त्या भारतवर्षाचे चैतन्य दीर्ष युगावधी टिकले आहे, संस्कृती जगली आहे ती एखाद्या गुप्त विद्येच्या किंवा सांप्रदायिक मंत्रतंत्राच्या बळावर नसून, ममता, माणुसकी, संपन्न व सहिष्णू संस्कृती, जीवन व जीवनातील गुंतागुंतीचे प्रकार यांचे सखोल ज्ञान यांचा हा प्रभाव आहे. त्याची विपुल प्राणशक्ती त्या त्या युगात काव्यसाहित्याच्या द्वारा, कलांच्या द्वारा सदैव भरपूर वहात आली आहे. त्यातील फारच थोडा अंश आज उपलब्ध आहे. काही अज्ञात आहे, काही निसर्गाच्या क्षोभामुळे व काही मानवांच्या राक्षसी हिंसावृत्तीमुळे कायमचा नष्ट झाला आहे. घारापुरीच्या लेण्यातील त्रिमूर्तीची ती प्रचंड प्रतिमा भारताची मूर्ती वाटते. शक्तिसंपन्न भारताचेच ते अनेकमुखी दर्शन आहे. जणू काय सर्वज्ञ, सर्वसाक्षी साक्षात भारतच अंत:करणाचा ठाव घेणार्या भेदक दृष्टीने आपल्याकडे पाहात आहे. अजिंठ्याच्या लेण्यांतील चित्रांतून जीवनावर ममता, सौंदर्याचे प्रेम ओतप्रोत भरलेले दिसते व किंचित खोलवर विचारपूर्वक पाहिले तर त्या चित्रांत दृश्याच्या पलीकडचे, काहीएक गंभीर अर्थाचे काहीतरी असल्याचा भास होतो.
भौगोलिक दृष्ट्या आणि हवामानाच्या दृष्टीने पाहिले तर हिंदुस्थान आणि ग्रीस यांत साम्य नाही. ग्रीस देशात मोठाल्या नद्या, अरण्ये, प्रचंड वृक्ष मुळीच नाहीत, व हिंदुस्थानात हे सारे ठिकठिकाणी भरलेले आहे. परंतु समुद्राची विशालता व चंचलता, त्याची नानाविध रूपे यांचा परिणाम भारतापेक्षा ग्रीस देशावर अपार झाला आहे. हिंदुस्थानच्या किनार्याजवळ राहणार्या लोकांवर समुद्राचा परिणाम झाला असेल; परंतु आत वसणार्या लोकांवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. हिंदी जीवन म्हणजे विशेषत: भूमीवरचे- प्रचंड मैदाने, उत्तुंग पर्वत, विशाल सरिता आणि घनदाट वने यांचे जीवन. ग्रीस देशात काही पर्वत होते. हिंदुस्थानातल्या देवांच्या व ॠषींच्या हिमालयातील वास्तव्याप्रमाणे त्यांनीही आपल्या देवांचे वसतिस्थान आलिंपस पर्वतावरच कल्पिले होते. दोन्ही देशांत दंतकथा, आख्यायिका, पुराणे रचली गेली आणि इतिहासाशी त्यांचे संमिश्रण केले गेले. त्यामुळे कल्पना व सत्यकथा यांची निवडानिवड करणेही कठीण झाले. प्राचीन ग्रीक लोक केवळ सुखोपभोगी नव्हते किंवा केवळ संन्यासीही नव्हते. सुख तेवढे वाईट व पाप समजून ते मुद्दाम टाळणे किंवा काही अर्वाचीनांप्रमाणे जिवाची करमणूक करण्याकरता सारखे सुखात घोळणे असले प्रकार त्यांनी केले नाहीत. आपल्यापैकी पुष्कळांना सतावून सोडणार्या विधिनिषेधात न घोटाळता जीवन जसे येईल तसे बरेवाईट असेल ते पदरात घेण्याची त्यांची तयारी होती. मात्र ते जे हाती घेत, त्यात ते सर्व शक्ती ओतीत, त्यात तन्मय होत आणि त्यामुळे आपल्यापेक्षा ते अधिक उल्हासी दिसतात, परंतु आपण आपले प्राचीन वाङ्मय पाहू तर अशाच प्रकारे उत्साही व चैतन्यमय जीवन हिंदुस्थानातही होते असे दिसून येईल. नंतरच्या ग्रीस देशात वैराग्यमय जीवनाचेही एक स्वरूप दिसते, तसे हिंदुस्थानात जरी पूर्वीसुध्दा असले तरी सर्व समाजाला त्याने व्यापले नव्हते. काही थोडे लोक यतिधर्मी विरक्त असत. जैन आणि बौध्द धर्मामुळे ही वैराग्य वृत्ती जरी बळावली तरी सर्वसाधारणपणे जीवनाची जी पार्श्वभूमी होती, तिच्यात फारसा फरक झाला नाही.
ग्रीस देशात तद्वतच हिंदुस्थानातही जीवनातील सुखदु:खे वगैरे सर्व पत्करून समृध्द जीवन जगण्याची खटपट होतीच. परंतु ह्या दृश्य जीवनावेगळे माणसाचे काही एक अंतर्जीवन आहे व ते श्रेष्ठ आहे अशी श्रध्दा होती. या श्रध्देमुळे या अंतर्जीवनाबद्दल जिज्ञासा व तर्क सुरू झाले. परंतु जिज्ञासेचा रोख भोतिक जगाकडे फारसा नसे. काही गृहीत सत्यांच्या भोवती तार्किक बुध्दिवाद करीत राहणे हेच त्यांना आवडत असे. विज्ञानशास्त्राची पध्दती येण्यापूर्वी सर्वत्र हाच प्रकार दिसून येतो. काही थोड्या व्यक्तीच अशा बुध्दिवादात रमत. तत्त्वचिंतनात मग्न होत. परंतु त्यांच्या त्या चर्चेचा परिणाम सार्या जनतेवरही होत असे व सार्वजनिक ठिकाणी इतर गोष्टींच्या चर्चा होत, त्याप्रमाणे तत्त्वज्ञानाच्याही होत. त्या काळचे जीवन एक प्रकारे सामुदायिक होते. आजही हिंदुस्थानात ते तसेच आहे. विशेषत: खेड्यापाड्यांत तरी ते तसे होते. लोक बाजारात, नदीकाठी, विहिरीवर, चावडीत, मंदिरात, मशिदीत जमत. सर्वसामान्य अडीअडचणींची तेथे चर्चा होई. निरनिराळ्या बाताम्या येत, त्यांवर बोलणे होई. आणि अशा चर्चेतून जनतेचे मत तयार होई, त्याला वाचा फुटे. अशा चर्चांना भरपूर फुरसत होती.