ही अशी तुलना करताना कोणती मूल्ये धरली पाहिजेत, कसोटी लावायला कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत? जपानने मांचूरिया देश आपल्या अमलाखाली घेतला, तेथे जपन्यांनी स्वत:च्या उपयोगाकरिता म्हणून प्रचंड उद्योगधंदे काढून आठ वर्षात मांचूरिया म्हणजे उद्योगधंद्यांनी संपन्न असा देश करून ठेवला, हिंदुस्थानात ब्रिटिशांनी कैक पिढ्या खटपट करून जितका दगडी कोळसा निघतो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक कोळसा मांचूरियात निघतो. साधनसंपन्नता, सुखसोयींच्या दृष्टीने पाहिजे तर इतर वसाहती साम्राज्यांच्या मानाने मांचूरियावरील जपानचे राज्य तुलनेने चांगले ठरेल*, पण या चांगल्या गोष्टींच्या यादीमागे पाहू गेले तर गुलामगिरी, क्रौर्य, अपमान, जनतेची पिळवणूक व एका राष्ट्राचे स्वत्व, तेथील लोकांचे आत्मतेज नाहीसे करण्याचा जेत्यांचा प्रयत्न हेहीत्यात होतेच. आपल्या अमलाखाली देशातील लोकांवर व विवक्षित जातींवर अमानुष अत्याचार करून त्यांना ठेचून टाकण्याच्या कामात आजवर कोणी कधीही केला नाही असा विक्रम जर्मन नाझी व जपानी लोकांनी केला आहे त्याची सर कोणाला कधी आली नाही. आम्हा हिंदी लोकांना ब्रिटिश सरकार या जर्मनांचे व जपान्यांचे वर्तन कसे आहे ते पाहा असे वारंवार बजावून सांगत असते, व आम्हाला असेही सांगितले जाते की, ब्रिटिशांनी तुम्हाला निदान इतक्या वाईट तर्हेने वागविले नाही. मग आता बरेवाईट, न्याय-अन्याय, ठरविण्याची ही नवी कसोटी, हे नवे माप प्रचारात आणावयाचे की काय?
---------------------------------------
* श्री. हॅलेट अबेड हे न्यूयॉर्क टाईम्स या वर्तमानपत्राचे वार्ताहर आशियातील अतिपूर्वेकडील वार्ता त्या वर्तमानपत्राला देण्याचे काम अनेक वर्षे करीत होते. त्यांनी लिहिलेल्या 'पॅसिफिक चार्टर' (१९४३) या पुस्तकात म्हटले आहे: ''नि:पक्षपातीवृत्तीने प्रामाणिकपणे जपानी लोकांबद्दल बोलायचे झाले तर असे मान्य केले पाहिजे की, आधिभौतिक साधनसंपत्ती व सुखसोयींच्या दृष्टीने पाहिले तर जपानने कोरिया देशात प्रशंसनीय कामगिरी केलेली आहे. त्यांनी त्या देशाचा राज्यकारभार हाती घेतला तेव्हा जिकडे तिकडे घाण झालेली होती, लोकांचे आरोग्य अगदी बिघडलेले होते, आणि देशातले दैन्य व दारिद्र्य पाहून खेद वाटे. पर्वतावरील झाडीतील झाडे पार कापून वाहून नेल्यामुळे देशातील पर्वत उघडे पडले होते, त्यांच्यामधील दर्यांतील प्रदेशातून वाहणार्या नद्यांना वारंवार पूर येऊन तो प्रदेश जलमय होण्याची आपत्ती नेहमी येई, देशात साधारण बरा म्हणण्यासारख एकही रस्ता नव्हता, जनता बहुतेक निरक्षर होती आणि मुदतीचे ताप, देवी, पटकी, आमांश, प्लेग हे रोग दरवर्षी पसरणारे साथीच्या स्वरूपाचे रोग होऊन बसले होते. आज कोरियाची स्थिती पाहिली तर पर्वतावर पुन्हा जिकडे तिकडे दाट झाडी आहे, त्या देशात आगगाडी (रेल्वे), दूरध्वनिवाहक (टेलिफोन) व विद्युत्संदेशवाहक (टेलिग्राफ) यांची व्यवस्था उत्तम आहे. सार्वजनिक आरोग्यव्यवस्था फारच दक्षतेने संभाळली जाते, व जिकडे तिकडे उत्तम रस्ते झाले आहेत, नद्यांना पूर येऊन त्यामुळे होणारे आसपासच्या प्रदेशाचे नुकसान आळण्याकरिता पुराचे पाणी अडविण्याची योजना, धरणे व पाटबंधारे झाल्यामुळे देशातील धान्याचे उत्पादन अफाट वाढले आहे व जलमार्गावरील वाहतुकीच्या सोयीकरिता उत्तम बंदरे बांधून त्यांची व्यवस्था चोख ठेवली आहे. देशातील धनधान्यसमृध्दी व लोकांचे आरोग्य इतके सुधारले आहे की, सन १९०५ साली देशाची लोकसंख्या १,१०,००,००० होती ती हल्ली २,४०,००,००० पर्यंत वाढली आहे आणि लोकांची राहणी या शतकाच्या आरंभाला होती ती आता कितीतरी पटीने सुधारून खूपच उत्तम झाली आहे.'' परंतु श्री.अबेड यांनी असेही दाखवून दिले आहे की, ही सारी लोकांच्या स्थितीत सुधारणा करण्यात आली आहे ती कोरिया देशातील लोकांचे कल्याण व्हावे म्हणून केलेली नसून जपानी लोकांना त्यांच्या व्यापार-व्यवहारात अधिकाधिक नफा होत जावा म्हणून आहे.
---------------------------
प्रस्तुत काळात पाहिले तर हिंदुस्थानात जिकडे तिकडे निराशवृत्ती खूपच पसरलेली आहे, मनासारखे काहीच घडत नसल्यामुळे लोक किंकर्तव्यमूढ बनले आहेत. याचे कारण शोधणे अवघड नाही, कारण आतापर्यंत जे काही घडत गेले त्यामुळे लोकांना कठोर अनुभव आले आहेत, व भविष्यकाळातही त्यांना काही चांगले घडण्याची फारशी आशा दिसत नाही. पण ही स्थिती जरी वरवर दिसत असली तरी अंतर्यामी पाहू गेले तर जनमनात काहीतरी खळबळ, धडपड, चालली आहे. लोकांत नवे जीवन, नवे चैतन्य स्फुरण पावण्याची लक्षणे दिसत आहेत, व काही वेगळ्याच अज्ञान प्रेरण लोकांच्या मनात वावरू लागल्या आहेत. उच्च पदावरून पुढारी आपला अधिकार चालवतात खरे, पण स्वत्वाची जाणीव होऊ लागलेल्या व स्वत:च्या भूतकालीच्या सीमापार होऊ पाहणार्या जनसमाजाच्या अज्ञात व अविचारी संकल्पाच्या लोंढ्यापुढे हे पुढारी त्यांची इच्छा नसेल अशा विवक्षित दिशेकडे लोटले जात असतात.