अलीकडच्या काही शतकांतील हिंदुस्थानच्या र्‍हासाला पडदा हे एक प्रमुख कारण आहे याविषयी मला तिळमात्र शंका नाही.  या रानटी चालीचे संपूर्णपणे उच्चाटन झाल्याशिवाय हिंदुस्थानात प्रगतिपर सामाजिक जीवन अशक्य आहे.  स्त्रियांना यामुळे अन्याय होतो, त्यांचे नुकसान होते, ही गोष्ट तर स्पष्टच आहे.  परंतु यात पुरुषांचेही नुकसान आहे आणि वाढत्या मुलांना पडद्यातील बायकांजवळ अधिक काळ राहावे लागते- हेही केवढे नुकसान.  हिंदी सामाजिक जीवनाची या दुष्ट रूढीमुळे अपार हानी होत आहे, हानी झाली आहे.  सुदैवाने हिंदूंमधून ही चाल झपाट्याने जात आहे, आणि मुसलमानांतही हळूहळू ती दूर होत आहे.

पडदा दूर करण्याचे बरेचसे श्रेय राष्ट्रीय सभेला आहे.  काँग्रेसने ज्या सामाजिक आणि राजकीय चळवळी केल्या त्यामुळे मध्यमवर्गातील हजारो स्त्रिया पुढे आल्या.  सार्वजनिक जीवनात नाना प्रकारांनी त्या भाग घेऊ लागल्या.  गांधीजी पडद्याचे कट्टे शत्रू आहेत.  स्त्रियांना मागासलेल्या, अविकसित स्थितीत ठेवणारना हा पडदा म्हणजे एक 'दुष्ट राक्षसी रूढी' आहे असे त्यांनी म्हटले आहे.  ते लिहितात, ''पडदा प्रथम आला तेव्हा त्याची काय उपयुक्तता असेल ती असो; परंतु आज पडदा अगदी निरुपयोगी आहे.  आणि देशाचे अपरिमित नुकसान त्यामुळे होत आहे.  या रानटी चालीला चिकटून राहिल्यामुळे हिंदी पुरुषवर्गाने हिंदी स्त्रियांवर केवढा अन्याय केला असे माझ्या मनात येई.''  पुरुषांइतकेच स्त्रियांना स्वातंत्र्य असावे; स्वत:च्या विकासाला त्यांना समान संधी असावी असा गांधीजींचा आग्रह आहे.  ते म्हणतात, ''स्त्री-पुरुषांच्या संबंधात कृत्रिम बंधने नसावीत.  विवेकाने, शहाणपणाने उभयतांनी वागावे.  एकमेकांजवळचे वागणे सहजसुंदर व मोकळे असावे.''  स्त्रियांना समानता असावी, स्वातंत्र्य असावे याविषयी त्यांची बाजू घेऊन गांधीजींनी उत्कटतेने लिहिले आहे आणि घरातील गुलामगिरीचा त्यांनी तीव्र निषेध केला आहे.

विषयांतर करून मी एकदम आजच्या काळात उडी मारली.  परंतु मला मध्ययुगात पुन्हा जायला हवे.  अफगाणांनी दिल्लीत सत्ता दृढ केली होती.  एक नवीन समन्वय जन्माला येत होता.  नव्याजुन्यांचे संमिश्रण होत होते.  परंतु हे फरक वरच्या सरदार-दरकदारांत, वरिष्ठ वर्गात होत होते.  बहुजनसमाज, ग्रामीण जनता होती तशीच होती.  फरक होत होते ते दरबारी वर्तुळात होत होते; शहरांतून, मोठमोठ्या गावांतून ते मग पसरत.  कित्येक शतके हा प्रकार सुरू राहिला, आणि उत्तर हिंदुस्थानात एक संमिश्र संस्कृती निर्माण झाली.  प्राचीन आर्य संस्कृतीचे ज्याप्रमाणे दिल्ली, संयुक्तप्रांत यातच माहेरघर होते, आणि अद्यापिही आहे, त्याप्रमाणे या नवीन संमिश्र संस्कृतीचेही केंद्र दिल्ली, संयुक्तप्रांत येथेच होते.  परंतु जुनी आर्य संस्कृती पुष्कळशी दक्षिणेकडे गेली आणि सनातनी धर्माचा बालेकिल्ला दक्षिणेत झाला. 

तैमूरच्या आघाताने दिल्ली दुबळी झाल्यावर संयुक्तप्रांतात जौनपूर येथे एक लहानसे राज्य उदयाला आले होते.  कला, संस्कृती, धार्मिक सहिष्णुता यांचे पंधराव्या शतकात हे एक केंद्र होते.  बहुजनसमाजाची हिंदी भाषा वाढत होती, आणि तिला या नवीन राज्यात उत्तेजन मिळाले.  हिंदु आणि मुस्लिम धर्माचा समन्वय करण्याचाही प्रयत्न तेथे करण्यात आला.  याच सुमारास तिकडे दूर उत्तरेकडे काश्मिरात झैनुलब्दिन नावाचा एक स्वतंत्र मुस्लिम राजा राज्य करीत होता.  प्राचीन संस्कृती, संस्कृत भाषा यांना उत्तेजन देणारा आणि धर्माच्या बाबतीत सहिष्णुता दाखविणारा म्हणून त्याची कीर्ती सर्वत्र पसरली होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel