प्रचंड कारखानदारीचा आरंभ : टिळक आणि गोखले : स्वतंत्र मतदारसंघ
हिंदु-मुस्लिम समस्येची जी पार्श्वभूमी ती शोधीत जाताजाता आणि पाकिस्तान व हिंदुस्थानची फाळणी ही जी मागणी तिच्यापाठीमागील सारे समजावे म्हणून लिहीत असता मी जवळजवळ ५० वर्षांच्या कालखंडावर झेप घेतली. या अर्धशतकात अनेक फेरबदल होत होते. सरकारच्या बाह्य यंत्रात काही फरक झाला नाही, परंतु लोकांच्या स्वभावात फरक पडत होता. काही सामान्य घटनात्मक सुधारणा देण्यात आल्या आणि त्यांचेच पुन:पुन्हा स्तोम माजविण्यात येत असे. त्या क्षुद्र सुधारणांनी ब्रिटिश सत्तेचे हुकुमशाही सार्वभौम स्वरूप तिळभरही कमी झाले नव्हते, किंवा दारिद्र्य आणि बेकारी या प्रश्नांनाही त्या सुधारणांनी स्पर्श झाला नव्हता. १९११ मध्ये ज्याला पुढे जमशेटपूर नाव मिळाले त्या ठिकाणी जमशेटजी टाटा यांनी लोखंडी आणि पोलादी कामाचा प्रचंड कारखाना सुरू केला. या व अशाच दुसर्या उद्योगांकडे सरकार नाराजीने बघे आणि कोणत्याही प्रकारे उत्तेजन देण्यात येत नसे. मुख्यत: अमेरिकन तज्ज्ञांच्या साहाय्याने पोलादाचा धंदा सुरू करण्यात आला. या कारखान्याचे बाल्य मोठ्या अडीअडचणींतून गेले. पंरतु १९१४ ते १९१८ चे महायुध्द आले आणि या बाळाला बाळसे चढले. परंतु युध्दोत्तर पुन्हा या बाळाला दुबळेपणा आला. कारखाना ब्रिटिश भांडवलदारांच्या हातात जाण्याची वेळ आली होती. परंतु राष्ट्रीय दडपणामुळे आणीबाणीची वेळ निभावली.
हिंदुस्थानात कारखान्यातील नवीन कामगारवर्ग वाढत होता. तो असंघटित आणि दुबळा होता. हा कामगारवर्ग अत्यंत दरिद्री आणि ज्यांचे राहणीचे मान कमालीचे खालच्या दर्जाचे असे, अंशातून आलेला असे. त्यामुळे पगारवाढ होत नसे, सुधारणा होत नसे. अ-कुशल कामगार कोट्यवधी होते ते बेकार होते. वाटेल तितका आणि वाटेल तेव्हा त्यांचा पुरवठा होऊ शकत असे आणि त्यामुळे संप यशस्वी होणे अशक्य असे. पहिली ट्रेड युनियन काँग्रेस १९२० च्या सुमारास संघटित करण्यात आली. हिंदी राजकीय क्षेत्रात दृश्य स्वरूपात फेरबदल घडवून आणण्याइतकी या नवीन कामगारांची संख्या नव्हती. शेतीवर काम करणार्या शेतकरी कामकरी लोकांच्या सिंधूसमोर हे कारखान्यातील कामगार केवळ बिंदुवत होते. १९२० नंतर कामगारांचा आवाज जरा बुलंद होऊ लागला, ऐकला जाऊ लागला. त्या आजावाकडेही दुर्लक्ष करण्यात आले असते. परंतु रशियन क्रांतीमुळे कारखान्यातील या नवकामगारांकडे लक्ष देणे प्राप्त झाले होते. काही मोठे आणि चांगले व्यवस्थित असे संपही झाले. त्यामुळेही लक्ष देणे भाग पडले.
खरे म्हणजे देशभर शतकरी पसरलेले. त्यांचा प्रश्न खरा प्रश्न होता. परंतु राजकीय पुढार्यांचे किंवा सरकारचे, कोणाचेच लक्ष त्यांच्याकडे नव्हते. राजकीय चळवळीच्या आरंभी आरंभीच्या काळात वरिष्ठ मध्यम वर्गाच्याच विचारांना महत्त्व होते. हे लोक धंदेवाईक होते. राज्यकारभाराच्या यंत्रातील जागांकडेच लक्ष देणारे बरेचसे यात असत. १८८५ मध्ये राष्ट्रसभा जन्मली. जसजशी राष्ट्रसभा वयात येऊ लागली, तसतसे नवीन नेतृत्व पुढे येऊ लागले. हे नवे नेतृत्व चढाई करणारे निर्भय होते. खालचा मध्यमवर्ग, विद्यार्थी, तरुण लोक यांचे प्रतिनिधत्व करणारे हे नेतृत्व होते. वंगभंगाच्या चळवळीमुळे बंगालमध्ये समर्थ आणि चढाऊ वृत्तीचे नवनवे पुढारी पुढे आले होते. परंतु या नवीन काळाचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रातील बाळ गंगाधर टिळक यांच्याकडेच बोट दाखवावे लागेल. राष्ट्रीय सभेतील जुन्या नेतृत्वाचे प्रतिनिधी एक महाराष्ट्रीयच होते. गोपाळ कृष्ण गोखले हे त्यांचे नाव. टिळकांच्याहून ते वयाने लहान. परंतु अती कर्तृत्ववान असे ते होते. देशातील वातावरण क्रांतिकारक घोषणांनी दुमदुमले होते. लोक चवताळले होते. संघर्ष अटळ होता. राष्ट्रीय सभेत दुफळी होऊ नये म्हणून त्या राजकीय पितामहांना-दादाभाई नौरोजींना राजकीय संन्यासातून पुन्हा राजकीय संसारात मुद्दाम आणण्यात आले. दादाभाईंविषयी सर्वांनाच आदर आणि पूज्यभाव. देशाचे ते जणू तात होते. परंतु थोडा वेळ शांती मिळाली आणि १९०७ मध्ये अपरिहार्य असा अंतर्गत संघर्ष झाला. नेमस्तांचा तात्पुरता विजय दिसून आला. कारण त्या वेळेस राष्ट्रीय सभेचा मतदारसंघ फार लहान होता आणि संस्थेचा घटनात्मक ताबा नेमस्त पक्षाकडे होता. टिळक आणि त्यांच्या पक्षाचे लोक यांच्याकडेच हिंदुस्थानातील राजकीय दृष्ट्या जागृत झालेल्या बहुसंख्य लोकांचा ओढा होता, यात संशय नव्हता. राष्ट्रीय सभेचे महत्त्व फार कमी झाले आणि दुसर्याच चळवळीवर लक्ष केंद्रीभूत होऊ लागले. बंगालमध्ये दहशतवादी चळवळ सुरू झाली. रशियन आणि आयरिश क्रांतिकारकांच्या धोरणाचे, उदाहरणाचे अनुकरण सुरू झाले.