आज जग ज्ञानविज्ञानाच्या बाबतीत आणि इतर गोष्टींत इतके पुढारलेले असूनही जर हे प्रश्न सोडविणे जड जात आहे, तर हिंदी-आर्य संस्कृती जेव्हा नवीन रंगरूप घेत होती; ज्या देशात भिन्न भिन्न मानववंश हाते, नाना नमुने, नाना प्रकार होते, अशा विविधतेने भरलेल्या या देशात नवीन समाजरचना निर्मू पाहात होती, त्या वेळेस तिला हे सारे प्रश्न सोडविणे किती कठीण गेले असेल त्याची कल्पना करावी.  असे प्रश्न सोडविण्याची त्या काळातील किंवा नंतरची सुटसुटीत पध्दत म्हणजे जितांना ठार मारून टाकावे किंवा त्यांना गुलाम तरी करावे.  हिंदुस्थानात या मार्गाचा अवलंब केला गेला नाही; परंतु वरिष्ठ वर्गाचे श्रेष्ठत्व अबाधित राखण्याची व्यवस्था करून नाना जातिजमातींचे एक संयुक्त राज्य निर्माण करण्यात आले, काही मर्यादा संभाळून काही सामान्य नियम पाळून आपापल्या धंद्याप्रमाणे वागण्याची सर्व वर्गांना मोकळीक देण्यात आली.  स्वत:च्या परंपरेप्रमाणे, जातीच्या नियमाप्रमाणे, रूढीप्रमाणे, इच्छेप्रमाणे वागण्याचे स्वातंत्र्य त्या त्या जातिजमातींना देण्यात आले.  एकच बंधन असे आणि ते म्हणजे दुसर्‍या जातिजमातींशी संबंध येता कामा नये; दुसर्‍या जातिजमातींच्या कामात ढवळाढवळ करायची नाही.  ही पध्दती लवचिक होती, विकासक्षम अशी होती, वर्धिष्णू होती.  कारण जे जे नवीन येत, त्यांचे त्यांचे नवीन वर्ग यात दाखल केले जात.  तसेच एखाद्या जुन्या जातिजमातीपासून फुटून निघाल्यांचीही एखादी नवी जात बनवून यात राखिली जाई.  अर्थात त्यांची संख्या बरीच असली तरच हे शक्य होई.  त्या त्या विशिष्ट जातीत, त्या त्या विशिष्ट समूहात पूर्ण समता असे, लोकसत्ता असे, त्या त्या जातीचे लोकनियुक्त, लोकमान्य असे, पंच असत, त्या त्या जातीची पंचायत असे.  पंच बहुधा मार्गदर्शन करीत.  महत्त्वाचा प्रश्न असला तर सारी जमात एकत्र जमून निर्णय घेतला जाई.

या सार्‍या जाती किंवा हे वर्ग बहुधा धंद्यावरून ठरत.  त्या त्या विशिष्ट धंद्यात तो तो वर्ग तरबेज असे.  अशा रीतीने या जाती म्हणजे त्या त्या धंद्यातील संघटनाच होत्या, धंदेवाईकांचे ते संघ होते.  त्यामुळे त्यांच्यात दृढ ऐक्य असे.  जातीतील सर्वांचे रक्षण होई.  एखादी व्यक्ती अडचणीत असली, आर्थिक आपत्तीत असली तर सर्व मिळून त्याला आधार देत.  त्या त्या जातीचे, त्या त्या धंदेवाईक समूहाचे काम इतर जातींच्या, इतर धंद्यांतील लोकांच्या कामाशी संबध्द असे.  आपापल्या क्षेत्रात प्रत्येक जातीने नीट कार्य केले तर सारा समाज कार्यक्षम व सुखी राहील अशी कल्पना होती.  सर्व समाजात एक प्रकारचा मेळ, सुसंवादित्व राहील अशी समजूत होती.  या सर्व समूहांना एकत्र बांधण्यासाठी, या नाना जातींचे ऐक्य असावे म्हणून सर्वांना समान असे राष्ट्रीय बंधही निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात आले.  समान संस्कृती, समान परंपरा, समान आदर्श, समान ध्येये, समान साधुसंत, समान वीरपुरुष व सती, समान अशी मातृभूमी आणि तिच्या चारी दिशांना समान अशी यात्रास्थाने, हे सारे निर्मून आपण सारे एक ही भावना दृढमूल करण्यात आली.  अशा रीतीने भेदात अभेदता शिकविण्यात आली.  आजकालच्या राष्ट्रीयतेपेक्षा प्राचीन राष्ट्रीय बंधन निराळे होते.  राजकीय दृष्ट्या ते दुबळे होते.  परंतु सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या ते प्रबळ होते.  सामाजिक शक्तीमुळे लवकर पुनरुत्थान करणे शक्य होई, आणि नवीन नवीन आलेले आत्मसात करणेही सोपे जाई.  राजकीय दौर्बल्यामुळे राजकीय ऐक्य नसे, आणि परकीयांना विजय मिळणे सोपे जाई.  परंतु एकंदरीत या ऐक्यबंधनात इतके दुवे होते की, ते सारे तोडणे कठीण जाई.  परंतु सहस्त्रशीर्ष पुरुषाप्रमाणे हे विराट बंधन होते.  काही डोकी छाटली गेली तरी पुष्कळ उरत, आणि पराजय किंवा आपत्ती यांना तोंड देऊनही समाज जिवंत राही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel