सिंधू खोर्‍यातील संस्कृती व नंतरचा काळ यांच्यात परंपरासातत्य असल्याचे जरी नक्की वाटते, तरी एक प्रकारचा खंड मध्ये पडल्यासारखा वाटतो हेही खरे.  कालगणनेच्या दृष्टीनेच नव्हे तर नंतर आलेल्या संस्कृतीवरूनही असे वाटते.  पुढे जी संस्कृती आपणांस आढळते ती अधिक कृषिप्रधान अशी दिसते, तिचा आरंभ तरी तसा आहे.  याही संस्कृतीत ग्रामे, नगरे आहेत; थोड्याफार अंशी नागरिक जीवनही आढळते.  परंतु कृषिप्रधानता हेच तिचे वैशिष्ट्य दिसते.  कदाचित नवीन येणार्‍या आर्यांनी त्या प्राचीन नागर संस्कृतीला हे कृषिप्रधान स्वरूप दिले असावे.  हे आर्य वायव्येकडून लाटांवर लाटा याव्यात त्याप्रमाणे भारतात पुराच्या लोंढ्यासारखे आले.

सिंधु-नदीच्या खोर्‍यातील संस्कृतीनंतर सुमारे हजार वर्षांनी हे आर्य हिंदुस्थानात आले असावेत असा तर्क आहे.  परंतु हजार वर्षांचा कालखंड मध्ये गेलाच असेल असे नाही.  ते लोक टोळ्याटोळ्या करून मधूनमधून सारखे येतच असावेत.  पुढील काळात ज्याप्रमाणे दिसते तसे त्या काळातही झाले असेल आणि आलेले लोक जसजेस येत तसतसे मूळच्या लोकांत मिसळून हिंदुस्थानचे होत असतील.  पहिला मोठा सांस्कृतिक समन्वयाचा प्रयोग म्हणजे आर्य आणि द्राविडी यांचा होय.  द्राविडी लोक व त्यांची संस्कृती सिंधू संस्कृतीचे प्रतिनिधी असावेत असा संभव आहे.  या समन्वयातून व एकीकरणातून हिंदी जातिजमाती व मूलभूत हिंदी संस्कृती उत्पन्न झाली.  आर्य व द्रविड या दोन्हींचा विशिष्ट ठसा या समन्वयभूत नव्या संस्कृतीवर उमटलेला आहे.  पुढल्या शेकडो वर्षांत आणखी जातिजमाती, आणखी निरनिराळे मानववंश आले.  इराणी, ग्रीक, पार्थियन, बॅक्ट्रियन, सिथियन, हूण, इस्लामपूर्व तुर्की, आरंभीचे ख्रिश्चन, ज्यू, झरथुष्ट्री कितीतरी प्रकार आले, त्यांचा थोडाफार परिणाम होऊन हिंदी संस्कृतीत काही फरक होत गेला, पण अखेर ते स्वत: हिंदीच बनले.  डॉडवेल लिहितो, ''हिंदुस्थानची संग्राहक शक्ती सागराप्रमाणे अनंत होती.  हिंदुस्थानातली जातिसंस्था व रोटीबेटी बंदी लक्षात घेतली म्हणजे त्याच हिंदुस्थानची परकीय लोक व त्यांची संस्कृती पचवून आत्मसात करण्याची ही अपूर्व संग्राहक शक्ती पाहून नवल वाटते.  ह्या संग्राहक वृत्तीमुळे हिंदुस्थानने आपल्या जीवनशक्तीतला जोमदारपणा कायम राखून वेळोवेळी कायाकल्प केला असावा.  पुढे मुसलमान आले.  त्यांच्यावरही या संग्राहक वृत्तीचा परिणाम झाल्यावाचून राहिला नाही.''  व्हिन्सेंट स्थिम म्हणतो, ''परकी विशेषत: मुस्लिम तुर्क लोक पूर्वी आलेल्या शक व युए-चि लोकांप्रमाणे हिंदुधर्मांतील आश्चर्यकारक संग्राहकवृत्तीपुढे अलग राहू शकले नाहीत, झपाट्याने त्यांना हिंदू वळण लागले.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel