रशिया देशात सोव्हिएट राज्यपध्दतीची ज्या मानाने वाढ होत गेली त्या मानाने इतर देशांतील कम्युनिस्ट पक्षाला कितपत यशापयश लाभले ते पाहणे बोधप्रद आहे. सोव्हिएट राज्यक्रांतीनंतर लगेच इतर देशांत अनेक लोकांना, विशेषत: श्रमजीवी कामगारवर्गातील सामान्य श्रेणीतील लोकांना उत्साहाचे भरते आले. ह्या उत्साहाच्या पहिल्या लाटेसरशी देशादेशातून कम्युनिस्ट मंडळे व पक्ष निघाले. मग ह्या मंडळांना त्या त्या देशातील राष्ट्रीय कामगारपक्षाकडून विरोध अनेक प्रसंगी होऊ लागला. सोव्हिएट सरकारने केलेल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात त्या राज्यपध्दतीबद्दल कुतूहलाची व उत्साहाची आणखी एक लाट पुन्हा पसरली आणि त्या लाटेत कामगारवर्गापेक्षाही मध्यम वर्गातले बुध्दिव्यवसायी लोकच बहुधा अधिक सापडले. परंतु सोव्हिएट संघातील सत्ताधार्यांनी पक्षापैकी अनेक लोकांची उचलबांगडी करून किंवा निकाल लावून पक्षाचे 'शुध्दीकरण' जेव्हा चालवले तेव्हा ही लाट पुन्हा ओसरली. काही देशांतून कम्युनिस्ट पक्षावर बंधी घालण्यात आली, तर काही देशांत त्या पक्षाची प्रगतीही झाली. पण प्रत्येक देशात राष्ट्रीय कामगारपक्षाच्या संघटना अस्तित्वात येऊन त्यांचा व कम्युनिस्ट पक्षाचा वेळोवेळी विरोध होत चालला. याचे कारण काही नवे धाडस करण्यापेक्षा जुन्या परिस्थितीला चिकटून राहण्याची कामगारवर्गाची प्रवृत्ती हे तर होतेच, पण शिवाय त्याहीपेक्षा बलवत्तर दुसरे एक कारण असे होते की, कम्युनिस्ट पक्ष म्हणजे आपल्या देशाबाहेरच्या परकीयांचा पक्ष आहे व त्या पक्षाच्या धोरणची सूत्रे रशियाच्या हाती असतात कामगारवर्गाची भावना होती. कामगारवर्गापैकी अनेकांचा कल साम्यवादाकडे असला तरी कम्युनिस्ट पक्षाशी सहकार्य करण्याच्या आड कामगारवर्गाची मुळातली राष्ट्रीय वृत्ती आडवी येई. सोव्हिएट राज्याच्या धोरणात वेळोवेळी जे अनेक पालट झाले ते रशियापुरता विचार केला तर सुसंगत वाटत असले तरी इत देशांतील कम्युनिस्ट पक्षांनीही त्याबरोबर आपले धोरण पालटावे हे विसंगत वाटे ही विसंगती येऊ द्यावयाची नसली तर जे रशियाच्या हिताचे तेच सार्या जगातला इतर राष्ट्रांच्या हिताचे असा सिध्दान्त गृहीत धरणे भाग होते. ह्या वेगवेगळ्या देशांतील कम्युनिस्ट पक्षाचे कार्य ठिकठिकाणच्या लोकांनी चालविले होते. त्यांपैकी काही स्त्रिया व पुरुष यांना त्या कार्याची अत्यंत आस्था होती व ते कार्य चालविण्यात कुशलही होते, परंतु या कार्यकर्त्यांना जनतेच्या राष्ट्रीय भावनेशी समरस होऊन त्या अनुरोधाने आपली चळवळ चालविण्याचे साधले नाही, आणि त्यामुळे ठिकठिकाणचे ते पक्ष दुबळे झाले. एकीकडे स्वत: सोव्हिएट संघ आपल्या राष्ट्रीय परंपरेशी आपला संबंध जोडून तो पक्का करण्याकरिता नवेनवे दुवे ठाकून-ठोकून घडवीत होता, तर दुसरीकडे इतर देशांतील ठिकठिकाणचे कम्युनिस्ट पक्ष आपापल्या राष्ट्रीय परंपरेपासून दूरदूर वाहवत चालले होते.
इतर देशांत याविषयी काय काय घडले याची मला तितकी विशेष माहिती नसल्यामुळे तिकडचे मला काही सांगता येणार नाही, पण हिंदुस्थानात काय स्थिती आहे हे पाहिले तर मला माहीत आहे की, येथील जनतेच्या मनात ज्या राष्ट्रीय परंपरा तुडुंब भरलेल्या आहेत, ज्यांनी जनमत भारावलेले आहे त्यांच्याशी येथील कम्युनिस्ट पक्षाने आपला काडीचाही संबंध ठेवलेला नाही, या पक्षाला त्यांची काही माहितीदेखील नाही. त्या पक्षाची अशी श्रध्दा आहे की, साम्यवाद म्हटला की जे काही जुने भूतकालातले असेल ते तुच्छ म्हणून लाथाडलेच पाहिजे. त्या पक्षाच्या दृष्टीने जगाच्या इतिहासाचा आरंभ सन १९१७ सालाच्या नोव्हेंबर महिन्यापासून झाल, त्याला आधी जे जे काही घडले असेल ते या मुख्य घटनेचा अवतार होण्यापूर्वीची पूर्वतयारी, आरंभापूर्वीची मांडामांड काय ती होती. वास्तविक पाहू गेले तर अन्नान्नदशेच्या काठावर येऊन पोचलेल्या लोकांची एवढी मोठी संख्या येथे असल्यामुळे, व देशातील अर्थव्यवस्थेला तडे पडून ती ढासळण्याच्या बेतात असल्यामुळे, साम्यवादाला अनुकूल असे केवढे विशाल क्षेत्र या देशात त्यांना असावयाला पाहिजे. एका अर्थी तशी अस्पष्ट अनुकूलता या देशात आहेही, पण कम्युनिस्ट पक्षाला त्या अनुकूलतेचा उपयोग करून घेता येत नाही, कारण लोकमताच्या गंगेचा उगम ज्या राष्ट्रीय भावनेच्या झर्यातून होतो त्या झर्याकडे चुकूनसुध्दा जाणे त्या पक्षाने वर्ज्य केले आहे, आणि तो जे शब्द वापरतो त्याच्या अर्थाचे पडसाद लोकांच्या अंतरंगात मुळीच उमटत नाहीत. त्या पक्षाचा उत्साह अद्याप टिकून आहे, पण तो पक्ष लहानशा मंडळाएवढाच राहिला आहे, तो वाढत नाही व देशात पाळेमुळे अद्यापही धरत नाही.
या अशा कारणामुळे ज्याला अपयश आले त्या वर्गात कम्युनिस्ट पक्षच काय तो एकटा आहे असे नाही. या पक्षाखेरीज या देशात इतरही अनेक मंडळी अशी आहेत की, त्यांना आधुनिकता, अद्ययावत चालीरीती यांच्याविषयी घोळघोळून मनसोक्त बोलता येते, पण आधुनिक वृत्ती, पाश्चात्त्य संस्कृती यांचे सारसर्वस्व कशात आहे त्याची खरी पारख त्यांना मुळीच नसते, आणि आपल्या स्वत:च्या संस्कृतीचा तर त्यांना गंधही नसतो. कम्युनिस्ट मंडळींच्या मनाला तळमळ लागायला काही ध्येय आहे, प्रगती करायला अंगात उत्साह आहे, तसे काही ध्येय किंवा उत्साहही या मंडळींजवळ नाही. जे पाश्चात्त्यांचे केवळ बाह्यरूप व वरवरचा साज (आणि त्याबरोबरच अनेकदा तितपतही इष्ट नसलेली इतर काही लक्षणे) एवढेच उचलून घेतात, आणि स्वत:ची अशी समजूत करून घेतात की पुरोगामी सुधारणा करायला निघालेल्या सेनेचे आपण आघाडीवरचे वीर आहोत. भाबड्या व उथळ बुध्दीची, परंतु स्वत:च्या मोठेपणाविषयी स्वत:ची भलतीच ठाम समजूत करून घेतलेली ही मंडळी मुख्यत: मोठमोठ्या निवडक शहरांत राहून पौर्वात्य काय किंवा पाश्चात्त्य काय, कोणत्याच संस्कृतीशी जिवंत संबंध नसलेले आपले कृत्रिम जीवन जगत असतात.