या सुरू होत्या. त्याच वेळी हिंदीकरणाची आणि आत्मसात करून घेण्याची क्रियाही चालू होती, आणि स्वार्या करून आलेले परकीय अखेर इतर हिंदी लोकांइतकेच हिंदी झाले. विभिन्न मतांचा समन्वय करून, निरनिराळ्या जातिजमातींना एकत्र आणून, त्यांच्या ऐक्यातून सर्वांचे असे एक महान राष्ट्रीयत्व निर्माण करण्याचे जे प्राचीन भारतीय ध्येय, त्याच ध्येयाचा अकबर हा एक थोर प्रतिनिधी झाला. अशा रीतीने अकबराने स्वत:ला भारतीय रूप दिले म्हणून तो जरी परका होता, नवागत होता तरी त्याला भारताने आपला मानले आणि म्हणूनच त्याला राज्याची घडी नीट बसविता येऊन साम्राज्याचा भक्कम पाया घालता आला. जोपर्यंत त्याच्यामागून येणार्यांनी त्याचे धोरण चालविले, हिंदी राष्ट्राची विशिष्ट वृत्तिप्रवृत्ती ओळखून आले धोरण ठेवले, तोपर्यंत त्यांचे साम्राज्य टिकले. ते धोरण सुटून, राष्ट्रीय विकासाच्या समग्र गतीला ते विरोध करू लागताच, ते दुबळे झाले आणि त्यांचे साम्राज्य शतखंड झाले. नवीन चळवळी उदयाला आल्या, त्यांचा दृष्टिकोण संकुचित होता; परंतु तो संकुचित असला तरी जुन्या राष्ट्रधर्माचाच नवा अवतार होता. या नव्या राजकीय पंथांना शाश्वत असे जरी काही उभारता आले नाही, स्थिर पायावर काही नवीन बांधता आले नाही, तरी मोगल साम्राज्याचा नाश करण्याइतके त्यांना सामर्थ्य होते. ह्या राजकीय पंथांचे यश काही काळ टिकले, परंतु प्राचीन इतिहास त्यांच्या डोक्यात फार भरला व तो जसाच्या तसा सद्य:काळात त्याच रूपात उभा करण्याचे विचार त्यांच्या मनात घोळू लागले. त्या प्राचीन भूतकालाच्या व त्यांच्या वेळच्या वर्तमान काळाच्या दरम्यान जे काही घडले ते दुर्लक्ष करून सोडून देण्याजोगे नव्हते. सद्य:स्थितीची जागा भूतकालाला तंतोतंत कधीच घेता येत नाही, व त्या काळची भारताची सद्य:स्थिती म्हणजे तुंबून कुजू लागलेल्या डबक्यासारखी झाली होती, ह्या गोष्टींचा त्यांना उमज पडला नाही. जगाकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्यावर व यंत्रतंत्राच्या नव्या शक्तीवर उभे राहिलेले एक नवे युगांतर पश्चिम दिशेला घडते आहे व या अज्ञात युगांतराची शक्ती ब्रिटिश लोकांचा बलशाही अवतार घेऊन नव्या दमाने आपल्यापुढे ठाकली आहे, ह्या घटनेची त्यांना पुरेशी जाणीव नव्हती. शेवटी ब्रिटिशविजयी झाले. परंतु उत्तरेकडे त्यांची घडी नीट बसते न बसते तोच १८५७ चे बंड होऊन त्याचेच स्वातंत्र्यसंगर झाले व ब्रिटिश सत्ता नष्ट होण्याच्या बेताला आली होती. स्वातंत्र्याची तहान, स्वातंत्र्याची प्रेरणा भारताला चिरंतन होती व आहे; भारतवर्ष आजपर्यंत कधीही परकीय सत्तेला मुकाट्याने शरण गेलेला नाही.
प्रगती विरुध्द स्वास्थ्य
आपल्या पूर्वेतिहासाच्या व अमूल्य पितृधनाच्या अभिमानाने आपण फार पूर्वीपासून असंग्राहक बनून वंश शुध्द राखण्याकरता बाहेरच्यांना बंदी करावी म्हणून, केव्हापासूनचे भिंती बांधतो आहोत, कुंपणे घालतो आहोत. पण शुध्द वंशाची घमेंड बाळगणार्या इतर अनेक राष्ट्रांप्रमाणेच आपले राष्ट्रही इतका वंशाभिमान ठेवता ठेवता, जातिभेद कडक करता करता, अखेर आर्य, द्राविड, तुराणी, सेमिटिक आणि मंगोल वंशांची एक विचित्र रास बनली आहे. आर्यांच्या लाटांवर लाटा येथे आल्या आणि त्या द्राविडी लोकांशी मिसळल्या; आर्यांच्या पाठोपाठ हजारो वर्षांच्या काळात नाना वंशांचे, मिडिअन, इराणी, ग्रीक, बाक्ट्री, पार्थियन, शक, कुशान किंवा युएची, तुर्क, तुर्की मंगोल कितीतरी लहान-मोठ्या संख्येने लोक या देशात आले व त्यांना आसरा मिळाला. डॉडवेल आपल्या 'हिंदुस्थान' या ग्रंथात म्हणतो, ''लढाऊ आणि उग्र जातिजमातींनी पुन:पुन्हा हिंदुस्थानच्या मैदानावर स्वार्या केल्या; त्यांनी राजांना पदच्युत केले, शहरांचा ताबा घेतला, त्यांना उद्ध्वस्त केले; नवीन राज्ये स्थापून नवीन शहरे वसविली, नवीन राजधान्या बांधल्या, परंतु शेवटी हिंदी मानवसागरात ते विलीन झाले, अदृश्य झाले. त्यांच्या पाठीमागून येणार्या त्यांच्या वंशजांत झपाट्याने हिंदी बनलेल्या त्यांच्या रक्ताचे चार-दोन थेंब व आसपासच्या प्रबल परिस्थितीमुळे हा हा म्हणता म्हणता ह्या देशातला वेष घेतलेल्या त्यांच्या विदेशी चालीरीतींची चार लक्तरे येवढेच त्यांचे असे बाकी राहिले.''