''युध्द करताना सैन्याच्या शारीरिक शक्तीच्या तिप्पट नैतिक आत्मविश्वासाचे बळ आहे'' असे नेपोलियननेच म्हटले आहे ना ?  ह्या जगातल्या नागावलेल्या व परदास्यात सापडलेल्या कोट्यवधी लोकांची, हे युध्द आपल्या स्वातंत्र्याकरिता चालले आहे अशी भावना होऊन तशी त्यांना खात्री पटली तर, नुसतेच ह्या युध्दापुरते संकुचित दृष्टीने पाहिले तरी, ह्या कोट्यवधी लोकांकडून मिळणारे नैतिक पाठबळ अत्यंत महत्त्वाचे आहे, व युध्दानंतरच्या काळात सर्वत्र शांतता नांदविण्याच्या कामात तर त्याचे महत्त्व त्याहूनही अधिक आहे.  नुसते हल्लीच्या पुरतेच पाहावयाचे असले तरी, या युध्दात जयापजयाची निश्चिती नाही असा प्रसंग आला आहे म्हणूनच साम्राज्यशाही राष्ट्रांचे धोरण व त्यांची मते बदलणे अवश्य आहे.  मनातला राग मनातच ठेवून निरुपाय म्हणून स्वस्थ बसलेल्या व आपल्या भवितव्याबद्दल साशंक असलेल्या या कोट्यवधी लोकांचे मन पालटवून त्यांचे रूपांतर सक्रिय सहानुभूती उत्साहाने दाखविणार्‍या मित्रांत करणे अवश्य आहे.  हा चमत्कार घडून आला तर त्यापुढे जर्मनी, जपान या अक्षराष्ट्रांच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या सेनांचा काही पाड लागणार नाही, व त्यांचा सपशेल पराभव निश्चित होईल.  सार्‍या जगभर उसळून उठलेल्या ह्या विराट भावनेचा परिणाम स्वत: अक्षराष्ट्रांच्याच राज्यातील अनेक मांडलिक देशांवर झाल्यावाचून राहणार नाही.

हिंदुस्थानात लोकांची वृत्ती राग आला तरी तो गिळून मुकाट्याने निष्क्रिय राहण्याची आहे, ती बदलून अन्याय झाला तर तो मुकाट्याने सहन न करता त्याचा प्रतिकार करण्याची तेजस्वी वृत्ती त्यांच्यात आणणे अधिक श्रेयस्कर आहे.  ब्रिटिश अधिकार्‍यांनी काढलेल्या अन्यायी हुकूमापुरतीच ही वृत्ती आरंभाला आली तरी तीच वृत्ती वाढवून तिचा उपयोग परचक्राचा प्रतिकार करण्याकडे करता येण्यासारखा होता.  अन्याची हुकूमापुढे मान तुकवून लाचारीने ते पाळण्याची वृत्ती एकदा अंगी बाणली की, पुढे मग कोणीही काहीही हुकूम सोडले तरी त्यांच्या बाबतही तीच वृत्ती राहणार, अधिकार्‍यांच्या बाबतीत जे झालो ते परचक्राच्या बाबतीतही होणार व त्यामुळे पुढे मानहानी व शेवटी अध:पात होणार.

गांधीजींचे हे सारे युक्तिवाद आम्हाला चांगलेच माहीत होते, आम्हाला ते कधीपासूनचे पटलेले होते व आम्ही स्वत:ही चर्चेत ते उपयोगात कितीदातरी आणले होते. परंतु खेदाची गोष्ट अशी की, कोट्यवधी परतंत्र प्रजेच्या वृत्तीत हा जो चमत्कार घडवून आणता येण्यासारखा होता तो ब्रिटिश सरकारने आडवे पडून घडू दिला नाही, हा हिंदुस्थानचा प्रश्न निदान युध्दापुरता तरी तात्पुरता सुटावा म्हणून आम्ही जे प्रयत्न चालविले होते ते निष्फळ ठरले, या युध्दाचा अंतिम उद्देश काय आहे ते तरी स्पष्टपणे बोला, तशी घोषणा करा अशी आम्ही वारंवार विनंती करून पाहिली पण त्यालाही नकारच मिळाला.  पुन्हा असला काहीही प्रयत्न आम्ही केला तर तोही निष्फळ ठरणार हे निश्चित दिसत होते.  आता पुढे काय करावे ? सरकारशी भांडण्याकरिता आम्ही आंदोलन सुरू केले तर न्यायाच्या व इतर दृष्टीने ते कितीही समर्थनीय असले तरी हिंदुस्थानवर परकीयांची स्वारी होण्याचा धोका अगदी दारापर्यंत येऊन पोचला अशा वेळी हिंदुस्थानात जी युध्दाची तयारी चालली होती, तिच्यात त्या आंदोलनाने व्यत्यय येण्याचा फार संभव होता.  तो व्यत्यय विसरून चालता येण्याजोगे नव्हते. आणि त्यातल्या त्यात विशेष विचित्र ते असे की, ह्या परचक्राच्या धोक्यामुळेच आमच्या मनात हे उलटसुलट विचार येऊन आमचे मन व्दिधा व्हावे.  कारण या अशा धोक्यापुढे आम्ही नुसते तटस्था प्रेक्षक म्हणून उभे राहणे शक्य नव्हते.  ह्या धोक्याच्या प्रसंगी देशातील जनतेकडून शत्रूचा प्रतिकार करविण्याच्या जबाबदारीचे ओझे वाहण्याची कुवत नसलेल्या व आमच्या मते नालायक ठरलेल्या कारभारी लोकांच्या हातून आमच्या देशाच्या कारभाराचा विचका होऊन देशाचा सर्वनाश होण्याचा प्रसंग आलेला असताना आम्ही स्वस्थ बसणे शक्य नव्हते.  मनातल्या मनात कोंडून चाललेली आमची सारी तगमग, उचंबळून आलेली आमची सारी उत्साहशक्ती, आमच्या हातून काहीतरी प्रत्यक्ष कार्य करविण्याकरिता वाट शोधू लागली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel