निर्माण केले. शाकुन्तल हे ते नाटक. हे नाटक सार्या मानवजातीला आपलेसे वाटेल. उज्जयिनीला जन्मलेल्या या नाटकाची पाश्चिमात्यांना ओळख वुईल्यम जोन्स याने करून दिली. ते नाटक निर्माण झाल्यावर तेराशे वर्षांनी पाश्चिमात्यांना त्याचा परिचय झाला. कालिदासाने जेथे मानवजातीच्या महापुरुषांची नावे- अमर नावे -कोरलेली असतात तेथे स्वत:चेही नाव कायम कोरून ठेवले आहे. या नावांनीच मानवजातीचा इतिहास बनत असतो, किंबहुना ही नावे म्हणजेच इतिहास असे म्हटले तरी चालेल.''
कालिदासाने दुसरीही नाटके आणि काही महाकाव्ये लिहिली आहेत. त्याचा काळ अनिश्चित आहे. परंतु गुप्त घराण्यातील दुसरा चंद्रगुप्त राजा याच्या दरबारी उज्जयिनी येथे तो होता. या चंद्रगुप्तालाच विक्रमादित्य अशीही पदवी होती. हा काळ म्हणजे ख्रिस्त शकाच्या चौथ्या शतकाच्या अखेरचा काळ. या विक्रमादित्याच्या पदरी नवरत्ने होती. त्यांपैकी कालिदास होता अशी आख्यायिका परंपरेने चालत आली आहे. स्वत:च्या हयातीतच त्याच्या गुणांचे चीज होऊन त्याला यशश्री लाभली. मानवी जीवनाच्या ज्या लाडक्या मुलांना त्या कडक खडबडीत कडापेक्षा त्या जीवनाचे अंगचे सौंदर्य व मायाच जास्त प्रचीतीला आली त्या भाग्यवंतांत कालिदासाची गणना आहे. त्याच्या वाङ्मयात सर्वत्र जीवनावरचे अपार प्रेम व निसर्गावरची, सृष्टिसौंदर्यावरची अपार प्रीती प्रतीत होते.
कालिदासाच्या प्रदीर्घ काव्यांपैकी 'मेघदूत' एक आहे. एका प्रियकाराची प्रियकरणीपासून ताटातूट होऊन तो कैदी झालेला असताना पावसाळा जवळ आल्यामुळे मेघ दिसू लागतात, आणि हा प्रियकर एका मेघाला आपला विरहामुळे प्रेमाव्याकुळ झालेल्या मनाचा निरोप प्रियकरणीला नेऊन पोचविण्याची प्रार्थना करतो. प्रसिध्द अमेरिकन पंडित रायडर याने मेघदूताची व कालिदासाची सुंदर शब्दांत स्तुती केली आहे. मेघदूतातील पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्हींचा उल्लेख करून तो म्हणतो, ''पूर्वार्धात बाह्य सृष्टीचे वर्णन आहे, परंतु मानवी भावनांचे धागे त्यामध्ये गुंफलेले आहेत. उत्तरार्धात मानवी हृदयाचे चित्र आहे; परंतु या चित्राला निसर्गसौंदर्याची चौकट आहे. दोन्ही भागांतील रचना इतकी निर्दोष आहे की कोणता भाग अधिक सरस हे सांगणे कठीण आहे. हे निर्दोष काव्य मुळात वाचणार्यांपैकी काहींना पहिला भाग मुग्ध करतो तर काहींचे हृदय दुसर्या भागाने द्रवते, उचंबळते. एकोणिसाव्या शतकापर्यंतही युरोपला ती गोष्ट नीटशी कळली नाही. ती गोष्ट पाचव्या शतकातच कालिदासाने पूर्णपणे जाणली होती. हे जग काही केवळ मानवाकरिता केलेले नाही, आणि ज्या मानाने मानवेतर जीवनाची भव्यता आणि योग्यता तो ओळखील त्या मानाने त्याचा विकास होत जाईल. कालिदासाने हे सत्य अचूक निवडून काढले, यातच त्याच्या बुध्दिमत्तेची अपूर्वता आहे, थोर काव्याला निर्दोष रचनेची, बाह्य आकाराची परिपूर्णता त्यांची जितकी आवश्यकता असते, तितकीच आवश्यकता ह्या सत्याचीही असते. अस्खलित, अप्रबंध काव्यशक्ती दुर्मिळ नाही, बौध्दिक धारणाही दुष्प्राप्य नाही, परंतु अलौकिक प्रज्ञा आणि अपूर्व प्रतिभा, थोर बुध्दी आणि थोर काव्यशक्ती यांचा मधुर संगम ज्यांच्या ठायी झालेला आहे अशा दहाबाराच व्यक्ती जागाच्या आरंभापासून आपणास झालेल्या दिसतील. कालिदासामध्ये द्विविध शक्तींची ही जोड असल्यामुळे त्याचे स्थान अनॅक्रेऑन, होरेस, किंवा शेले यांच्याबरोबर नसून सोफोक्लिस, व्हर्जिल, मिल्टन यांच्याबरोबर आहे.
मृच्छकटिक हे संस्कृतातील आणखी एक अप्रसिध्द नाटक आहे. ते कदाचित कालिदासाच्याही आधीचे असण्याचा संभव आहे. या नाटकाचा शूद्रक हा कर्ता. हे नाटक थोडे कृत्रिम, नाजूक, कोमल व हळुवार भावनांनी भरलेले आहे, परंतु त्यात एक प्रकारचे असे यथार्थ दर्शन आहे की त्यामुळे आपले हृदय हलते व त्या काळातील जीवनाचे, संस्कृतीचे, मानवी मनाचे आपणास ओझरते दर्शन घडते. इसवी सनाच्या चवथ्या-पाचव्या शतकांतच दुसर्या चंद्रगुप्ताच्या काळात 'मुद्राराक्षस' हेही प्रसिध्द नाटक लिहिले गेले. त्या नाटकाचा कर्ता विशाखदत्त. हे राजकीय नाटक आहे. एखादी जुनी आख्यायिका किंवा प्रेमकथा वगैरे काहीएक नाही. चंद्रगुप्त मौर्याच्या काळासंबंधीचे हे नाटक असून, अर्थशास्त्राचा कर्ता आर्यचाणक्य, चंद्रगुप्ताचा मुख्य प्रधान हा या नाटकातील नायक आहे. काही अंशी आजच्या काळातही शोभेल असे हे नाटक आहे.