परंतु या सुवर्णकालाची समाप्ती होण्याच्या आधीच भारतीय जीवनातील र्हासाची आणि दौर्बल्याची लक्षणे दिसू लागली होती. वायव्येकडून श्वेत हूणांचे पुन:पुन्हा हल्ले येत होते; त्यांचा सारखा मोड करण्यात येत होता. परंतु त्यांच्या लाटा थांबत नव्हत्या, हळूहळू उत्तर हिंदुस्थान कुरतडीत ते येतच होते. जवळ जवळ पन्नास वर्षे उत्तरेचे ते अधिराजेही होते. परंतु मध्यभारतातील राजा यशोवर्मा आणि गुप्त घराण्यातील शेवटचा मोठा राजा व इतरही राजे यांनी एक होऊन हूणांवर निकराचा सामुदायिक हल्ला केला आणि हूणांना हिंदुस्थानातून हाकलून लावले.
परंतु या दीर्घकालीन झगड्यामुळे हिंदुस्थान राजकीय व लष्करी दृष्ट्या दुबळा होतो. हूणांचे अनेक जथे उत्तर हिंदुस्थानभर ठायी ठायी वस्ती करून राहिले, त्यांच्यामुळे भारतीय जीवनात एक अंतर्गत क्रांती झाली. हे ठिकठिकाणचे हूण पूर्वीप्रमाणे आत्मसात केले गेले हे खरे, परंतु इंडो-आर्यन जनतेची जुनी ध्येये या हूणांच्या परिचक्रांमुळे दुबळी झाली. हूणांच्या इतिहासावरून दिसते की हूण हे अती क्रूर आणि रानटी होते, व त्यांचे एकंदर वर्तन हिंदी रणनीती, राजकीय नीती यांच्या अगदी विरुध्द होते.
सातव्या शतकात, राजा हर्षाच्या काळात पुन्हा राजकीय व सांस्कृतिक वैभवाची मोठी लाट आलेली दिसते. पुनरुज्जीवन, नवयुग सर्वत्र दिसू लागले. गुप्तकाळातील वैभवशाली राजधानी जी उज्जयिनी, ती पुन्हा कला, संस्कृतीचे माहेरघर बनली. प्रबळ प्रतापी राज्याची राजधानी झाली. परंतु हा उत्कर्ष, ही भरभराट फार वेळ राहात नाही. पुढच्या शतकात पिछेहाट दिसते, व ते सारे हळूहळू क्षीण होऊन, अखेर लय पावते. नवव्या शतकात गुजराथचा मिहिर भोज राजा पुढे येतो. मध्य व उत्तर हिंदुस्थान तो पुन्हा एकसत्तेखाली आणून कनोज राजधानी करतो. पुन्हा एक साहित्यिक पुनर्जन्म दिसतो. त्यात राजशेखराची मध्यवर्ती मूर्ती उभी राहते. पुन्हा अकराव्या शतकाच्या आरंभाला दुसरा एक प्रतापी, लक्षात घेण्यासारखा, भोजराजा उदयाला येतो, आणि उज्जयिनी पुन्हा मोठी राजधानी होते. हा भोजराजा अभिनव होता. अनेक क्षेत्रांत त्याने नाव मिळविले आहे. तो व्याकरणकार आणि कोशकार होता, आयुर्वेद व ज्योतिर्विद्या यांतही त्याची गती होती. त्याने पुष्कळ वास्तुनिर्मिती केली. कला व साहित्य यांचा तो पुरस्कर्ता होता. तो स्वत: कवी आणि लेखक होता. अनेक ग्रंथ त्याच्या नावावर आहेत. त्याचे नाव नाना दंतकथा व आख्यायिका यांत प्रचलित आहे. राजा भोजाच्या कथा बहुजनसमाजात सर्वत्र आहेत. विद्वत्ता, उदारता, मोठेपणा याचे, त्याचे नाव म्हणजे प्रतीक आहे.
आशेला जागा म्हणून इतिहासातल्या ह्या काळात मधूनमधून हे भाग दिसत असले तरी एकंदरीत कसल्यातरी अंतस्थ क्षयाने भारत पछाडला होता व त्याने आलेले दौर्बल्य राजकीय क्षेत्रापुरतेच नसून सर्व निर्माणशक्तींना ते मारू बघत होते. अमूक एका काळापासून हा र्हास, ही अवनती सुरू झाली असे सांगता येणार नाही, कारण हा रोग हळूहळू सगळ्या देशभर पसरत होता. उत्तर हिंदुस्थानला या रोगाने दक्षिण हिंदुस्थानच्या अगोदर ग्रासले. दक्षिण हिंदुस्थान तर राजकीय व सांस्कृतिक दृष्ट्या या काळात अधिक सरसावून महत्त्वाचा बनला. लढणार्या परकीय लोकांना पुन:पुन्हा तोंड देताना उत्तरेवर जो ताण पडला, तो दक्षिणेकडे पडला नव्हता हे याचे कारण असावे; तसेच उत्तरेकडून अनेक लेखक, कलावान, शिल्पी, कारागीर हे दक्षिणेकडे गेले असावेत, कारण उत्तरेपेक्षा दक्षिण अधिक सुरक्षित होती. दक्षिणेकडे या वेळेस प्रतापी राज्ये होती. त्यांच्या वैभवशाली दरबारांची वर्णने ऐकून हे गुणी लोक आधार मिळावा म्हणून दक्षिणेकडे आले असावेत, कारण त्यांच्या निर्माणशक्तीला तेथे वाव होता, संधी होती.