प्राचीन इतिहास साधने : धर्मग्रंथ व पुराणे
सिंधूच्या खोर्यातील संस्कृतीचा शोध लागण्यापूर्वी भारतीय संस्कृतीचा प्राचीनतम पुरावा म्हणजे वेदच समजले जात होते. वेदांचा काळ कोणता याविषयी पुष्कळ मतभेद होते. युरोपियन पंडित वेदांचा काळ अलीकडे ओढीत तर हिंदी विद्वान फार मागे नेत. शक्य तेवढे मागे जाऊन आणि आपल्या प्राचीन संस्कृतीचे त्यामुळे महत्त्व वाढवावे ही हिंदी लोकांची इच्छा असे व त्याचे त्यांना फार अगत्य वाटे. प्राध्यापक विंटरनिट्झ यांचे मत असे की वेदांचा आरंभ इसवी सनापूर्वी दोन ते अडीच हजार वर्षे असावा. म्हणजे हा काळ मोहेंजो-दारो येथील संस्कृतीच्या जवळजवळच येतो.
पुष्कळसे विद्वान लोक ॠग्वेदाचा काळ ख्रिस्तपूर्व १५०० मानतात. परंतु मोहेंजो-दारो येंथील उत्खननामुळे हा काळ अधिक मागे नेण्याकडे अलीकडे प्रवृत्ती दिसते. तो नक्की काळ कोणताही असो हे वाङ्मय ग्रीक किंवा इस्त्राइली वाङ्मय यापेक्षा अधिक प्राचीन दिसते. अतिप्राचीन काळी मनुष्याच्या मनात काय विचार येत होते त्याचा पुरावा या ॠग्वेदात सापडतो. मॅक्समुल्लरने ॠग्वेदाला ''आर्यमानवाने उद्धोषित केलेली श्रुती'' म्हटले आहे.
हिंदुस्थानच्या समृध्द भूमीत आर्यवंशाच्या झुंडीच्या झुंडी शिरून त्यांची रीघ लागली. तेव्हाच्या त्यांच्या स्फूर्तीचा आविष्कार झाला तो वेदरूपाने झाला. सर्व आर्यवंशाची सामाईक सर्वांच्या मालकीची जी विचारसंपत्ती होती, त्यातले विचार त्यांनी येताना बरोबर आणले होते. त्यातूनच इराणात अवेस्ता निघाला व त्या विचारांचाच विकास आर्यांनी हिंदुस्थानात केला. वेदांची भाषा व अवेस्तातील भाषा यांचे विलक्षण साम्य आहे. लक्षात घेण्याजोगी एक गोष्ट म्हणून कोणी असे म्हटले आहे की, महाकाव्यातील संस्कृत भाषेशी वेदभाषेचे जितके साम्य आहे, त्याहून अधिक साम्य वेदभाषा व अवेस्ती भाषा यांच्यात आहे.
प्रत्येक धर्माचे श्रध्दाळू अनुयायी आपले धर्मग्रंथ निदान त्यातला बराचसा मोठा भाग, प्रत्यक्ष ईश्वरप्रणीत, अपौरुषेय मानतात. अशा स्थितीत या धर्मग्रंथांचा साधकबाधक विचार करणार तरी कसा ? त्या धर्मग्रंथांचे पृथक्करण करणे, त्यांच्यावर टीका करणे, त्यांच्याकडे मानवनिर्मित अशा दृष्टीने बघणे हे या धार्मिकांना सहन होत नाही. त्यांच्या धर्मभावना दुखावल्या जातात. परंतु या धर्मग्रंथांचा विचार करायला, समजून घ्यायला दुसरा मार्ग नाही.
धार्मिक ग्रंथ वाचायचे माझ्या नेहमी जिवावर येते. आमच्या धर्मग्रंथांत सारे काही आहे, तोच फक्त प्रमाण अशीही त्या त्या धर्मानुयायांची एकमुखी वृत्ती मला आवडत नव्हती. धर्माच्या आचाराचे जे दृश्य प्रत्यंतर माझ्या डोळ्यांपुढे प्रत्यक्ष होते त्यामुळे त्या त्या धर्माच्या मूळ आधारग्रंथापर्यंत जाण्याचा मला मोठा उत्साह नव्हता. असे असूनही या धर्मग्रंथांकडे मला कसेतरी वळावेच लागे, कारण त्यांच्याविषयी अज्ञान असणे म्हणजे काही मोठा गुण नव्हता आणि पुष्कळ वेळा असे ज्ञान नसल्यामुळे पंचाईतही पडे. काही धर्मग्रंथांनी मानवजातीवर विलक्षण परिणाम केलेला आहे ही गोष्ट मला माहीत होती आणि जे ग्रंथ असा परिणाम करू शकतात त्यांच्यात मुळातच काहीतरी गुण, शक्ती, स्फूर्तीचा जिवंत उगम असणारच. मनात आणून प्रयत्न केला तरी या धर्मग्रंथातले पुष्कळसे भाग मला मोठे जड गेले, कारण त्यात पुरेसे चित्तच लागेना. परंतु काही काही उतार्यांतील निव्वळ सौंदर्य मला मुग्ध करून सोडी. मध्येच एखादे असे वाक्य येई की मला जणू विजेचा झटका असे व येथे काहीतरी खरोखरच अतिउदात्त असे आहे अशी खात्री पटे. भगवान बुध्दाच्या किंवा ख्रिस्ताच्या काही शब्दांतून अशा काही गंभीर अर्थाचा प्रकाश झळके की, त्यांच्या काळात दोन हजार किंवा अधिकच वर्षांपूर्वी ते शब्द जितके लागू पडत असतील तितकेच आजही लागू पडतात असे मला दिसून येई. त्या शब्दात जाज्वल्य सत्य, देशकाल या मर्यादांचे काही मात्रसुध्दा चालणार नाही अशी चिरंतन शाश्वतता होती. सॉक्रे़टिस किंवा चिनी तत्त्वज्ञानी यांच्याबद्दल वाचीत असताना असाच अनुभव येई व उपनिषदे आणि भगवद्गीता वाचतानाही कधी कधी हाच प्रयत्य येई. अध्यात्म किंवा कर्मकांडा वगैरे पुष्कळ अवांतर विषयांची मला जिज्ञासा नव्हती, कारण माझ्यासमोर जे प्रश्न होते त्यांच्याशी वास्तविक त्या गोष्टींचा संबंध नसे. जे मी वाचून काढले, त्यातील गर्भितार्थ मला सापडला नसणे शक्य आहे आणि खरोखरच कधीकधी दुसर्यांदा तेच वाचून अधिक प्रकाश पडे. मूळ उतारे समजून घेण्याचा मी फारसा प्रयत्न केला नाही, आणि मला ज्यांचे महत्व वाटत नसे ते मी सोडूनही देत असे. तसेच विस्तृत टीपा व भाष्ये यांच्यातही मला सार वाटेना. हे ग्रंथ किंवा कोणताही ग्रंथ ईश्वरप्रणीत म्हणून जसाच्या तसा शंकाकुशंका न काढता मान्य करण्याची माझी तयारी नव्हती. त्यातून मनाची तशी तयारी केलीच तर बहुधा माझी अर्थग्रहणबुध्दी काम करीत नसे, व मला ग्रंथातले काही समजेना. हे धर्मग्रंथ मानवांनीच लिहिलेले आहेत. मानवकोटीच्या वरची म्हणून काहीएक देवकोटी असल्यास तिचे मला काही ज्ञान नव्हते व अशी कोटी असल्याची खात्री तर नव्हतीच नव्हती. तेव्हा अशा देवाचे अवतार किंवा प्रेषित व्यक्तींची नव्हे; मी प्रज्ञावान, दूरदृष्टी, परंतु मानवकोटीतल्या व्यक्तींची ही ग्रंथनिर्मिती आहे, अशा भावनेने मी ते ग्रंथ वाचले तर जास्त सख्ख्याने जास्त मोकळेपणाने माझी बुध्दी काम देई.