एकामागून एक, घटना सारख्या घडत असतात,  घटनांचा अव्याहत अनंत प्रवाह सारखा सतत वाहत चाललेला असतो.  एखादी विशिष्ट घटना समजून घेण्याचा प्रयत्न करताना आपण ती घटना इतर घटनांपासून वेगळी काढतो व तीच तेवढी पाहात बसतो, जणू काय तिचा आदी आणि अंत तिच्यातच सामावलेला आहे, ती तत्पूर्वीच्या निकटच्या कारणाचा परिणाम आहे.  पण, त्या घटनेला आरंभ नाही, ती घटना म्हणजे एका अनंत साखळीतला एक दुवा आहे.  त्या विशिष्ट घटनेपूर्वी जे काही घडून गेले ते सारे या घटनेचे कारण आहे.  असंख्य मानवी प्राण्यांच्या असंख्य इच्छा, अगणित प्रवृत्ती व वासना, यांच्या संयोग व विरोधातून निघालेला व कोणाही एका व्यक्तीने जे घडावे असा हेतू मनात धरला असेल त्यापेक्षा अगदीच भिन्न असलेला असा त्या सार्‍या कारणांचा परिणाम आहे तो ही घटना.  त्या असंख्य इच्छा, प्रवृत्ती व वासना ह्या त्यांच्या पूर्वीच्या घटना व अनुभव ह्यांचा परिणाम होऊनच अस्तित्वात आल्या व ही नवी विशिष्ट घटनासुध्दा भविष्यकाळातल्या घटनांचे एक परिणामकारक कारण स्वत:च होऊन बसते.  दैववान पुरुष, लक्षावधी लोकांवर छाप पडणारे नेते ह्यांना ह्या घटनापरंपरेत महत्त्वाचे स्थान आहे हे निश्चित आहे, पण ते स्वत:च त्यांच्यापूर्वी घडून गेलेल्या कारणपरंपरेचे, जगातल्या नानाविध शक्तींचे परिणामी कार्य म्हणून अस्तित्वात येतात आणि त्यांच्या महत्त्वालाही तीच कारणपरंपरा विशिष्ट वळण देते.

दोन पार्श्वभूमी : हिंदी व ब्रिटिश

हिंदुस्थानात सन १९४२ च्या ऑगस्ट महिन्यात जे काही घडले ते एकाएकी घडून आलेले नसून त्यापूर्वी जे जे घडले त्या सर्वांची व्हायची तीच पराकाष्ठा होती.  त्याबद्दल पुष्कळच लिहिले गेले आहे, काहींनी त्याच्यावर कडक टीका केली आहे, काहींनी गुणदोषविवेचन केले आहे, तर कोणी कोणी समर्थनही केले आहे, आणि जे काही घडले त्याबद्दल पुष्कळशी कारणमीमांसाही झाली आहे.  पण यांपैकी बहुतेक लेखांतून त्याचा खरा अर्थ बाजूला पडला आहे, कारण त्यात केवळ राजकारणाच्या दृष्टीने हेतूंची चर्चा आली आहे, पण वस्तुत: ते राजकारणाच्या क्षेत्रापेक्षा अधिक खोल क्षेत्रातले होते.  जे काही घडले त्याच्यापाठीमागे, परकीय एकतंत्री सत्तेच्या राज्यात यापुढे आपला निभाव लागणार नाही, आपण यापुढे असेचे जगणे शक्य नाही अशी एक अत्यंत तीव्र भावना होती.  या राज्यात राहूनही काही सुधारणा होणे किंवा काही दिशेने प्रगती करणे शक्य आहे की नाही, सरकारला उघड आव्हान दिले तर त्याचे परिणाम अधिक वाईट होतील की काय, असले बाकीचे सारे प्रश्न किरकोळ वाटून बाजूला पडले.  ही परकीय सत्ता झुगारून टाकावी, त्याकरिता पडेल ते मोल द्यावे एवढी एकच प्रचंड इच्छा सारे मन व्यापून उरली होती, काहीही होवो यापुढे ही सत्ता सहन करणे शक्य नाही एवढी एकच 'भावना' मनाला राहिली होती.

ही भावना म्हणजे काही नवी जाणीव नव्हती, ती कैक वर्षे होतच आलेली होती, पण तिला अनेक प्रकारची बंधने घातलेली होती व जशा घटना घडत जातील त्या मानाने आपली गती ठेवण्याची शिस्तही तिला लागली होती.  हे महायुध्द आले त्यामुळे तिला काही अंशी बंधन पडले, परंतु काही अंशी तिची गतीही वाढली.  या युध्दामुळे आमची दृष्टी विशाल होऊन पुढचे मोठमोठे परिणाम, क्रांतिकारक घडामोडी आम्हाला दिसू लागल्या, आमच्या आकांक्षा लवकरच सफल होणे शक्य आहे असे आम्हाला वाटू लागले.  परंतु हे युध्द चालू नसते तर आम्ही जे काय करायला प्रवृत्त झालो असतो त्यांपैकी बर्‍याच विचारांना पायबंदही बसला, कारण अक्षराष्ट्रांविरुध्द चाललेल्या या युध्दात त्यांचा पराजय करण्याला मदत करावी अशी आमची इच्छा होती, आम्हाला या युध्दकार्यरत सरकारला कोणत्याही प्रकारे अडथळा आणण्याची इच्छा नव्हती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel