देशातल्या देशात व परदेशांशी व्यापार चालविणारे व पैशाची देवघेव करणारे हे वर्ग व लोकातल्या इतर वर्गांमध्ये जातिजमातीचे जे स्पष्ट भेद होते ते या अनेक धंद्यांतून जेव्हा इतर वर्ग हळूहळू शिरले तेव्हा अस्पष्ट होऊ लागले. परंतु ते नाहीसे झाले नाहीत, अजूनही ते सहज लक्षात येतात. जुन्या वर्णव्यवस्थेमुळे, परंपरेच्या प्राबल्यामुळे, परंपरागत आलेल्या कौशल्यामुळे हे असे झाले किंवा तिन्ही कारणांचा मिळून हा परिणाम आहे ते नक्की सांगता येणार नाही. परंतु एवढे नक्की की ब्राह्मण व क्षत्रिय वर्गाला व्यापारउदीम व धंदा करणे कमीपणाचे वाटे आणि त्यातला होणारा धनसंचय जरी चांगला असला तरी त्यामुळे धंद्याचा गौणपणा कमी होत नसे. जुन्या सरंजामी काळातल्या समजुतीप्रमाणे या आधुनिकय काळातही जमीन जवळ असणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई. मात्र विद्वानाजवळ काही स्थावरजंगम मालकीची संपत्ती असो वा नसो त्याची विद्वत्ता व ज्ञान यांना मान दिला जात असे. परंतु ब्रिटिश राज्यात नोकरीला प्रतिष्ठा आली, नोकरीत योगक्षेमाची खात्री होती, मानसन्मान होता; आणि पुढे हिंदी सनदी नोकरीचे खाते जेव्हा इंग्रजीचे शिक्षण घेतलेल्या सुशिक्षितांना मोकळे झाले तेव्हा स्वर्गाचे दारच उघडले असे त्या वर्गाला वाटले. अर्थात हा स्वर्ग म्हणजे फारतर व्हाईट हॉलची (खास विलायतेतल्या सरकारची) फारतर अंधुकशी पडछाया होती. सुशिक्षित धंद्यात शिरलेल्या वर्गांना विशेषत: नव्या न्यायालयातून काम करून निदान काहींना तरी खूप पैसा मिळालेल्या वकील वर्गालाही लोकांत मान व प्रतिष्ठा मिळे. म्हणून या सुशिक्षित धंद्यात शिरण्याकडे तरुणांची ओढ होती. या वकील मंडळींनीच राजकीय व सामाजिक सुधारणांच्या चळवळीत पुढाकार घेतला, ते अपरिहार्यच होते.
वकिलीचा धंदा प्रथम उचलला तो बंगाली लोकांनीच व त्या धंद्यात त्यांच्यापैकी काहीजणांची त्यात चांगलीच भरभराट झाल्यामुळे त्या धंद्याची लोकांवर मोहिनी पडली. राजकारणात पुढारीही बंगालीच होते. मात्र त्यांना जात्या जमत नसल्यामुळे म्हणा किंवा दुसर्या काही कारणाने म्हणा, वाढत्या कारखानदारीच्या धंद्यात त्यांचा जम बसला नाही. त्यामुळे असे झाले आहे की, कारखानदार लोकांना जेव्हा राष्ट्रीय जीवनात महत्त्व आले व त्यांचा पगडा राजकारणावर बसू लागला तेव्हा राजकारणातील बंगालचे प्राधान्य कमी होऊ लागले. पूर्वी सुशिक्षित बंगाली सरकारी नोकरीचाकरीच्या वा अन्य निमित्ताने आपल्या प्रांतातून बाहेरच्या प्रांतात जात, तो प्रवाह बदलला व बाहेरचे लोक बंगालमध्ये विशेषत: कलकत्त्यात येऊ लागले आणि तेथील व्यापार व उद्योगधंदा हाती घेऊन बसले. ब्रिटिश भांडवल आणि तेथील व्यापार व उद्योगधंदे यांचे कलकत्ता हे पूर्वी मुख्य केंद्र होते व अजूनही ते तसे आहे. इंग्रज आणि स्कॉच व्यापार्यांचेच प्रभुत्व आहे. परंतु मारवाडी आणि गुजराथी आता त्यांची बरोबरी करू लागले आहेत. कलकत्त्यातील लहानसहान धंद्यांत पुष्कळसे बाहेरचे लोक आहेत. कलकत्त्यातील टॅक्सीवाले (उतारूकरता भाड्याच्या मोटारी चालविणारे) जवळजवळ एकूणएक पंजाबातले शीख आहेत.
मुंबई हे हिंदी उद्योगधंद्याचे, हिंदी मालकीच्या व्यापाराचे, विम्याचे, पेढींचे केंद्र बनले. त्याच्या सगळ्या खटपटीत पारशी, गुजराथी, मारवाडी हेच अग्रेसर होते. महाराष्ट्रीय म्हणजे मराठ्यांचा या खटपटीत अगदीच किरकोळ भाग आहे. हे विशेष सूचक आहे. मुंबई हे हल्ली प्रचंड शहर आहे. नाना जातिजमातींचे, नाना धर्मांचे, प्रांतांचे लोक त्यात आहेत. परंतु त्यात मुख्य भरणा गुजराथी व महाराष्ट्रीय लोकांचाच आहे. महाराष्ट्रीय लोकांनी विद्वत्तेत व डॉक्टरी, वकिली वगैरे सुशिक्षित धंद्यांत नाव मिळविले आहे. त्यांच्यात चांगले सैनिक लढवय्ये तयार होतात, हे साहजिकच आहे. मुंबईच्या गिरण्यांतूनही लाखो महाराष्ट्रीय कामगारच आहेत. महाराष्ट्रीय लोक काटक व चिवट असतात. महाराष्ट्र प्रांत गरीब आहे, दरिद्री आहे. शिवाजीच्या परंपरेचा आणि पूर्वजांच्या पराक्रमाचा व कर्तृत्वाचा त्यांना अभिमान आहे. गुजराथी लोक शरीराने मऊ मिशमिशीत, स्वभावाने जास्त सौम्य व पैशाने अधिक श्रीमंत आहेत, व व्यापाराचा त्यांना सहज सराव आहे. कदाचित भौगोलिक परिस्थितीमुळे हा असा फरक होत असावा, कारण महाराष्ट्र म्हणजे खडकाळ डोंगराळ, कडक मुलूख आहे व गुजराथ समृध्द, सुपीक आहे.