अरब संस्कृतीचा बहर व भारताशी संबंध

आशियातील मोठमोठे प्रदेश, आफ्रिका आणि युरोपातलाही लहानसा एक तुकडा भराभरा जिंकून अरबांनी दुसर्‍या क्षेत्रातील विजयाकडे आपली मने वळविली.  साम्राज्याची घडी बसविली जात होती, कितीतरी नवनी नवीन देश त्यांच्या कक्षेत आले होते; या जगाचे आणि त्याच्या प्रकारांचे स्वरूप समजून घ्यायला ते उत्सुक होते.  आठव्या व नवव्या शतकांतील अरबांनी बौध्दिक जिज्ञसा, चिकित्सक वृत्ती, नाना विचारक्षेत्रांत साहसाने पुढे जाण्याची स्फूर्ती आश्चर्यकारक होती.

साधारणपणे ठराविक कल्पना व सिध्दान्त यांवर जो नवीन धर्म उभारलेला असतो, त्याच्या आरंभी तरी त्यावरची श्रध्दा अतिप्रखर असते.  त्या सिध्दान्तात वा कल्पनांत थोडाफारही फरक केला तर त्या नवधर्मीयांस सहन होत नाही.  अरब त्या श्रध्देच्याच जोरावर दूरवर पूर्वपश्चिमेकडे पसरले व त्या अपूर्व विजयामुळे ती श्रध्दा अधिकच खोल व दृढ अशी झाली असली पाहिजे.  असे असूनही कडवी धार्मिक श्रध्दा व धर्मसूत्रे ओलांडून पलीकडे जाण्याची त्यांची वृत्ती दिसून येते; अज्ञेयवादात ते अधूनमधून बुड्या मारीत असताना स्वत:ची सारी शक्ती व उत्साह बौध्दिक साहसाकडे वळविताना आढळतात.  जगातील मोठमोठ्या मुशाफरांत अरब मुशाफरांची गणना आहे. दुसर्‍या देशातील लोक काय करीत आहेत, कसे विचार करीत आहेत ते पाहण्यासाठी अरब प्रवासी दूरदूर गेले.  दुसर्‍या लोकांची ज्ञानविज्ञाने, धर्म, तत्त्वज्ञाने, जीवनाची तर्‍हा हे सारे समजावून घेऊन आपल्या विचारांचा विकास करण्यासाठी म्हणून हे प्रवासी सर्वत्र जात होते.  बगदाद शहरात पंडित आणि त्यांचे ग्रंथ यांना लांबलांबून आणण्यात आले.  आठव्या शतकाच्या मध्यभागी अल्मन्सूर हा सुप्रसिध्द खलिफा झाला.  त्याने संशोधन व भाषांतर करण्याची कचेरी उघडली.  ग्रीक, सीरियॅक, झेंद, लॅटिन, संस्कृत इत्यादी भाषांतील शेकडो ग्रंथांचे अरबी तर्जुमे करण्यात आले.  सीरिया, आशियामायनर आणि लेबॅनॉन येथील मठांमध्ये मुद्दाम धुंडाळून हस्तलिखिते सापडली ती गोळा करण्यात आली.  ख्रिश्चन बिशपांनी अलेक्झांड्रिया येथील जुन्या शाळा-महाशाळा बंद केल्या होत्या.  तेथील विद्यार्थ्यांना, शिक्षकांना त्यांनी हाकलून दिले होते.  त्यांपैकी पुष्कळसे हिंडतफिरत इराणात वगैरे आले.  त्यांना बगदादमध्ये संरक्षण आणि आधार मिळाला.  त्यांनी आपल्याबरोबर ग्रीक तत्त्वज्ञान, गणित आणि विज्ञान आणली होती.  प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल, टॉलेमी, युक्लिड इत्यादी ज्ञानर्षींचे थोर थोर ग्रंथ आले.  बगदाद येथे नेस्तोरियनपंथी ख्रिस्ती विद्वान, ज्यू पंडित, हिंदी आयुर्वेदाविशारद, तत्त्वज्ञानी व गणिती हे होतेच.  या सर्वांचे एक मोठे संमेलनच तेथे सुरू झाले.

पुढे हरून-अल्-रशीद आणि अल्-मामून हे विख्यात खलिफा झाले; त्यांच्याही कारकीर्दीत ही ज्ञानविज्ञान संमेलन-प्रथा सुरूच राहिली, व अशा प्रकारे तत्कालीन संस्कृत जगातील बगदाद हे सर्वांत मोठे बौध्दिक केंद्र बनले.

या काळात हिंदुस्थानशी अरबांचे पुष्कळ संबंध आले.  भारतीय गणित, वैद्यक, ज्योतिष यांतील बरेचसे ज्ञान अरबांनी आपलेसे केले. ह्यासंबंधी अरबांनीच पुढाकार घेतला होता.  भारतीय लोक अरबांपासून काही शिकले नाहीत, अरबांनी मात्र त्यांच्याकडून पुष्कळ मिळविले.

भारतीय विद्वान अहंकारात गुरफटून अलग राहिले; स्वत:च्या घरात बसून राहिले, आपले कवच सोडून ते बाहेर आले नाहीत, ही मोठी दुर्दैवाची व दु:खाची गोष्ट होती.  भारतीयही नवीन पाहण्याच्या, शिकण्याच्या दृष्टीने जाते तर बगदादमधील त्या वेळची प्रचंड बौध्दिक चळवळ पाहून; तेही संस्फूर्त झाले असते.  त्या वेळेस भारतीय बुध्दीची स्फूर्ती व प्रेरणा मरणपंथाला लागत होती.  अशा वेळेस बगदादला जाण्याने नवे चैतन्य आले असते.  अधिक प्राचीन भारतीय मनोबुध्दीला बगदादच्या वैचारिक व बौध्दिक जिज्ञासेच्या व संशोधनाच्या वातावरणात अधिक आपलेपणा वाटला असता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel