खेडोखेडी व शहरांतून अन्नधान्य समित्या व स्वसंरक्षक दले उभारून ती व्यवस्थित रीतीने चालविण्याचे कार्य त्यापूर्वी काही महिन्यांपासून, अधिकार्‍यांच्या विरोधाला न जुमानता आम्ही चालविले होते.  लोकांना अन्न कसे मिळेल याची आम्हाला विवंचना होतीच, त्यातच युध्दपरिस्थितीमुळे वाहतुकीची अडचण वाढून व आणखी इतर कारणे घडून आलेली परिस्थिती पाहता कोणत्या वेळी काय प्रसुंग येईल याचा नेम नाही अशी आम्हाला भीती वाटत होती.  सरकार याबाबत काहीच करीत नव्हते म्हटले तरी चालेल.  आपसात एकमेकांच्या गरजा भागवतील अशी जवळजवळची गावे निवडून त्यांचे स्वयंपूर्ण गट होतील अशी योजना करणे, व वाहतुकीच्या आधुनिक साधनांत खंड पडला तर जुनी बैलगाडीची वाहतूक, उपयोगाला यावी म्हणून त्या वाहतुकीला उत्तेजन देणे हे प्रयत्न आम्ही करून पाहात होतो.  पूर्वेकडून शत्रू देशात घुसला तर तिकडून पश्चिमेकडे चीनमध्ये झाले तसे, घरदार शेतीवाडीला मुकलेले, व आसरा शोधायला निघालेले असे थवेच्या थवे लोटतील, असाही दाट संभव होता.  ते आले म्हणजे त्यांच्याकरता काही व्यवस्था करून देण्याची आपली तयारी असावी, त्यांची काही सोय करून ठेवावी असा प्रयत्न आम्ही चालवला.  हे स्वयंपूर्ण गट निर्माण करणे, बैलगाड्यांची वाहूक वाढविणे, या शरणार्थी व निर्वासितांची काही सोय योजणे, हे सारे अवघडच नव्हे, तर सरकारच्या मदतीवाचून जवळजवळ अशक्य होते, पण आम्ही आमच्याकडून होईल तितकी खटपट करून पाहात होतो.  स्वसंरक्षक दले ठिकठिकाणी उभारण्याचा हेतू हा की, ह्या सार्‍या कार्यात त्यांचे साहाय्य मिळावे, धास्तीने गडबड उडून सारा गोंधळ व्हायचा तो होऊ नये म्हणून त्यांनी आपापल्या टापूत बंदोबस्त ठेवावा.  वैमानिक हल्ले येऊन कोठे बॉम्ब पडले किंवा तेथून दूरवरच्या जागी का असेना पण शत्रूचा हल्ला आला अशी हूल उठली की त्यामुळे सामान्य प्रजेची धांदल उडून पळापळ सुरू होणारच.  तशी धांदल व पळापळ थांबविणे अशक्य होते.  या बाबतीत सरकारची तजवीज अगदी तुटपुंज्या स्वरूपाची होती व सर्वसामान्य प्रजेला तिचा मुळीच भरवसा वाटत नव्हता.  देशातील ग्रामीण विभागातून दरवडे व लूटमार वाढत चालली होती.

आम्ही अशा या विशाल योजना ठरवल्या व त्या काही अंशी अमलातही आणल्या, पण देशापुढे जे भयंकर संकट उभे होते त्याच्या अंगावर आमच्याकडून फारकत जेमतेम ओरखडे काढले जाणेच शक्य दिसत होते.  देशाचा राज्यकारभार चालविणारे सरकारी अधिकारी वगैरे सरकारी साधने व सामान्य प्रजा यांनी मोकळ्या मनाने सहकार्य चालवल्याखेरीज ह्या संकटावर तोड निघण्यासारखी नव्हती, आणि ते सहकार्य तर शक्यच नाही असे ठरून गेले होते.

अगदी हताश व्हायची पाळी आली होती, कारण देशावर असा बिकट प्रसंग आला म्हणून त्या संकटाशी झगडण्याकरिता आम्हाला उत्साहाच्या उकळ्या फुटत होत्या, पण खरोखर प्रत्यक्षात काही करू म्हटले तर आमचे हातपाय बांधले होते, ते सोडण्याचे सरकारने नाकारले होते.  भीषण उत्पात आणि सर्वनाश होण्याचे संकट आमच्या देशाकडे लांब लांब ढांगा टाकीत झपाट्याने येत होते, आणि चाललेल्या ह्या सार्‍या प्रकाराने मन विटून संताप चढलेला, पण असाहाय्य व अगतिक होऊन स्तब्ध बसलेला, आमचा हा हिंदुस्थान.  दोन तिर्‍हाइतांच्या झुंजीत त्यांची रणभूमी होऊन तडविला जाणार असे दिसत होते.

व्यक्तिश: मला स्वत:ला युध्द म्हटले की त्याबद्दल अत्यंत अप्रीती असे, युध्दाचा तिटकारा येई. पण जपानची हिंदुस्थानवर स्वारी येणार असा संभव दिसू लागला तेव्हा मला त्या स्वारीने मोठे भय वाटू लागले असे नाही. युध्द म्हटले की त्याचे स्वरूप अक्राळविक्राळ असणारच, पण हिंदुस्थानवर युध्दाचा प्रसंग येणार या कल्पनेचे एक प्रकारे माझ्या मनाला आतल्या आत कोठेतरी काही आकर्षणही वाटे, कारण या देशातील कोट्यवधी लोकांपैकी प्रत्येकाला हा युध्दाचा हादरा बसावा, हा वैयक्तिक अनुभव यावा अशी मला फार इच्छा होती.  ब्रिटनने आम्हा कोट्यवधी लोकांवर सक्तीने सरण रचून देशभर जी स्मशान शांतता आणली होती ती तरी त्यामुळे मोडेल, हा हादरा सार्‍यांना बसून ही चिता ढासळून सारे बाहेर पडू रती, असे मला वाटे.  असा काही एक प्रसंग या कोट्यवधी लोकांवर ओढवावा, की ज्यामुळे त्यांना आजचे प्रत्यक्षातले वर्तमान उघड्या डोळ्यांनी पाहून त्याला तोंड देणे भाग पडेल; त्यांना कवटाळून बसलेल्या भूतकाळाची मिठी तोडून टाकून जोराने वाढीस लागणे, स्वत:ची काही सुधारणा करणे त्यांना भाग पडेल, क्षुल्लक राजकीय कारणावरून आपसात तंटे करण्यात व तात्पुरत्या आडचणीच्या राईचा डोंगर करण्यात गुंगलेल्या त्यांच्या बुध्दीला काही शहाणपणा  सुचून ते तंटे मोडणे, त्या अडचणी तुडवून त्यांच्या पलीकडे जाणे भाग पडेल. भूतकाळाशी असलेले आपले संबंध तोडू नयेत पण भूतकाळातलेच जीवन आज जगू नये, वर्तमान जगाची जाणीव ठेवावी व भविष्यावर दृष्टी पोचवून त्याचीही काही खबरदारी बाळगावी... जीवनाची गती बदलून त्या गतीचा वर्तमानकाळाशी, भविष्यकाळाशी मेळ घालावा.  या युध्दाचे मोल मोठे जवर द्यावे लागत होते व त्याची अखेर काय होईल ते सारे अनिश्चित होते.  युध्द आले ते काही आमच्या बोलावण्यावरून आलेले नव्हते, पण ते एवीतेवी आमच्यापर्यंत पोचणार तर आमच्या राष्ट्रीय जीवनाचे पाते चिवट व बळकट करायला तरी त्या युध्दाचा उपयोग करून घोता येण्याजोगा हाता, त्या युध्दामुळे संधी मिळून प्राणावर प्रसंग येण्यासारखे महत्त्वाचे अनुभव येऊन त्या अनुभवातून नवजीवनाची पालवी जोमाने फुटू लागेल असाही संभव होता.  अनेकांचे दशसहस्त्रावारी अनेकांचे मरण ओढवेल, ते टाळणे शक्य नव्हते, पण मरण येणारच असेल तर ते युध्दात आलेले बरे, उपासमारीने नको; आशाशून्य, कष्टमय जीवन जगण्यापेक्षा मेलेले बरे.  मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही, पुनर्जन्माची वाट फक्त चितेतूनच जाते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel