ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची ''अहिंसातत्त्वावर दृढ श्रध्दा आहे ती स्वराज्य प्राप्तीपुरते धोरण म्हणून व प्रत्यक्ष आचारणात आणण्याचे तत्त्व म्हणून तेवढ्यापुरतीच मर्यादित नसून स्वराज्यप्राप्तीनंतरही शक्य तेथे हे धोरण व आचरण चालवावे असे समितीचे मत आहे. जगाचा संसार आपल्या हाताने उधळून नाहीसा करून पुन्हा रानटी अवस्थेत जायचे जर जगाला टाळायचे असेल तर सार्या देशांनी संपूर्ण शस्त्रसंन्यास केला पाहिजे व जगाची काही एक नवी, अधिक न्यायाची, राजकीय व आर्थिक व्यवस्था ठरवली पाहिजे अशी या समितीची पक्की खातरी झाली आहे व अलीकडच्या जागतिक घटनांमुळे जगालाही हेच प्रत्यंतर आले आहे. म्हणूनच स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हिंदुस्थान देश हा नेहमी संपूर्ण शस्त्रसंन्यासावर भर देत राहील व जगाला उदाहरण घालून देण्याकरिता या तत्त्वाचे प्रत्यक्षात आचरण करण्याच्या कामी हिंदुस्थानने सिध्द राहिले पाहिजे. देशाबाहेरच्या जगात व देशातल्या देशात काय घडेल त्यावरच हा शस्त्रसंन्यासाचा पुरस्कार अवलंबून राहणार, परंतु या देशाचे राज्य चालविणारे सरकार या तत्त्वाचे आचरण अत्यंत कसोशीने करील. राष्ट्राराष्ट्रांची एकमेकाविरुध्द चालणारी युध्दे थांबून जगात शांतता नांदावी व खरा शस्त्रसंन्यास व्हावा अशी परिस्थिती येणे या युध्दाची व विरोधाची मूळ कारणे नाहीशी करण्यावरच अखेर अवलंबून आहे. ती कारणे नाहीशी करायची असतील तर त्याकरिता एका देशाने दुसर्या देशावर वर्चस्व चालवणे किंवा एका समाजाने किंवा गटाने दुसर्याची पिळवणूक चालवणे हे प्रकार बंद झाले पाहिजेत. ते बंद व्हावेत म्हणून शांततामय मार्गाने हिंदुस्थान देश आपल्यापरीने प्रयत्न चालू ठेवील, आणि ह्याच उद्देशाने या देशातील लोकांना आपले राष्ट्र स्वतंत्र व स्वावलंबी असावे असे वाटते. ही स्वातंत्र्यप्राप्ती म्हणजे जगभर शांतता नांदावी, जगाची प्रगती व्हावी एवढ्याकरिता इतर स्वतंत्र राष्ट्रांच्या संगतीत हिंदुस्थानने करावयाच्या सहकार्यांची नांदी ठरेल.'' कोणत्याही राष्ट्रामध्ये वाद पडल्यास तो मिटविण्याकरता युध्दाखेरीज इतर उपाय योजावे व शस्त्रसंन्यास व्हावा, अशी उत्कंठा काँग्रेसला लागली असली तरी त्यातही काळवेळ पाहिली पाहिजे, उपायांची उपयुक्तता कितपत आहे व तत्त्वाची मर्यादा कोठवर पाळायची हेही लक्षात ठेवले पाहिजे असा आग्रह काँग्रेसने धरला हे या ठरावावरून लक्षात येईलच.
काँग्रेसमध्ये निकरावर आलेले हे अंतर्गत मतभेद सन १९४० साली मिटले व त्यानंतर आम्हा काँग्रेसजनांपैकी फार लोकांना वर्षभर बंदिवास भोगावा लागला. परंतु सन १९४१ च्या डिसेंबर महिन्यात गांधीजींनी अहिंसातत्त्व संपूर्णपणे पाळले गेले पाहिजे असा आग्रह धरल्यामुळे पुन्हा तोच मतभेदाचा प्रसंग निकरावर आला. त्यावरून पुन्हा एकवार काँग्रेस व गांधीजी यांची फाटाफूट जाहीरपणे झाली व काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना अबुल कलम आझाद व काँग्रेसचे इतर पुढारी यांना गांधीजींचा ह्या विषयावरील दृष्टिकोण स्वीकारणे अशक्य झाले. सर्वसाधारणपणे पाहिले तर काँग्रेसचा त्यातल्यात्यात गांधीजींच्या काही कट्ट्या अनुयायांचासुध्दा या प्रश्नावर गांधीजींशी मतभेद होता हे स्पष्ट दिसू लागले. परिस्थितीची निकड, व एकामागून एक चमत्कार निघावे तशा घडत चाललेल्या घटनांचा झपाटा, यांचा परिणाम आम्हा सर्वांवर तर झालाच, पण तो गांधींच्यावरही झाला, व काँग्रेसचा दृष्टिकोण त्यांनी सर्वस्वी मान्य केला नसला तरी त्यांनी आपले स्वत:चे मत काँग्रेसने मानलेच पाहिजे हा आग्रह चालवला नाही.