हिंदी राज्यातून फुटून बाहेर पडण्याचा असला हक्क त्यातील कोणा विभागाला द्यावयाचा असेल तर निदान तसा हक्क लागू होण्यापूर्वी योग्य व्यवस्थित शासनसंस्था असलेले, ती शासनसंस्था प्रत्यक्षात चालू केलेले, असे स्वतंत्र हिंदी राज्य अस्तित्वात येणे अवश्य आहे.  म्हणजे मग तसा फुटून निघण्याचा विचार कोणी करून लागले तर त्यावेळेपावेतो परकीयांचा प्रभाव नाहीसा झालेला असल्यामुळे व देशातील संकटे प्रत्यक्ष खरीखरी समोर उभी राहिल्यामुळे त्या प्रश्नाचा विस्तार केवळ वस्तुनिष्ठ दृष्टी ठेवून, व त्यातल्यात्यात शक्य तितक्या त्रयस्थ वृत्तीने करणे त्या वेळी शक्य तरी होईल.  आजच्या भावनाविवश मन:स्थितीत आजच तसला निर्णय ठरवला तर त्याचे दुष्परिणम पुढे सर्वांनाच भोगावे लागणार हे निश्चित, ही भावनेने भारलेली हल्लीची वृत्ती त्यावेळेपावेतो तरी निवळली असेल.  अशा दृष्टीने विचार केला तर असे वाटते की, हिंदी राज्यातून बाहेर पडण्याची एखाद्या विभागाची इच्छा असली तर त्याकरिता अनुज्ञा मिळावयाची ती स्वतंत्र हिंदी राज्यसंस्था स्थापन झाल्यानंतर काही एका किमान कालमर्यादेनंतरच, उदाहरणार्थ, दहा वर्षे एकत्रात काढल्यानंतरच मिळावी.  ही कालमर्यादा संपल्यानंतर कोणा विभागाला बाहेर पडायचे असेल तर त्याने त्याकरिता यथायोग्य सनदशीर मार्गाचाच अवलंब केला पाहिजे व विभक्त होण्याची त्या विभागाची मागणी त्यातील प्रजाजनांचे तसे स्पष्ट मत व्यक्त झाल्यावरच त्या मताच्या अनुरोधाने केली गेली पाहिजे.

आमच्यापैकी पुष्कळ लोकांना हिंदुस्थानातील हल्लीच्या परिस्थितीचा अत्यंत वीट आला आहे, आणि त्यांना ह्या परिस्थितीतून एकदाचे बाहेर कसे पडू अशी अत्यंत आतुरता लागली आहे.  परिस्थितीचा काच मानेभोवती आवळतो आहे, जीव गुदमरतो आहे, अशा स्थितीत सहजगत्या वाहत आलेल्या कोठल्याही गवताच्या काडीचा आधार घ्यायलासुध्दा काहीजण तयार आहेत, त्यांना वाटते क्षणभरच का होईना हे हाल थांबतील, श्वास घ्यायला सापडेल.  असे वाटणे स्वभाविकच आहे, पण हे जीवनव्यापी प्रश्न कसे सोडविले जातील यावर कोट्यवंधी लोकांचे क्षेम, जगाची भाविकालीन शांतता अवलंबून असताना ते प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न, असे काहीतरी घाबरून जाऊन किंवा तात्पुरता काही लाभ पाहून करण्यातही धोका आहेच.  आम्हा हिंदी लोकांपुढे हिंदुस्थानात सर्वनाशाचे प्रसंग सदासर्वदा उभेच असतात, आणि काही वेळा तर गेल्या वर्षी बंगालमध्ये व अन्यत्र झाले त्याप्रमाणे अखेर सर्वनाश आमच्यावर कोसळतोच.  हा  बंगालमधील दुष्काळ व त्याच्यामागोमाग आलेली संकटपरंपरा म्हणजे काही अद्‍भुत अनपेक्षित कारणामुळे क्वचितच अपवादात्मक घडणारा व त्यामुळे आटोपता न येण्यासारखा व आगाऊ व्यवस्था करता न येण्यासारखा, केवळ कुदैवाने घडलेला, असा अनर्थ नव्हता.  देशाच्या अंगोपांगातच उत्पन्न होऊन खोलवर रुजलेली, पिढ्यानपिढ्या सोसलेली व आता मर्मस्थानापर्यंत पोचलेली व्याधी हिंदुस्थानला कधी छळते आहे त्याचे प्रत्यक्ष हिंदुस्थानचेच ते एक उग्र, कडक चित्र होते.  आपण सर्वांनी मिळून सामुदायिक प्रयत्न करून या व्याधीवर उपचार करून तिचे मुळासकट उच्चाटन केले नाही तर उत्तरोत्तर ती अधिकच भयंकर, अधिकच अनर्थकारक रूपे घेईल.  हिंदुस्थानचे तुकडे झाले, व जो तो विभाग इतरांची काही पर्वा न करता आणि त्यांच्याशी मिळूनमिसळून सहकार्य न करता आपल्यापुरतेच पाहू लागेल तर देशाला लागलेली ही व्याधी बळावत जाईल, पुढची काही आशा किंवा कोणाचे साहाय्य दृष्टीसमोर नसल्याने जिकडे तिकडे दुर्दशा माजेल.  आज कामाला लागलो तरी आतापर्यंत झाला तेवढासुध्दा उशीर भयंकर झाला आहे, आतापर्यंत फुकट गेलेला काळ आपल्याला भरून काढायचा आहे.  बंगालच्या दुष्काळाने आपल्याला जो तडाखा बसला त्याने तरी आपले डोळे उघडणार की नाही?  राजकीय क्षेत्रात कोणाच्या वाट्याला शेकडा किती प्रमाणात जागा मिळाव्या, कोणाच्या पारड्यात भरीला अधिक टाकावे, सर्वांना समतोल कसे करावे, कोणत्या हक्कावर काय नियंत्रणे असावी, विशिष्ट हक्क असलेल्या काही गटांना धक्का न लावता कसे जपून ठेवावे आणि नवे हक्क नव्याने देऊन आणखी नवेनवे विशिष्ट गट कसे निर्माण करावे, आपल्याला आपली प्रगती करण्याची इच्छा नसली, किंवा इच्छा असली तरी ते करण्याची शक्ती नसली तर इतरांचे पाय ओढून त्यांनाही कसे पुढे जाऊ देऊ नये, रूढमूल हक्कांची काय व्यवस्था करावी, आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत फारशी घडामोड कशी टाळावी, फारतर किरकोळ वरवर फरक करून हिंदुस्थानचे हल्लीचेच रूप कायम ठेवण्याकरिता काय धडपड करावी, या असल्याच विवंचनेत गढून गेलेले कितीतरी महाभाग आजघटकेलासुध्दा सापडतात.  ह्याच रीतीने पुढचा विचार चालविला तर महामूर्खपणा पदरी येणार आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel