हा नवराष्ट्रवाद उदयाला आला तरीही भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञान सहिष्णू होती, उदार होती. देशात जे नाना पंथ, नाना धर्म होते, जे विदेशी लोक होते, त्यांच्याविषयी अनुदारपणा नव्हता; आपल्या विशाल व खोल संघटनेत त्यांना समाविष्ट करून घेण्याचेही काम चालू होते. परंतु हळूहळू आक्रमकांविरूध्द ते चढाईचे धोरण दाखवू लागले; विदेशीयांच्या हल्ल्यापासून स्वत:चे रक्षण करण्याचा खटाटोप करू लागले. असे करीत असता, ज्या राष्ट्रीयतेला त्यांनी जागविले होते, ती राष्ट्रीयता कधी कधी साम्राज्यवादाचे स्वरूप घेई. राष्ट्रीयता वाढत चालली की ती बहुधा साम्राज्यवादी होतेच. गुप्तकाल हा अती भरभराटीचा काळ होता. सुधारणा कळसास पोचली होती. सर्वत्र उदारता, सुसंस्कृतता होती. सर्वत्र चैतन्य आणि सामर्थ्य भरले होते. त्यामुळे गुप्त राजवटीत ही साम्राज्यवादी वृत्ती झपाट्याने आली. ह्या गुप्त घराण्यातील एका मोठ्या सम्राटाला-समुद्रगुप्ताला तर हिंदी नेपोलियन असे म्हणतात. गुप्तकाल कला आणि साहित्य यांचा उज्ज्वल काळ होता.
इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या आरंभापासून जवळजवळ दीडशे वर्षे गुप्त राजांचे उत्तर हिंदुस्थानवर स्वामित्व होते. राज्य प्रबल आणि भरभराटलेले होते, पुढे आणखी दीडशे वर्षे त्यांच्या वंशजांचे राज्य चालले. परंतु हे मागूनचे राजे चढाई करणारे नसून त्यांचे धोरण नुसत्या बचावाचे होते; आणि दिवसेंदिवस हे साम्राज्य संकोच पावता पावता शेवटी तर अगदी लहान राज्य उरले. मध्यआशियातून नवीन आक्रमकांचे लोंढे येतच होते व गुप्त राजांवर त्यांचे हल्ले सुरू असत. या नव्या आक्रमकांना श्वेत हूण असे नाव आहे. त्यांनी हिंदुस्थान उद्ध्वस्त केला, तसेच युरोपातही अटिलाच्या नेतृत्वाखाली त्यांनी उच्छाद मांडला. त्यांचे पशुतुल्य वर्तन व राक्षसी क्रौर्य यामुळे अखेर सर्व जनतेला त्वेष चढला व अखेर हिंदुस्थानातील सारे सामंत यशावर्मन् राजाच्या पुढारीपणाखाली एकवटून, त्यांनी हूणांवर एकजुटीचा हल्ला चढविला. हूणांची सत्ता भंगली, त्यांचा नेता मिहिरगुप्त युध्दकैदी झाला, परंतु गुप्त राजा बालादित्य याने भारतीयांच्या परंपरेनुसार मिहिरगुप्ताला औदार्याने वागविले आणि हिंदुस्थानातून निघून जाण्याला परवानगी दिली. या उपकाराची परतफेड मिहिरगुप्ताने पुन्हा परतून आपल्या उपकारकर्त्यावर कपटी हल्ला करून केली.
परंतु उत्तर हिंदुस्थानातील ही हूण सत्ता अगदी थोडा काळ, जेमतेम पन्नास वर्षे टिकली. त्यांच्यापैकी पुष्कळ हिंदुस्थानातच राहिले. ठायीठायी ते पाळेगार, छोटे छोटे नाईक म्हणून राहून सदैव त्रास देत होते, परंतु हळूहळू ते भारतीय जनतेच्या अफाट समुद्रात गडप होत होते. या हूण नायकांपैकी काही पुढे सातव्या शतकात गडबड करू लागले, परंतु कनोजचा राजा हर्षवर्धन याने त्यांचा नक्षा उतरून, फडशा पाडला. हर्षाने नंतर सर्व मध्य व उत्तर हिंदुस्थानभवर आपले साम्राज्य स्थापिले. तो उत्कट बौध्दधर्मी होता. परंतु त्याचा महायान पंथ होता, आणि पंथाचे हिंदुधर्माशी पुष्कळच साम्य असे. बौध्दधर्म आणि हिंदुधर्म या दोन्ही धर्मांना त्याचे पाठबळ होते. याच्याच कारकीर्दीत सुप्रसिध्द चिनी प्रवासी-यात्रेकरी ह्युऑनत्स्यंग (किंवा युआनच्वँग) हा इ.स. ६२९ मध्ये हिंदुस्थानात आला. हर्षवर्धन स्वत: कवी व नाटककार होता आणि त्याच्या दरबारात अनेक कवी आणि कलावान होते. त्यामुळे त्याची राजधानी ही सांस्कृतिक चळवळींचे विख्यात केंद्र बनली. हर्ष इ.स. ६४८ मध्ये मरण पावला, त्याच सुमारास इस्लामी धर्म अरबस्थानच्या वाळवंटातून विजयी वृत्तीने आफ्रिका व आशिया खंडात झपाट्याने पसरण्यासाठी बाहेर पडत होता.
दक्षिण भारत
मौर्यांच्या साम्राज्याचा र्हास आणि अस्त यांच्या काळानंतर जवळजवळ एक हजार वर्षांच्या अवधीत दक्षिणेकडे मोठमोठी राज्ये भरभराटीला आली. शकांचा पराजय करणारे आंध्र हे कुशानांचे समकालीन होते; नंतर पश्चिमेकडे चालुक्य साम्राज्य आले; आणि मग राष्ट्रकूट पुढे सरसावले. तिकडे खाली दक्षिणेकडे पल्लव राजे होते. हिंदुस्थानातून वसाहतीसाठी जे समुद्रपर्यटन झाले, ते त्यांच्याच विशेष प्रयत्नामुळे झाले. नंतर चोल साम्राज्य आले, ते दक्षिणभर जवळजवळ पसरले होते. सीलोन आणि दक्षिण ब्रह्मदेशही चोलांनी जिंकला होता. शेवटचा मोठा चोल राजा राजेंद्र हा इ.स. १०४४ मध्ये मेला.