आज सर्वत्र संकुचित राष्ट्रीयता वाढली आहे; त्यामुळे स्वत:कडेच फक्त पाहावयाचे आणि दुसर्यावर अविश्वास दाखवायचा असा आजकालचा जमाना आहे. आग्नेय आशियातील देशांतील लोकांना युरोपियन सत्तेची भीती वाटते आणि तिटकाराही वाटतो; तरीही युरोप अमेरिकेचे अनुकरण करण्याची इच्छाही आहे. हिंदुस्थान परतंत्र असल्यामुळे त्याच्याविषयी एक प्रकारचा त्यांना तिटकारा वाटतो. परंतु हे सारे असले तरी पाठीमागे भारताविषयी मैत्रीची आणि आदराची भावना आहे. कारण जुन्या आठवणी टिकून आहेत व एके काळी हिंदुस्थान आपली मातृभूमी होती, आणि हिंदुस्थानने स्वत:च्या भांडारातून भरपूर देऊन आपणांस वाढविले ही गोष्ट ते विसरले नाहीत. ज्याप्रमाणे ग्रीक संस्कृती ग्रीसपासून निघून भूमध्यसमुद्राच्या आसपासच्या देशांतून परसली, पश्चिम आशियात गेली, त्याप्रमाणे भारतीय संस्कृतीचेही परिणाम अनेक देशांवर झालेले आहेत, आणि त्या देशांवर ह्या संस्कृतीची पक्की छाप पडलेली दिसते.
सिल्व्हा लेव्ही लिहितो, ''इराणपासून चिनी समुद्रापर्यंत, सैबेरियातील बर्फाच्छादित प्रदेशापासून तो जावा-बोर्नियोपर्यंत, आस्ट्रापियापासून तो सोकात्रापर्यंत भारतवर्षाने आपल्या धर्मकल्पना, आख्यायिका, कथापुराणे, स्वत:ची संस्कृती सर्वत्र फैलावून दिली होती. शतकामागून शतकांच्या दीर्घकालात जगाच्या एकचतुर्थांश लोकसंख्येवर भारताची पक्की खूण राहिलेली आहे. मानवजातीतील सत्तांशाचे सार, प्रतीक म्हणून गणली जाणारी जी थोर राष्ट्रे आहेत त्यांत असलेले भारताचे योग्य स्थान जग विसरले होते ते योग्य स्थान परत मागण्याचा भारताला अधिकार आहे.''*
-----------------------
* 'विशाल भारतासंबंधी संशोधनाची प्रगती, १९१७-१९४२' (कलकत्ता, १९४३) या यू. एन. घोसल यांच्या ग्रंथातून.
प्राचीन भारतीय कला
भारतीय संस्कृती व कला भारताच्या बाहेरची आश्चर्य वाटेल इतक्या दूरदूर अनेक देशांत परसल्यामुळे तिकडे या कलेचे काही उत्तमोत्तम आविष्कार दिसून येतात. दुर्दैवाने उत्तर हिंदुस्थानातील अनेक पुतळे, मूर्ती वगैरे शिल्पकामे अनेक विशाल व भव्य स्मारके काळाच्या ओघात नष्ट झाली. सर जॉन मार्शल म्हणतो, ''नुसत्या हिंदुस्थानातील भारतीय कलेचा विस्तार लक्षात घेतला तर त्या कलेचा जेमतेम निम्मा इतिहास काय तो कळतो. या कलेचे संपूर्ण स्वरूप समजावून घ्यायचे असेल तर आपण बौध्दधर्माच्या पाठोपाठ मध्य आशिया, चीन, जपान येथे गेले पाहिजे. तिबेट, बर्मा, सयाम या देशांत पसरताना या कलेने नवीननवीन स्वरूपे कधी धारण केली, नव्याच सौंदर्याचा तिला कसा बहर आला ते पाहिले पाहिजे. त्या कलेचा कांबोडिया आणि जावा येथील अनुपमेय भव्य आविष्कार पाहून छाती दडपते. यातील प्रत्येक देशात भारतीय कलेची भिन्नभिन्न प्रकृतीच्या बुध्दीची गाठ पडली. प्रत्येक देशातील परिस्थिती, वृत्ती, परंपरा जसजशी निराळी आढळली तसतसा भारतीय कलेने स्वत:मध्ये फरक करून घेतला व निरनिराळ्या देशात ती निरनिराळ्या वेषात वावरत असलेली आढळते. *
------------------------
* रेजिनॉल्ड ले मेच्या 'सयामातील बौध्दकला' (केंब्रिज, १९३८) यातील हा उतारा यू.एन. घोसल यांनी 'विशाल भारतीय संशोधनाची प्रगती' या पुस्तकात दिला आहे त्यातून येथे घेतला (कलकत्ता, १९४३).