कारण खमेर प्रतिभेने जे सृजिले ते भारती असले तरी अतिभारतीही आहे.  खमेर संस्कृती ही भारतापासून मिळालेल्या स्फूर्तीवरच मुख्यत: उभी राहिली.  ही स्फूर्ती मिळाली नसती तर खमेर संस्कृतीने मध्य अमेरिकेतील मयलोकांच्या रानटी भव्यतेसारखी भव्यता निर्माण केली असती; परंतु एवढे खरे की विशाल भारतातील इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा भारतीय स्फूर्तीला येथेच खरी सुपीक व समृध्द भूमी मिळाली.'' *

याच वेळेस मनात विचार येतो की जी भारतीय स्फूर्ती विशाल भारतात बहरली ती येथे स्वत:च्या मायभूमीत हळूहळू मरणपंथाला लागली होती याचे कारण पुन:पुन्हा नवीन विचार, नवे प्रवाह आले.  त्या सर्वांना पोसतापोसता स्वत:चे स्वत:ला न उरल्याने भारतीय बुध्दीचा, भारतीय संस्कृतिक्षेत्राचा कस कमी होत गेला.  जोपर्यंत भारताने आपले अंतरंगीचे भांडार दुनियेसाठी खुले ठेवले होते, स्वत:च्या वैभवातून भारत दुसर्‍यांना मुक्तहस्ताने देत होता, आणि त्याबरोबरच जे जवळ नव्हते ते दुसर्‍यांपासून नि:संकोचपणे घेत होता, तोपर्यंत भारतीय आत्मा सतेज राहिला; भारतात चैतन्य, नावीन्य व सामर्थ्य राहिली.  परंतु आपले आहे ते जसेच्या तसे ठेवण्याच्या बुध्दीने, बाहेरच्या जगाचा संपर्क नको म्हणून भारत जसजसा संकोच करून हातपाय पोटाशी घेऊ लागला, तसतशी त्याची स्फूर्ती लोपत चालली व निर्जीव भूतकालावर सदैव दृष्टी ठेवून अर्थहीन कर्मकांडाच्या प्रदक्षिणा घालताघालता जीवन अधिकाधिक नीरस होत गेले.  सौंदर्यनिर्मितीची कला गेली ऐवढेच नव्हे, तर कला समजण्याची शक्तीही भारतीयांत उरली नाही.

विशाल भारतातील जावा, अंग्कोर वगैरे ठिकाणचे शोध आणि उत्खनने यांना युरोपियन पंडितांचे आणि प्राचीन वास्तुसंशोधकांचे प्रयत्न कारणीभूत झाले आहेत.  विशेषेकरून फ्रेंच आणि डच विद्वानांना याचे बरेचसे श्रेय आहे.  अद्याप कितीतरी मोठमोठी पुरे-पट्टण, मोठमोठे अवशेष शोधून उकरून काढायचे राहिले असतील आणि दु:खाची गोष्ट अशी की अवशेष असलेले मलायातील भाग खाणी खोदताना किंवा रसते बांधण्यासाठी साहित्य पाहिजे म्हणून नष्ट करण्यात आले आहेत; आणि महायुध्दाने या विनाशात आणखीच भर पडली असेल.

काही वर्षांपूर्वी शांतिनिकेतनमध्ये आलेल्या एक थाई (सयामी) विद्यार्थ्याने थायलंडमध्ये परत जाताना मला एक पत्र लिहिले होते.  त्या पत्रात तो लिहितो, ''या थोर प्राचीन आर्यावर्तात मला यायला सापडले हे माझे थोर भाग्य आहे. 
-----------------------
*  ' अंग्कोरकडे ' या डॉ. एच. जी. कारिच वेल्स (हॅरप, १९३३) या पुस्तकातून.

भारत म्हणजे आमची आईची आई आहे.  भारतमातेच्या प्रेमळ बाहुपाशात माझी मातृभूमी वाढली, लहानाची मोठी झाली.  संस्कृतीत आणि धर्मात जे जे उदात्त, सुंदर आहे त्या सर्वांवर प्रेम करायला माझ्या मायभूमीला भारतमातेनेच शिकविले.  अशा या भारतभूच्या चरणावर मला माझे शिर भक्तिपुरस्सर ठेवायला सापडले म्हणून मी खरोखर कृतार्थ झालो.''  हे पत्र मला विशेष वाटते म्हणून मी सांगतो असे नाही; परंतु आग्नेय आशियातील जनतेच्या मनात अस्पष्ट अशा परंतु कोणत्या भावना भारताविषयी आहेत याची काही कल्पना यावरून येते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel