राष्ट्रप्रेम व आंतरराष्ट्रीय वृत्ती या दोहोंमध्ये विरोध आला तर त्यात राष्ट्रप्रेमाचा विजय होणार हे निश्चितच होते. प्रत्येक देशात जेव्हा जेव्हा असे प्रसंग आले तेव्हा हेच घडलेले आहे, आणि त्याहून आपला स्वत:चा देश जर परकीय सत्तेखाली गेलेला असेल, त्याला स्वातंत्र्याच्या सतत संग्रामाची व त्यात भोगलेल्या अनंत क्लेशांची स्मृतिपरंपरा असेल तर राष्ट्रप्रेमाचा विजय होणार हे उघडच अटळ होते. इंग्लंड व फ्रान्स यांनी स्पेनमधील प्रजापक्षाचा विश्वासघात केला व झेकोस्लोव्हाकियाला दगा दिला तेव्हा आपण स्वदेशहिताकरीता हे करतो आहोत अशा समजुतीने आंतरराष्ट्रीय वृत्तीचा त्यांनी बळी दिला, पण पुढे जे काही घडले त्यावरून त्यांची समजूत चुकीची ठरली, स्वदेशहितही त्यांना साधले नाहीच, अमेरिकेतील संयुक्त संस्थाने या राष्ट्राने आपले अलिप्त राहण्याचे धोरण इंग्लंड, फ्रान्स व चीन यांच्याकडे उघड उघड ओढा, व नाझीपंथ आणि जपानची युध्दप्रियता व आक्रमक वृत्ती यांचा मनापासून द्वेष वाटत असूनही कसेबसे संभाळले होते. अखेर पर्ल हार्बरचा प्रसंग त्यांच्यावर येऊन त्यांना युध्दात उडी ठोकावी लागलीच. आंतरराष्ट्रीय वृत्तीचे प्रतीक ज्याला म्हणता येईल त्या सोव्हिएट रशियाने मात्र आपले धोरण काटेकोरपणाने आपल्या देशापुरते पाहण्याचे ठेवले आहे, व त्यामुळे रशियाचे अनेक मित्र व चहाते यांचा गोंधळ उडाला होता. रशियालाही युध्दाला अखेर तोंड द्यावे लागलेच आणि तेही जर्मन फौजांनी जेव्हा काहीएक घोषणा न करता एकदम रशियावर हल्ला चढविला तेव्हा. त्या फौजा उरावर येऊन नॉर्वे, स्वीडन, हॉलंड, बेल्जियन या सार्या देशांनी आपला जीवन वाचविण्याच्या वेड्या आशेने युध्द व त्या युध्दातल्या भानगडी टाळण्याचा खूप प्रयत्न करून पाहिला. पण अखेर युध्दाचा लोंढा त्यांच्यावर कोसळून त्यात ते गुदमरले. केवळ आपल्या देशापुरता विचार पाहताना तुर्कस्तानलाही तटस्थ वृत्तीच्या असिधारेवर कसरत करून क्षणात इकडे तर क्षणात तिकडे जाणारा आपला तोल कसाबसा सावरीत पाच वर्षे जीव मुठीत धरून काढावी लागली आहेत. वरकरणी स्वतंत्र परंतु वस्तुत: त्या काळी वसाहतीसारखा अर्धवट अंकित असलेल्या ईजिप्त देश हा एक मोठे युध्दक्षेत्र बनलेला आहे, त्याची स्थिती मोठी विचित्र, अर्धवट झालेली आहे. आहे ती वस्तुस्थिती सरळ पाहिली तर तो संयुक्त राष्ट्रांच्या फौजांनी व्यापून आपल्या ताब्यात ठेवलेला युध्दात गुंतलेला देश आहे. पण असे असूनही म्हटले तर ते युध्दमान राष्ट्र नाही.
ह्या वेगवेगळ्या देशांनी किंवा त्यांच्या राज्यकर्त्यांनी ही जी धोरणे स्वीकारली त्यांचे समर्थन करता येईल, कारणेही सांगता येतील. लोकशाही राज्यपध्दती असलेल्या कोणत्याही राष्ट्राला लोकमत अनुकूल करून जनतेचे साहाय्य संपादल्यावाचून एकदम युध्दात उडी घेणे सोपे नाही. अगदी हुकुमशाहीचे राष्ट्र घेतले तरी त्यातील राज्यकर्त्यांना सुध्दा जनमत तयार करावे लागतेच. पण राज्यकर्त्यांच्या धोरणाचे कारण काहीही असले किंवा समर्थन कसेही केले तरी, आणीबाणीचा प्रसंग आला म्हणजे, आपल्या देशाचे हित कशात आहे ते पाहून निदान राज्यकर्त्यांना हिताचे कोणते वाटते ते पाहून, जे धोरण देशाच्या हिताचे असेल त्याला जुळणारी कारणेच प्रभावी ठरतात, बाकीची बाजूला टाकून देण्यात येतात. म्युनिचचा प्रसंग उद्भवला तेव्हा युरोपभर पसरलेल्या शेकड्यावारीने मोजता येण्यासारखा आंतरराष्ट्रीय संस्था, फासिस्टविरोधी संघ यांची अशी काही वाचा बसून गेली होती, ते असे काही निर्बल, निर्माल्यवत झाले होते की, तो एक चमत्कारच होता. व्यक्ती किंवा लहानसहान पक्ष यांची वृत्ती आंतराष्ट्रीय होणे संभवनीय असते, वैयक्तिक किंवा त्या काळापुरते राष्ट्रीय हित यांचा त्याग करण्याची त्यांची तयारी त्या वृत्तीमुळे होणेही एकवेळ संभवते, पण सार्या देशांची तशी वृत्ती किंवा तशी त्यागाची तयारी संभवनीय नसते. जे स्वराष्ट्राच्या हिताचे असेल तेच आंतरराष्ट्रीय दृष्ट्याही हिताचे आहे अशी जेव्हा सबंध देशातील जनतेची श्रध्दा असते तेव्हाच त्या गोष्टीबद्दल सबंध देशात उत्साहाची भरती होऊ शकते.
काही महिन्यांपूर्वी ब्रिटनच्या परराष्ट्रीय धोरणाचे विवेचन करताना, लंडन येथील 'इकॉनॉमिस्ट' (अर्थशास्त्रज्ञ) या नियतकालिकाने लिहिले की :-'' सतत एकच, तेच ते राहील अशी कोणत्याही परराष्ट्रीय धोरणाबद्दल आशा करायला काही जागा असेल तर ते म्हणजे ज्यामुळे स्वराष्ट्राचे हित संपूर्णपणे व उघड दिसण्यासारखे असेल असे परराष्ट्रीय धोरण. आपल्या स्वत:च्या देशाचे हित बाजूला ठेवून सार्या जगाचे आंतरराष्ट्रीय हित पाहायला सज्ज असे एकही राष्ट्र नसते. सगळ्या राष्ट्रांचे हित तसेच आले हित अशी परिस्थिती स्पष्ट असली तरच भिन्न राष्ट्रे एकमेकांशी उपयुक्त सहकार्य करू शकतात. ''