येणेप्रमाणे हिंदुस्थानात मोठ्या प्रमाणावर उद्योग-धंद्यांच्या कारखान्यांचा प्रसार व्हावा असा पुरस्कार काँग्रेस सतत करीत आली आहे व त्याच्या बरोबरीने छोट्या धंद्यांची खेडेगावांतून वाढ व्हावी ह्यावरही काँग्रेसचा भर असून त्याकरता काँग्रेसने प्रत्यक्ष कार्यही चालविले आहे.  ह्या दोन धोरणांत विरोधच येतो काय ?  मला असे वाटते की, जास्त भर कशावर, एवढाच काय तो मनभेद या धोरणात आहे.  या दोन्ही प्रकारच्या उद्योगधंद्यांतून माणसांचा व अर्थव्यवस्थेचा जो संबंध येतो त्यातील अनेक कारणांची, अनेक प्रश्नांची पूर्वी जी जाणीव आलेली नव्हती ती आता आलेली आहे.  मोठ्या प्रमाणावर कारखान्यांचा धंदा चाविणारे या देशातले कारखानदार व त्यांचा पक्ष उचलून धरणारे राजकीय पुढारी यांचे विचार एकोणिसाव्या शतकात युरोप खंडात भांडवलशाही पध्दतीच्या कारखानदारीची जी वाढ झाली त्या हिशोबाने, त्या दृष्टिकोणातून चालत.  त्यानंतर विसाव्या शतकात त्या पध्दतीचे जे दुष्परिणाम उघड दिसू लागले तिकडे त्यांचे दुर्लक्ष झाले.  हिंदुस्थानात परिस्थिती अशी होती की, या कारखानदारीची साहजिक यथाप्रमाण वाढ व्हावयाची तिला शंभर वर्षे प्रतिबंध पडलेला होता व त्यामुळे या पध्दतीचे दुष्परिणाम अधिकच विस्तृत होण्याचा संभव होता.  हिंदुस्थानात त्या वेळी प्रचलित असलेल्या आर्थिक पध्दतीच्या अनुरोधाने जो मध्यम दर्जाचे कारखाने काढण्याचा उपक्रम झाला त्यामुळे लोकांना जास्त काम मिळायच्या ऐवजी बेकारी मात्र जास्त वाढली.  एका टोकाला भांडवल अधिकाधिक जमू लागले, तर दुसर्‍या टोकाला दारिद्र्य व बेकारी वाढत चालली- पध्दत वेगळी असती आणि प्रचंड प्रमाणावर कारखाने काढून त्यांत अधिकाधिक लोकांची कामाची सोय लावण्यावर भर दिला गेला असता, आणि हे सारे वाढवताना योजना ठरवून वाढवत गेले असते, तर हा प्रकार टाळणे कठीण गेले नसते.

सामान्य जनतेचे दारिद्र्य सरसकट मोठ्या प्रमाणावर पाहिले तर वाढते आहे या गोष्टीचा गांधींच्या मनावर फार परिणाम झाला.  मानवी जीवन कसे असावे याबद्दल सर्वसाधारण कल्पना घेतली तर गांधींची कल्पना व जिला आधुनिक कल्पना म्हणता येईल ती कल्पना यात मुळातच फार मोठा भेद आहे हे खरे, असे मला वाटते.  आध्यात्मिक व नैतिक मूल्ये खर्ची घालून, कमी करून त्यांच्या ऐवजी सतत वाढत जाणारे राहणीचे मान व फैलावत जाणारा ऐषाराम यांचे त्यांना कौतुक नाही.  त्यांच्या मते माणसाला कष्टाचे जीवन हीच सरळ वाट आहे, सुखाला अंग दिले, चैनीची चट लागली, की वाट वाकडी होते व नीतीचा मार्ग सुटतो, अंतरतो.  गांधींना सगळ्यात मोठा धक्का बसतो तो जीवनाचे मार्ग व किकासाची संधी याबाबतीत गरीब व श्रीमंत यांच्या दरम्यान पसरलेली प्रचंड दरी पाहून.  त्यांच्या स्वत:च्या वैयक्तिक व मानसिक समाधानाकरता त्यांनी ही दरी ओलांडून ते गरिबांच्याकडे गेले आहेत, त्यांनी त्या गरिबांना परवडते तसली, किंवा थोडीफार बरी बसली तरी त्या गरिबांना झेपेल तशी राहणी, त्यांच्या वेषाची वस्त्रे किंवा खरे म्हणजे वस्त्रांचा अभाव पत्करला आहे.  एका टोकाला संख्येने अगदी थोडे असे श्रीमंत व दुसर्‍या टोकाला असंख्य, दारिद्र्याने गांजलेली सामान्य जनता, यांच्यामध्ये हे जे अफार अंतर पडले त्याला गांधींच्या मते दोन मुख्य कारणे होती : परकीय सत्ता व तिची सहचरी असलेली, लोकांवर अन्याय करून स्वत:ची लयलूट करण्याची वृत्ती, हे एक कारण व दुसरे विशाल यंत्राच्या रूपाने प्रगट झालेली भांडवलशाहीवर व यांत्रिक धंद्यावर आरूढ झालेली पाश्चात्य संस्कृती.  या दोन्हींनाही त्यांनी विरोध चालविला.  जुन्या काळातल्या स्वायत्त व बहुतेक स्वयंपूर्ण अशा ग्रामसंस्थांची सृष्टी, जेथे जीननोपयोगी पदार्थ निर्माण करणे, ते मिळण्याची व्यवस्था करणे व ते खाऊन-पिऊन, वापरून संपविणे या सार्‍या गोष्टींचे ताळतंत्र आपोआप संभाळले जाई.  जेथे राजकीय व आर्थिक सत्ता आजच्यासरखी काही मूठभर लोकांच्या हातात एकवटली न जाता गावातल्या सार्‍या लोकांच्या हातात थोडीथोडी प्रत्येकाकडे पसरलेली होती, जेथे अगदी साधीसुधी लोकशाही प्रचारात होती, जेथे गरीब व श्रीमंत यांच्यातला भेद इतका डोळ्यावर येण्यासारखा नव्हता, जेथे मोठ्या शहरांतल्या भानगडींची कटकट नव्हती, व पोटापाण्याची सोय लावणार्‍या धरणीमातेला बिलगून नांदत असलेल्या तिच्या लेकरांना मोकळ्या मैदानावरून वाहणार्‍या शुध्द हवेत भरपूर श्वासोच्छ्वास करायला मिळत होता, त्या जुन्या सृष्टीची गांधींनी खंत घेतली होती.

जीवनातला खरा अर्थ कोणता याविषयी हा सारा मतभेद मुळातच गांधी व इतर अनेक लोकांमध्ये होता व या मतभेदाचाच रंग गांधींच्या उक्तीतून, त्यांच्या कृतीतून भरलेला होता.  बहुधा तेजस्वी व ओजस्वी असलेल्या त्यांच्या वाणीला स्फूर्ति, प्राचीन धार्मिक व नैतिक ज्ञानभांडारातून मिळत होती, व हे भांडार मुख्यत: भारतीय असले तरी इतर देशांचेही त्यांनी सोडले नाही.  नैतिक मूल्येच प्रमाण मानली पाहिजेत, साध्य चांगले म्हणून त्याकरिता साधने मात्र वाटेल ती अयोग्य वापरणे मुळीच समर्थनीय नाही, या तत्त्वांना अंतर दिले तर व्यक्ती व वंश दोन्ही नाश पावतील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel